उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को या कंपनीला कोळसा खाणवाटप हे ‘नियमाला धरून’ झालेले आहे काय, असे येथील विशेष न्यायालयाने याप्रकरणी तपास करीत असलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला सोमवारी प्रश्न केला. सीबीआयने बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी सी परख यांच्याविरोधातील तपास बंद करीत असल्याचा न्यायालयात अहवाल सादर केला असून, याप्रकरणी काही ‘भूलचूक’ तर झालेली नाही ना, अशी खातरजमा करताना न्यायालयाने हा प्रश्न केला.
हिंदाल्कोला कोळसा खाणी बहाल करताना नियमांचे पालन केले गेले काय; काही भूलचूक तर झालेली नाही ना आणि संपूर्ण प्रकरणाला गुन्ह्य़ाचा काही पैलू आहे काय, अशा तीन प्रश्नांवर सीबीआयने खुलासा करावा, असे विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पराशर यांनी आदेश दिले. सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने सुनावणीदरम्यान हिंदाल्कोला कोळसा खाणवाटपात गुन्हा घडल्याचा संदर्भ नसल्याचे स्पष्ट केले होते.
खाणवाटपाचा अधिकार असलेल्या छाननी समितीने हिंदाल्कोकडून खाणीसाठी आलेला प्रस्ताव प्रथम फेटाळला आणि नंतर बिर्ला यांच्या विनंतीने त्यावर फेरविचार करून खाण बहाल करण्याचा निर्णय घेतला. ‘अशा तऱ्हेने फेरबदल करून खाणवाटपात त्यांना नंतर सामावून घेण्याची मुभा आहे काय’ असाही न्यायालयाने प्रश्न केला आहे. कोळसा खाणवाटप हे योग्य व्यक्तींना झाले आहे की नाही, यापेक्षा वाटप करण्याची पद्धत नियमाला धरून होती काय, याचा निवाडा आपल्याला करावयाचा आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने विशेष सरकारी वकिलाच्या अनुपस्थितीत न्यायालयाच्या कोणत्याही प्रश्नावर मतप्रदर्शन करण्याचे टाळले आणि अपेक्षित तो खुलासा करण्यासाठी वेळ मागून घेतली. न्यायालयाने पुढील सुनावणी १२ सप्टेंबरला घेण्याचा निर्णय दिला.