इंधन, अन्नधान्य किमतीत वाढीचा परिणाम

नवी दिल्ली : इंधनाबरोबरच अन्नधान्याच्या किमती भडकल्याने सरलेल्या मार्च महिन्यातील महागाई दर ३ टक्क्यांनजीक पोहोचला आहे. किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारीत हा दर मार्चमध्ये २.८६ टक्के नोंदला गेला आहे.

महिन्याभरापूर्वी, फेब्रुवारीमध्ये महागाई दर २.५७ टक्के तर वर्षभरापूर्वी, मार्च २०१८ मध्ये तो ४.२८ टक्के होता. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ४ टक्के या समाधानकारक महागाई अंदाजापेक्षा यंदाचा दर कमी असला तरी तो महिन्यागणिक वाढला आहे.

महागाई दरामध्ये अन्नधान्याच्या किमती महिन्याभरापूर्वीच्या उणेस्थितीतून उंचावत ०.३ टक्क्यांवर आल्या आहेत. तर इंधन व ऊर्जा गटातील किमती १.२४ टक्क्यावरून जवळपास दुप्पट वाढून, २.४२ टक्क्यांवर पोहोचल्या होत्या.

फळे, भाज्यांच्या किमती अजूनही उणे स्थितीत आहेत. गेल्या महिन्यात त्या उणे ५.८८ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. मसाल्यांच्या किमती काहीशा कमी होत त्या १.२५ टक्क्यांपर्यंत स्थिरावल्या आहेत.

जानेवारी २०१८ पर्यंत सलग चार महिने महागाई दर कमी होत होता. मात्र त्यानंतर त्यात आता पुन्हा वाढ नोंदली गेली आहे. यंदाच्या जानेवारीमध्ये महागाई दर २ टक्क्यांच्याही खाली होता. कमी होत असलेल्या महागाई दराला रिझव्‍‌र्ह बँकेच्या सलग दुसऱ्या व्याजदर कपातीची साथ मिळाली आहे. व्यापारी बँकांनीही त्यांचे कर्जाचे व्याजदर काही प्रमाणात कमी केले.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीची अपेक्षा वेळोवेळी व्यक्त केली गेली. घसरता औद्योगिक उत्पादन दर, कमी मागणी, कमी क्रयशक्ती असे चित्र नोटाबंदी, अप्रत्यक्ष करप्रणालीनंतरही कायम आहे.