मुंबई : भारती एअरटेलपाठोपाठ दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन-आयडियाने दरवाढीचा कित्ता गिरवत मंगळवारी विविध कॉल आणि डेटा योजनांवरील दरात २० ते २५ टक्क्य़ांनी वाढ करीत असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. ही दरवाढ येत्या गुरुवार, २५ नोव्हेंबरपासून लागू होईल. आर्थिक विवंचनेत असलेल्या व्होडा-आयडियाने सुधारित दर योजनांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषणा केली. २८ दिवसांच्या कालावधीसाठी रिचार्जचे किमान मूल्य २५.३१ टक्क्य़ांनी वाढवून ७९ रुपयांवरून ९९ रुपयांपर्यंत वाढविले आहे. तसेच लोकप्रिय ‘अनलिमिटेड’ श्रेणीतील योजनांमध्ये कंपनीने २० ते २३ टक्के दरवाढीचा निर्णय घेतला आहे. २८ दिवसांची वैधता असलेल्या १ जीबी डेटा योजनेसाठी ग्राहकांना २१९ रुपयांऐवजी आता २६९ रुपये मोजावे लागतील. शिवाय, १.५ जीबी प्रति दिवस डेटा मर्यादेसह ८४ दिवसांच्या वैधतेच्या योजनेसाठी पूर्वी ५९९ रुपये आकारले जात होते. आता त्यासाठी ७१९ रुपये मोजावे लागतील. तर १.५ जीबी प्रति दिवस डेटा मर्यादेसह ३६५ दिवस वैधतेच्या योजनेचे दर २०.८ टक्क्य़ांनी वाढून २,८९९ रुपये करण्यात आले आहेत.