वायू प्रदूषण उत्सर्जनाची मात्रा कमी दाखविणारी सॉफ्टवेअर चलाखी करणाऱ्या फोक्सव्ॉगनला प्रमुखपदी समूहातीलच व्यक्ती मिळण्याची शक्यता बळावली आहे. समूहातील आलिशान पोर्शे या स्पोर्टस युटिलिटी कार बनविणाऱ्या विभागाचे प्रमुख मथायस मुलर यांच्या खांद्यावर फोक्सव्ॉगनची धुरा येऊ घातली आहे. अमेरिकेत उघडकीस आलेल्या लबाडीनंतर दोन दिवसांपूर्वी मार्टिन विंटरकॉर्न यांना मुख्य कार्यकारी पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
डिझेल इंजिन असलेल्या १.१० कोटी वाहनांमध्ये सदोष सॉफ्टवेअर यंत्रणा बसविल्याची कबुली फोक्सव्ॉगनने दिल्यानंतर फोक्सव्ॉगनचे मार्टिन विंटरकॉर्न यांना मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत द्यावा लागला होता.
त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी शुक्रवारी पुन्हा झालेल्या कंपनीच्या कार्यकारी सदस्यांच्या बैठकीपूर्वी पोर्शेचे मुलर यांच्या नावावर जोरदार चर्चा सुरू झाली. विंटरकॉर्न हे फोक्सव्ॉगनमध्ये २००७ पासून प्रमुख होते, तर ६२ वर्षीय पोर्शे या स्पोर्ट कार विभागाची जबाबदारी हाताळत आहेत.
दरम्यान, नव्या प्रमुखाच्या चर्चेने शुक्रवारी युरोपातील शेअर बाजारांमध्ये फोक्सव्ॉगनचा समभाग दोन टक्क्य़ांपर्यंत उसळला होता, तर जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड तसेच भारतातील कंपनीच्या वाहनांच्या तपासाचे चक्र फिरण्याचे संकेत देण्यात आले.

ह्य़ुंदाईच्या सोनाटा अमेरिकेतून माघारी
डेट्रॉईट : सॉफ्टवेअर-लबाडी प्रकरणी फोक्सव्ॉगनला अमेरिकी पर्यावरण नियामकाचा रोष ओढवून आठवडा होत नाही तोच येथील ४.७० लाख सोनाटा या सेदान प्रवासी कार माघारी बोलावण्याचे पाऊल कोरियन कंपनी ह्य़ुंदाईला उचलावे लागत आहे. २०११ व २०१२ मध्ये तयार करण्यात आलेल्या सोनाटाच्या इंजिनामध्ये तांत्रिक अडचण आढळून आली आहे.