इंजिन क्षमतेत अमेरिकेतील चाचणीत दोषी ठरलेल्या फोक्सवॅगन या जर्मन कंपनीने अखेर भारतातील तब्बल ३,२३,७०० वाहने माघारी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या डिझेल वाहनांमधील सदोष पर्यावरण चाचणीच्या उपकरणाच्या चौकशीचे आदेश केंद्र सरकारने दिल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. ईए१८९ बनावटीचे इंजिन असलेल्या व माघारी घेण्यात येणाऱ्या वाहनांमध्येफोक्सवॅगनसह स्कोडा व ऑडी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांकरिता खरेदीदारांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना तांत्रिक सहकार्य पुरविले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

या तिढय़ाबाबत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय व ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ यांना तांत्रिक उपाय सादर केला जाईल, असे कंपनीने मंगळवारी स्पष्ट केले. २००८ पासून नोव्हेंबर २०१५ पर्यंतफोक्सवॅगन समूहातील १,९८,५०० फोक्सव्ॉगन, ८८,७०० स्कोडा, तर ३६,५०० ऑडीच्या वाहनांमध्ये ईए१८९ इंजिन बसविण्यात आले आहे.