फोक्सवॅगनने केलेल्या लबाडीतून डिझेलवरील वाहनांकडून प्रदूषण नियमांची पायमल्ली उघडकीस आल्यानंतर सर्वच डिझेलवर धावणाऱ्या वाहनांवर सरकारची करडी नजर वळल्याचे आढळत आहे. केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री अनंत गिते यांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वच डिझेलवरील वाहने विहित मानकानुसार आहेत की नाही, याची चाचपणी येत्या सहा महिन्यांत केली जाणार आहे.
प्रदूषणाबाबतचे नियम देशातील वाहन कंपन्या पाळतील, या दिशेने करावयाच्या उपाययोजनांची पावले सरकार टाकत असून देशातील सर्व डिझेल वाहनांची प्रदूषण पातळी येत्या सहा महिन्यांमध्ये तपासली जाईल, असे गिते यांनी सांगितले. डिसेंबरअखेर ही प्रक्रिया ‘एआरएआय’ राबवेल, अशी माहिती खात्याचे अतिरिक्त सचिव अंबुज शर्मा यांनी दिली. फोक्सवॅगनवरील दंडाबाबत निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
फोक्सवॅगने प्रदूषणाची मात्र लपविणारी यंत्रणा आपल्या विविध वाहनांमध्ये राखून गंभीर गुन्हा केल्याचेही गिते म्हणाले. फोक्सव्ॉगनच्या वाहनांची तपासणी प्रत्यक्षात रस्त्यावर धावताना केल्यानंतरही तिच्या इंजिनात दोष आढळल्याचेही त्यांनी सांगितले. ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’लाही (एआरएआय) कंपनीच्या वाहनांनी विहित मर्यादेपेक्षा आठ ते नऊ पट प्रदूषणबाबतची मात्रा ओलांडल्याचे लक्षात आल्याचे गिते यांनी सांगितले.
मूळच्या जर्मनीतील फोक्सव्ॉगनने देशातील सर्वात मोठी वाहन माघार मंगळवारी जाहीर केली होती. यानुसार फोक्सवॅगनसह स्कोडा, ऑडी या समूहातील अन्य नाममुद्रेतील वाहनेही परत बोलाविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. ईए१८९ प्रकारचे डिझेल इंजिन या वाहनांमध्ये २००८ पासून बसविण्यात आले होते.