नवी दिल्ली : महिलांकडे नेतृत्व असणाऱ्या आणि त्यांच्याद्वारे संचालित सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएसएमई) उद्योगांच्या संख्येत मावळते आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ७५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आधीच्या आर्थिक वर्षांतील (२०२०-२१) ४.९ लाख उद्योगांच्या तुलनेत ही संख्या आता ८.५९ लाखांवर पोहोचली आहे, अशी माहिती एमएसएमई राज्यमंत्री भानू प्रताप सिंह वर्मा यांनी गुरुवारी संसदेत दिली.

सरकारकडून विकसित नवीन ‘उद्यम’ संकेतस्थळावर महिलांद्वारे संचालित एमएसएमईच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, असेही वर्मा यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये या संकेतस्थळावर ४.९ लाख उद्योजक महिलांनी नोंदणी केली होती. तर २०२१-२२ मध्ये सुमारे ८.५९ लाख महिलांनी नोंदणी केली. केंद्र सरकारने जुलै २०२० मध्ये सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या नोंदणीच्या प्रक्रियेत बदल करून, ऑनलाइन नोंदणीचे ‘उद्यम पोर्टल’ सुरू केले.  रिझव्‍‌र्ह बँकेकडे ३१ मार्च २०२१ च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, देशातील सर्व वाणिज्य बँकांमधील एकूण २११ कोटी ६५ लाख बँक खात्यांपैकी, ७० कोटी ६४ लाख खाती महिला खातेदारांची आहेत.