पीटीआय, नवी दिल्ली : किरकोळ महागाई दराने किंचित दिलासा दिला असला तरी घाऊक महागाई दराने नवीन ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठत महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्यांची होरपळ अधिक वाढवली असल्याची आकडेवारी मंगळवारी पुढे आली. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरात सरलेल्या मे महिन्यात १५.८८ टक्के वाढ नोंदविली गेली असून, महागाईने २०१२ मधील उच्चांकी पातळी गाठली आहे.

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२१ पासून सलग चौदाव्या महिन्यात घाऊक महागाई दर दोन अंकी स्तरावर कायम आहे. तर सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दराने नवीन उच्चांकी स्तर गाठला आहे. मुख्यत: खनिज तेल, मूलभूत धातू, अन्नधान्य, इंधन व नैसर्गिक वायू, रसायने आणि रासायनिक उत्पादने आदींच्या किमती मागील वर्षांच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढल्या आहेत. ज्याचा निर्मिती उद्योगाच्या खर्च आणि उत्पादनाच्या किमतीतील वाढीने घाऊक महागाई निर्देशांकावर सलग तिसऱ्या महिन्यात उच्चांकी वृद्धी दर्शविणारा परिणाम दिसून आला आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.

भाजीपाला, गहू, फळे आणि बटाटय़ाच्या किमतीत वर्षभरापूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्यामुळे अन्नधान्याचा महागाई दर मे महिन्यात १२.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. भाजीपाल्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एकूणच अन्नधान्याच्या महागाई दरात वाढ झाली. सरलेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती ५६.३६ टक्क्यांनी वाढल्या, तर गव्हाच्या किमतीत १०.५५ टक्के वाढ नोंदवली गेली. त्याचबरोबर उच्च प्रथिनेयुक्त आहार अर्थात अंडी, मांस आणि मासे यांची डिसेंबरमधील किंमतवाढ ही ७.७८ टक्के अशी राहिली, असे आकडेवारी सांगते. इंधन क्षेत्रातील इंधन व नैसर्गिक वायू महागाई दर ७९.५०  टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ निर्मित वस्तू आणि तेलबियांमधील महागाईदर अनुक्रमे १०.११ आणि ७.०८ टक्के नोंदवला गेला.

केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून वाढत्या महागाईला लगाम लावण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे किरकोळ महागाई दराने सरलेल्या मे महिन्यात दिलासा दिला. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजला जाणारा हा महागाई दर सोमवारी ७.०४ टक्के नोंदविण्यात आला.