कोची आणि बंगळुरू येथे दोन मनोरंजन उद्याने चालवीत असलेल्या वंडरेला हॉलिडेज्ने येत्या २१ एप्रिल ते २३ एप्रिलदरम्यान भांडवली बाजारात प्रारंभिक भागविक्रीतून १८० कोटी रुपये उभारण्याची गुरुवारी घोषणा केली. शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या निवडणूक-पूर्व तेजीवर स्वार होऊ पाहणारा हा पहिला ‘आयपीओ’ (भागविक्री) असून, ती आगामी काळातील आयपीओ सुकाळाचीच नांदी ठरेल, असे कयास केले जात आहेत.
वंडरेला हॉलिडेज्ने प्रति समभाग ११५ ते १२५ रु. या किमतीने आपल्या १.४५ कोटी समभागांची विक्री प्रस्तावित केली असून, त्यायोगे प्रवर्तकांचा कंपनीतील २५.६६ भाग हिस्सा सौम्य होईल.
प्राथमिक बाजारपेठेला कमालीच्या मंदीने वेढले असून, २०१३-१४ सालात केवळ एका भागविक्रीने सुयश कमावले. त्यामुळे एकूण शेअर बाजारातील ताजा उत्साह पाहता या भागविक्रीने ही दोन-अडीच वर्षांची मरगळ झटकली जाईल, असा विश्वास या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एडेल्वाइज सिक्युरिटीज्चे सत्येन शाह यांनी व्यक्त केला.
—- ‘आयपीओ’ सुकाळाची आशा —-
सध्याची बाजारातील निवडणूक-पूर्व आशादायी उभारीने गतप्राण झालेल्या आयपीओ बाजारातही जीव फुंकला जाईल, असा विश्वास र्मचट बँका व दलाल-पेढय़ा व्यक्त करीत आहेत. विशेषत: नव्या सरकारकडून अनेक रखडलेली धोरणे मार्गी लागतील या आशेने पायाभूत क्षेत्र, भांडवली वस्तू क्षेत्रातील अनेक कंपन्या आगामी काही महिन्यांत भांडवली बाजारात नशीब अजमावण्याचे धाडस करतील, असे मानले जात आहे.
एल अॅण्ड टी इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स, ग्रेट ईस्टर्न एनर्जी कॉर्प, शारदा क्रॉप केम आणि जीएमआर एनर्जी अशा पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांनी तशा योजना जाहीर केल्या आहेत. याशिवाय नव्या पिढीच्या व्यवसायातील भारत मॅट्रिमोनी, शादी डॉट कॉम, फ्लिफकार्ट यांसारख्या कंपन्यांकडून भांडवल उभारणी प्रस्तावित केली जाऊ शकेल.
शेअर बाजारातील विदेशी वित्ताला बहर
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2014 रोजी प्रकाशित
वंडरेला हॉलिडेज्कडून नांदी; २१ एप्रिलपासून भागविक्री
कोची आणि बंगळुरू येथे दोन मनोरंजन उद्याने चालवीत असलेल्या वंडरेला हॉलिडेज्ने येत्या २१ एप्रिल ते २३ एप्रिलदरम्यान भांडवली बाजारात प्रारंभिक भागविक्रीतून १८० कोटी रुपये उभारण्याची गुरुवारी घोषणा केली.
First published on: 11-04-2014 at 12:55 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wonderla holidays to raise up to rs 180 crore via ipo