बाजार-साप्ताहिकी : भय इथले..

बांधकाम प्रकल्पांच्या नियोजनापासून प्रकल्प उभारणीपर्यंतच्या विविध सेवा कंपनी आपल्या ग्राहकांना देत असते

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

बाजाराचे सध्याचे लक्ष फक्त करोनाच्या प्रादुर्भावाकडे आहे. कारण हे संकट असेच वाढले तर जगाची अर्थव्यवस्थाच ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे कधी हे संकट आटोक्यात आल्याच्या बातम्या तर कधी नवीन देशात लागण झाल्याच्या बातम्या या सप्ताहात बाजाराला मोठे हेलकावे देत राहिल्या. दिवसाआड चढ-उतार करणाऱ्या बाजाराला शेवटच्या दिवशी मोठा तडाखा मिळून निर्देशांक दीड टक्क्यांनी घसरले ते येस बँकेच्या कारभारावर रिझव्‍‌र्ह बँकेने घातलेल्या र्निबधांमुळे. या मोठय़ा आपटीनंतरही, सेन्सेक्स ७२१ अंकाची तर निफ्टी २१२ अंशांची साप्ताहिक घसरण होऊन बंद झाले.

बाजारातील मोठी घसरण व मोठी तेजी हे दोन्ही गुंतवणूकदारांसाठी कायमच कसोटीचे क्षण असतात. मोठय़ा तेजीच्या काळातही मनावरील संयम महत्त्वाचा असतो. कारण तेजीच्या उत्साहात समभागांची खरेदी वरच्या पातळीवर होऊन बाजार पडल्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. मोठय़ा घसरणीच्या काळात कुठले समभाग घ्यायचे हा निर्णय नेहमीच कठीण असतो. आपल्या जवळील मर्यादित भांडवल कसे गुंतवायचे आणि घसरलेले कोणते समभाग लवकर पुन्हा पूर्व पातळीवर येतील याचे आडाखे बांधावे लागतात. यावरील एक उपाय म्हणजे पुढील पाच वर्षांसाठी कोणत्या कंपन्या आपल्या पोर्टफोलियोमध्ये हव्या हे ठरवून घ्यावे. त्यातील गुंतवणुकीची कमाल मर्यादा किती हे आधीच ठरविलेले असले की असे निर्णय सोपे होतात. सध्या अनेक चांगल्या कंपन्यांचे समभाग खाली येत आहेत. एचडीएफसी बॅँक या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा बँकेचे समभागही याला अपवाद नाहीत. परंतु बँकेच्या नवीन व्यवस्थापकीय संचालकांच्या निवडीबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे बँकेचे समभाग बाजारात जास्त दबावाखाली आहेत. त्यामध्ये खरेदीची चांगली संधी आहे.

पीएसपी प्रोजेक्ट ही बहुआयामी बांधकाम कंपनी असून औद्योगिक, निवासी, सरकारी प्रकल्पांच्या बांधकाम व्यवसायात असलेली कंपनी आहे. बांधकाम प्रकल्पांच्या नियोजनापासून प्रकल्प उभारणीपर्यंतच्या विविध सेवा कंपनी आपल्या ग्राहकांना देत असते. कंपनीने मुख्यत्वे गुजरात राज्यातील प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले असून अलीकडे कंपनीने गुजरातबाहेरही निविदा भरून काही प्रकल्पांचे काम मिळविले आहे. कंपनीला २०१७ मध्ये सुरतच्या हिरे बाजाराच्या इमारतीचे काम मिळाले असून हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर कंपनीची अर्हता वाढणार असून कंपनी मोठय़ा प्रकल्पांसाठी बोली लावण्यास पात्र ठरेल. डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीनिकालांनुसार कंपनीच्या हातात असलेली मागणी वार्षिक विक्रीच्या २.७ पट आहे. पुढील दोन ते पाच वर्षांच्या कालावधीचा विचार करून गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळविता येईल.

करोनाचाकुठल्या उद्योगावर किती परिणाम होईल हे सांगणे अतिशय कठीण आहे. जागतिक बाजारांबरोबर भारतीय बाजारही अजून खाली जाऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ‘इंडेक्स फंडां’मध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हादेखील एक चांगला पर्याय आहे. बाजाराचे लक्ष आता विषाणूचा प्रसार, त्यावरील सरकारच्या उपाययोजना, रिझव्‍‌र्ह बँकेचा व्याजदर कपात अपेक्षांना प्रतिसाद तसेच येस बँकेबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Weekly stock market update coronavirus impact on stock market zws