देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती-तंत्रज्ञान कंपनी आणि सध्या नारायण मूर्ती यांच्या हाती धुरा असलेल्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्ने साऱ्या विश्लेषकांच्या तर्क-कयासांना मात देत, शुक्रवारी एप्रिल-जून २०१३ तिमाहीसाठी ३.७ टक्क्यांची यातील वाढ नोंदविली आहे. कंपनीने सरलेल्या तिमाहीत २,३७४ कोटी रुपयांचा नफा कमावला, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत रु. २,२८९ कोटी असा होता. तिमाहीगणिक अंदाज घेतल्यास आधीच्या तिमाहीच्या तुलनेत इन्फोसिसच्या महसुलात ७.८ टक्क्यांची वाढ झाली असली तरी नफा ०.८% असा किंचित घसरला आहे.
गेल्या वर्षी याच तिमाहीत इन्फोसिसने कमावलेल्या महसुलाच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत १७.२ टक्क्यांनी वाढ होऊन तो ११,२६७ कोटी रुपयांवर गेला आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी अलीकडेच जूनमध्ये कंपनीची सूत्रे कार्यकारी अध्यक्ष म्हणून हाती घेतली आणि सादर झालेल्या या पहिल्याच तिमाही निकालात कंपनीच्या कामगिरीत स्थिरत्व आल्याचे दिसून आले.
अनिश्चित स्वरूपाचा आर्थिक अवकाश, बदलत असलेला नियम व नियंत्रणाचाढाचा आणि चलनातील वादळी वध-घटी अशा प्रतिकूलतेतही आम्ही आर्थिक वर्ष २०१४ च्या पहिल्या तिमाहीत खूपच चांगली कामगिरी केली आहे आणि उर्वरित वर्षांबाबत सावध पण आशावादी आहोत, असे इन्फोसिसचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस. डी. शिबूलाल यांनी ताज्या कामगिरीविषयी अभिप्राय व्यक्त केला.
वित्तीय निकालांबरोबर कंपनीच्या आगामी वाटचालीबाबत इन्फोसिसच्या व्यवस्थापनाकडून दिले जाणारे संकेतच विशेष महत्त्वाचे ठरत असतात. त्या आधारावर अनेक विश्लेषक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या बाबतीत आपले आडाखे ठरवीत असतात. या तिमाहीतील चांगल्या कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर वार्षिक कामगिरीबाबत संकेतात व्यवस्थापनाने कोणतीही सुधारणा सुचविलेली नाही. तरी चालू आर्थिक वर्षांत कंपनीच्या डॉलरमधील महसुलात ८-१० टक्क्यांनी वाढीची व्यक्त करण्यात आलेली शक्यताही विधायकच असल्याचे मत बाजार-विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. रुपयाच्या स्वरूपात हीच महसुली वाढ १३-१७ टक्क्यांच्या घरात जाणारी असेल. आयटी उद्योगाची शिखर संघटना ‘नास्कॉम’ने व्यक्त केलेल्या १२-१४ टक्के वाढीपेक्षा इन्फोसिसचे संकेत निश्चितच सरस आहेत. तथापि, कंपनीने जाहीर केलेल्या उदार वेतनवाढीचे वित्तीय परिणाम जुलैपासून ताळेबंदावर पडलेले दिसून येतील आणि परिणामी आगामी तिमाही कामगिरीत नफा आक्रसलेला दिसेल, अशी कबुली इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी राजीव बन्सल यांनी दिली.
समभागाची ११% कमाई!
नारायण मूर्ती यांनी जूनच्या सुरुवातीला कंपनीचा कारभार हाती घेण्याने सुखावलेल्या गुंतवणूकदारांना यंदाच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीने खरोखरच ‘इन्फी-मंगल’ परतत असल्याचा विश्वास दिला. शुक्रवारी सकाळी भांडवली बाजाराची सुरुवात होण्यापूर्वीच आलेल्या इन्फोसिसच्या निकालांनी बाजारात मंगलमय वातावरण निर्माण केले. कालच्या तुलनेत भावात तब्बल १५ टक्क्यांची उसळी घेऊन इन्फोसिसने बाजारात सलामी दिली. विशेषत: २०११ पासून इन्फोसिसच्या तिमाहीगणिक कामगिरीत सातत्याचा अभाव व आश्चर्यकारक चढ-उतारांचा कंपनीच्या समभागाच्या कामगिरीवरही बरा-वाईट प्रभाव दिसून आला आहे. निकालदिनी समभाग मूल्यात मोठय़ा प्रमाणात चढ-उतार नोंदले जाण्याचा इन्फोसिसचा ताजा इतिहास आहे. गेल्या तीन वर्षांतील १२ तिमाहीतील निकालांच्या दिवशी केवळ दोनदा इन्फोसिसचा समभाग निकालाच्या दिवशी उंचावला आहे आणि आजच्या १३ व्या प्रसंगातील समभागाने कमाई नोंदविण्याची ही तिसरी खेप आहे. शुक्रवारी दिवसभरात २९०५ रु. उच्चांक गाठल्यानंतर इन्फोसिसचा भाव दिवसअखेर १०.९२% कमाईसह रु. २८०२.७५ (बीएसई) वर स्थिरावला.