प्रदूषण लपवणाऱ्या सॉफ्टवेअर लबाडीचे प्रकरण
स्वच्छ हवेबाबत निकष धाब्यावर बसवून प्रदूषण लपवणारी आज्ञावली बसवल्याच्या प्रकरणात अमेरिकी सरकारने जर्मनीच्या फोक्सवॅगन कंपनीवर २० अब्ज डॉलर्सचा दावा लावला आहे, किमान सहा लाख डिझेल मोटारींमध्ये ही आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअर बसवण्यात आले होते. फोक्सवॅगन कंपनीच्या मोटारींनी हानिकारक प्रमाणात प्रदूषण केल्याचे अमेरिकी सरकारचे मत आहे.
पर्यावरण संरक्षण संस्थेच्या वतीने न्याय खात्याने याचिका दाखल केली असून त्यात २० अब्ज अमेरिकी डॉलर्सची मागणी करण्यात आली आहे.
दाव्यात म्हटले आहे, की फोक्सवॅगन या जर्मन कंपनीने प्रदूषण लपवणारी यंत्रे डिझेल मोटारींमध्ये बसवली होती. त्यात ऑडी, पोर्शे या मॉडेल्सची चाचणी करण्यात आली असता त्यातून निघणाऱ्या धुराने होणारे प्रदूषण व त्यातील विषारी प्रदूषकांचे प्रमाण ४० पटींनी अधिक दिसून आले. न्याय विभागाने नेमका किती रकमेच्या दंडाचा दावा लावला आहे हे समजलेले नाही. प्रत्येक मोटारीमागे ३७५०० डॉलर्स व प्रदूषण लपवणाऱ्या प्रत्येक यंत्रामागे २७५० डॉलर्स द्यावेत अशी मागणी दाव्यात केली असून त्याचा हिशेब काढला तर या कंपनीला २० अब्ज डॉलर्स इतकी रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. सहायक महाधिवक्ता जॉन क्रूडेन यांनी सांगितले, की मोटार उत्पादकांनी गुणवत्ता दर्जा तपासताना चूक करून लोकांचा विश्वास गमावला आहे, लोकांचे आरोग्य धोक्यात आणले असून त्यामुळे स्पर्धक कंपन्यांनाही फटका बसला आहे. अमेरिका या प्रकरणी फोक्सवॅगन विरोधात प्रदूषण नियमभंगाच्या तक्रारीचा पाठपुरावा करणार आहे. पर्यावरण संस्थेच्या सहायक प्रशासक सिंथिया गाइल्स यांच्या मते फोक्सवॅगन कंपनीला प्रदूषणास जबाबदार धरले असून कंपनीशी चर्चेत कुठलाही तोडगा निघू शकला नाही.