पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातील नीरव मोदीकडून थकित रकमेची वसूली केली जाईल, अशी ग्वाही स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सोमवारी येथे दिली. पंजाब नॅशनल बँकेच्या हवाल्याने मोदीला देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक बँकेने १,३६० कोटी रुपये दिले आहेत.

रजनीश कुमार यांनी सांगितले की, याबाबत पीएनबीसह अन्य बँकांबरोबर चर्चा सुरू असून त्याबाबतच्या माहितीचेही आदान – प्रधान होत आहे. अन्य बँकांबरोबरच्या सहमतीने ही रक्कम निश्चितच वसूल केली जाईल.

स्टेट बँकेने गीतांजली समूहाला कर्ज दिल्याचे ते म्हणाले. या कंपनीविरुद्ध तक्रारी दाखल असल्या तरी त्याबाबतची वसूली करण्यात काहीही अडचण नाही, असे त्यांनी सांगितले. मोदी व त्याच्या कंपनीला दिलेल्या कर्जाबाबत त्याच्या वसुलीची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

अन्य बँकांप्रमाणेच स्टेट बँकही एकूणच या संदर्भातील कर्जाची प्रक्रिया व कागदपत्रांचा आढावा घेत असून त्यात काहीही गैर आढळले तर कारवाई केली जाईल, तसेच संबंधितांची चौकशीही केली जाईल, असेही कुमार यांनी स्पष्ट केले. याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने काही स्पष्टीकरण अथवा कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याच्या प्रश्नाचे उत्तर कुमार यांनी नकारार्थी दिले.

पीएनबी, स्टेट बँकेप्रमाणेच नीरव मोदी व त्याचे नातेवाईक तसेच संबंधित कंपन्यांना यूनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक यांनीही हमीपत्राच्या भरवशावर कर्ज दिले आहे.