‘कर्जबुडव्यांचा मुद्दा भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून, संधी मिळेल तेव्हा तो ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांपुढे मांडला जाईल’, असे सांगत ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मल्याच्या हस्तांतरणाचा मुद्दा या भेटीत उपस्थित केला जाईल, असे संकेत दिले आहेत.

भारतीय बँकांचे कोटय़वधी रुपयांचे कर्ज बुडवणारा मद्यसम्राट विजय मल्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. त्या पाश्र्वभूमीवर जेटली यांचे हे संकेत महत्त्वाचे आहेत. सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना जेटली म्हणाले की, ‘आमच्या दृष्टीने कर्जबुडव्यांचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि हे कर्जबुडवे कुठेही गेले तरी त्यांच्याकडून पै न पै वसूल केले जातील, असा ठोस संदेश आम्ही त्यांना दिलेला आहे. त्यामुळेच काही कर्जबुडवे इतर देशांत पळून गेले आहेत.

मात्र कायद्याचा पुरेपूर वापर करून त्यांच्याकडून बँकांच्या थकीत कर्जाची वसुली करणे, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे अशी पावले आम्ही टाकत आहोत. त्याखेरीज त्यांना पुन्हा भारतात आणण्याचेही पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत’.

‘कर्जबुडव्यांनाही वास्तव्याची मुभा मिळावी इतकी ब्रिटनमधील लोकशाही खुली आहे’, असे विधान जेटली यांनी गेल्याच आठवडय़ात केले होते. त्यांचा रोख अर्थातच मल्याकडे होता. तत्पूर्वी, ‘मल्याला भारताच्या स्वाधीन करा’, अशी औपचारिक विनंती भारत सरकारच्या वतीने ब्रिटन सरकारला करण्यात आली होती.