जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीच्या दरासंबंधी अंदाज सुधारून घेत, तो ८.४ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेची चाल अपेक्षेपेक्षा धिमी राहिल्याचे तसेच सुधारणांमध्ये अपेक्षित गती दिसत नसल्याने ‘फिच’ने बुधवारी हा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ८.७ टक्के वेगाने वाढेल असा फिचने अंदाज वर्तविला होता. मात्र पुढील आर्थिक वर्षासाठी (२०२२-२३) भारताच्या विकासदराचे अनुमान १० टक्क्यांवरून वाढवत ते तिने १०.३ टक्के असे वाढविले आहे.

वस्तू आणि सेवांना वाढती मागणी आणि पुरवठ्यातील अडचणी कमी होण्याच्या शक्यतेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये अर्थव्यवस्था दोन-अंकी विकासदर गाठेल, असा आशावाद फिचने व्यक्त केला आहे.

सेवा क्षेत्राची वाढ अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिल्याने त्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर – डिसेंबर २०२१) अर्थव्यवस्थेने पुन्हा गती घेतलेली दिसेल. मात्र निर्मिती क्षेत्राची वाढ पुरवठा साखळीतील समस्येमुळे मर्यादित आहे, मात्र येत्या काही महिन्यांत पुरवठ्यातील अडथळे कमी होण्याची अपेक्षा या जागतिक संस्थेने व्यक्त केली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीचा अंदाज खालावतानाच वेगवान लसीकरणच देशाच्या अर्थउभारीस उपकारक ठरेल. मात्र ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या नव्या अवतारामुळे करोना साथ प्रसार आणि टाळेबंदी याबाबतची अनिश्चिातता कायम आहे, असे ‘फिच रेटिंग्ज’ने म्हटले आहे.