फोक्सवॅगनने भारतातील आपल्या उत्पादनाला अधिक जोमदारपणे सुरुवात केली असून नवीन ‘डिझेल इंजिन असेम्ब्ली लाईन’ स्थापन करण्याबरोबरच पुण्यातील चाकण येथील केंद्रावर सुसज्ज अशी इंजिन टेस्टींग सुविधाही सुरू केली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याबरोबरच फोक्सवॅगन इंडिया आता या केंद्रामध्ये उत्पादित झालेल्या वाहनांमध्ये अधिकाधिक स्थानिक भागांचा वापर करेल.
फोक्सवॅगन इंडियाने इंजिन असेम्ब्लीचा पहिला टप्पा तसेच भारतातील पुरवठादारांकडील सुटय़ा भागांचे उत्पादन याकरता ३० दशलक्ष युरोची (२४० कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. दीर्घकालीन संरचना आणि भारतातील देशांतर्गत बाजारपेठेवर विशेष भर देत फोक्सवॅगन ग्रुपने भारतात १३ वर्षांपूर्वी प्रवेश केला. कंपनी टप्प्याटप्प्याने पुणे प्रकल्पात उत्पादित केल्या जाणाऱ्या वाहनांमधील स्थानिक बाबींचा सहभाग वाढवत आहे. फोक्सवॅगनने आता नवीन इंजिन असेम्ब्ली लाईनमध्ये गुंवतणूक केली. भारतात तयार केली जाणारी कार ही १.५ लिटर टीडीआय डिझेल इंजिनची असून ती भारतीय बाजारपेठसमोर ठेवून डिझाईन आणि विकसित करण्यात आली आहे. याचे विस्ताराचा शुभारंभ नुकताच नवीन फोक्सवॅगन पोलोच्या माध्यमातून करण्यात आला. फोक्सवॅगन ग्रुप इंडियाचे समूह मुख्य प्रतिनिधी आणि फोक्सवॅगन इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश कोडुमुदी यांनी सांगितले की, चाकण येथील केंद्रामध्ये अत्याधुनिक आणि सुसज्ज इंजिन टेस्टिंग सुविधेला सामावून घेणाऱ्या अत्याधुनिक इंजिन असेम्ब्ली लाईनमधील आमची गुंतवणूक हे भारताप्रती आमची असलेली बांधिलकी दृढ करण्यामागील प्रमुख पाऊल आहे. यामुळे आम्ही भारतातील स्थानिकीकरणाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने लक्षणीय झेप घेऊ शकू. नवीन इंजिन असेम्ब्ली लाईन सध्या चाकणमधील फोक्सवॅगनच्या पुणे प्रकल्पातील संरचनेत सामावली गेली आहे. ही लाईन एकूण ३,४५० चौरस मीटर जागेत कार्यरत असेल. एकटय़ा पुणे केंद्रावरच २६० हून अधिक अतिरिक्त रोजगार निर्मिती केली जाईल. भारतातील या इंजिनचे सुटे भाग उत्पादित तसेच वितरित करणाऱ्या भारतीय वितरकांकडे निर्माण होणारे अतिरिक्त रोजगार यात गणण्यात आलेले नाहीत. नवीन लाईनमुळे पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास तीन पाळ्यांमध्ये ९८ हजारांहून अधिक इंजिने जोडता येतात. नवीन पोलो आणि पोलो जीटी टीडीआयमध्ये स्थानिक पातळीवर जोडणी करण्यात आलेले इंजिन वापरण्यात आले आहे. ५८ कोटी युरोची सुरुवातीची गुंतवणूक आणि १० कोटी युरोची अतिरिक्त गुंतवणूक करणारी फोक्सवॅगन पुणे प्लान्ट ही भारतात आतापर्यंत इतकी मोठी गुंतवणूक करणारी एकमेव जर्मन कंपनी आहे. ५७५ एकरवरील या अत्याधुनिक उत्पादन क्षमतेमध्ये संपूर्ण ऑटोमोटिव्ह उत्पादन प्रक्रिया असून यात प्रेस शॉप पासून ते बॉडी शॉप आणि पेंट शॉप पासून ते असेम्ब्ली आहे. पुणे प्रकल्पात इनहाऊस आर अ‍ॅण्ड डी सुविधा असून भारतीय ग्राहकाच्या गरजांना अनुसरून त्यानुसार उत्पादने तयार केली जातात.

सप्टेंबरपासून मर्सिडिज-बेन्झ इंडियाच्या कारची दरवाढ
जर्मन बनावटीच्या मर्सिडिज-बेन्झच्या आलिशान कार येत्या १ सप्टेंबर २०१४ पासून महाग होणार आहेत. कंपनीने आपल्या विविध श्रेणीतील वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घोषित केला आहे. विविध मॉडेलच्या किंमतीत भिन्न स्तरावर वाढ होणार असून ती कमाल २.५ टक्क्य़ांपर्यंत असेल. कच्च्या मालाच्या किंमतीत होणारी वाढ तसेच परकीय चलनाचा सातत्याने वाढणारा दर यासारख्या घटकांमुळे कंपनीच्या नफाक्षमतेवर परिणाम होत असल्याने ही दरवाढ अटळ ठरली असल्याचे कंपनीने यानिमित्ताने म्हटले आहे. मर्सििडज-बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एबरहार्ड कर्न याबाबत म्हणाले, कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि परकीय चलनाच्या दरात होणारी वाढ लक्षात घेऊन आम्ही आमच्या काही वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ झाली तरी मर्सििडज-बेन्झ पायनान्शियल सíव्हसेसकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर्ज योजना उपलब्ध आहेत, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. यानंतर अन्य कंपन्याही त्यांच्या वाहनांचे दर वाढविण्याची शक्यता आहे.