प्रदुषणाची मात्रा कमी दाखविणारी सॉफ्टवेअर रचना डिझेल वाहनांमध्ये बसविले प्रकरणात फोक्सव्ॉगने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्टिन विंटरकॉर्न यांना अखेर पायउतार व्हावे लागले आहे. जर्मन कंपनीच्या डिझेलवरील तब्बल १.१० कोटी वाहनांमध्ये सदोष सॉफ्टवेअर बसविल्याची कबुली देण्याची नामुष्की कंपनीवर गेल्या आठ दशकात प्रथमच आली. सोमवारी याबाबत कंपनीकडून मान्य करण्यात आल्यानंतर बुधवारी बोलाविलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विंटरकॉर्न यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. कंपनीच्या वोल्फस्बर्ग (जर्मनी) येथील मुख्यालयातील बैठकीला पाच कार्यकारी सदस्य उपस्थित होते. ‘गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांचा मला धक्का बसला असून अशी घटना येथे (फोक्सव्ॉगन समूहात) घडणे हे दुर्दैवी अशी व्यथित भावना ६८ वर्षीय विंटरकॉर्न यांनी बैठकीत नमूद केली. राजीनाम्याच्या माध्यमातून मी समूहात नवी सुरुवात करण्यासाठी मार्ग मोकळा करत असल्याचेही त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या समर्थनार्थ वक्तव्य केले. कंपनीच्या संचालक मंडळाची शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आहे. यात विंटरकॉर्न यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या, नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.