नवी दिल्ली : खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आणि त्या परिणामी देशांतर्गत उत्पादित किमतीतील वाढीतून घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ऑक्टोबरमध्ये १२.५४ टक्के नोंदविला गेला. सलग सातव्या महिन्यात दोन अंकी स्तरावर राहिलेला हा महागाई दर पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

मुख्यत: खनिज तेल, मूलभूत धातू, अन्नधान्य, इंधन व नैसर्गिक वायू, रसायने आणि रासायनिक उत्पादने आदींच्या किमती मागील वर्षांच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढल्या आहेत. ज्याचा निर्मिती उद्योगाच्या खर्च आणि उत्पादनाच्या किमतीत वाढीचा ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई निर्देशांकावर वृद्धी दर्शविणारा परिणाम दिसून आला आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

चालू वर्षांत एप्रिलपासून घाऊक महागाई सातत्याने चिंताजनक दोन अंकी पातळीवर टिकून आहे. मेमध्ये ती १३.११ टक्क्य़ांवर कडाडलेली दिसून आली. त्यानंतरची सर्वाधिक मासिक वाढ सरलेल्या महिन्यांत दिसली आहे. त्याआधीच्या म्हणजे सप्टेंबर महिन्यांत घाऊक महागाई दर १०.६६ टक्क्य़ांवर होता. तर गेल्या वर्षी अर्थात ऑक्टोबर २०२० मध्ये हा दर १.३१ टक्क्य़ांवर होता.

उत्पादित वस्तूंमधील महागाई दर ऑक्टोबरमध्ये १२.०४ टक्के होता, जो आधीच्या महिन्यांत ११.४१ टक्के पातळीवर होता. खनिज पेट्रोलियम उत्पादनांतील महागाई दर सप्टेंबरमधील ७१.८६ टक्क्य़ांवरून, ऑक्टोबरमध्ये  ८०.५७ टक्क्य़ांवर कडाडला आहे.

मागील सप्ताहअखेर जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दरही ऑक्टोबरमध्ये वाढून ४.४८ टक्क्य़ांवर पोहचला आहे. महिन्याभरापूर्वी हा दर ४.३५ टक्क्य़ांवर होता. उत्पादन घटकांवर वाढलेला खर्च, इंधन आणि आयातीत वस्तूंच्या वाढलेल्या किमतीसह अन्नधान्य पदार्थाच्या किमती वाढल्याचा हा परिणाम आहे. ग्राहक मागणीत सुरू असलेली ताजी वाढ पाहता, उद्योग-व्यवसायांकडून उत्पादन खर्चातील वाढीचा संपूर्ण भार हा अंतिम ग्राहकांच्या खांद्यावर लोटून देतील, जे अधिक चिंताजनक ठरेल, अशी यावर विश्लेषकांची टिप्पणी आहे.

पुरवठा साखळीत विस्कळीतपणा असतानाच, ग्राहक मागणीत मात्र उत्तरोत्तर वाढ सुरू आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे वस्तू निर्माते हे सुटे घटक व कच्चा माल यांच्या वाढलेल्या किमतींचा भार हा सामान्य ग्राहकांवर लोटू लागले आहेत. इंधनांच्या किमतींवरील कराचा भार कमी करणारा दिलासा सरकारने दिला असला तरी त्याचे महागाई दराचे अंगाने परिणाम पुढील काही महिन्यांमध्ये दिसून येतील. त्यातून घाऊक महागाई दरात उतार अपेक्षित असून, मार्चपर्यंत हा दर ७.५ टक्के  ते ८.५ टक्क्य़ांदरम्यान स्थिरावणे अपेक्षित आहे.

’  आदिती नायर, मुख्य अर्थतज्ज्ञ इक्रा