‘झुवर’चे १० शहरांत विस्ताराचे लक्ष्य

त्या त्या शहरांमध्ये कारच्या मालकीचे प्रमाण किती हे विस्तारासाठी नवीन शहर निवडीचा मुख्य निकष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आठ कोटींच्या भांडवल उभारणीचे नियोजन

मागणीप्रमाणे गाडीवान अर्थात चालक उपलब्ध करून देण्याच्या अभिनव सेवेत कार्यरत झुवरने मुंबई-पुण्यात बऱ्यापैकी बस्तान बसविल्यानंतर आता वर्षअखेपर्यंत १० शहरांमध्ये विस्तार साधण्याचे नियोजन आखले आहे. या विस्तार कार्यक्रमासाठी उपयोगी ठरेल अशा आठ कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलासाठी गुंतवणूकदारांबरोबर बोलणी सुरू असल्याचेही या नवउद्यमी उपक्रमाने स्पष्ट केले आहे.

मुंबई, पुणे, बंगळुरू या शहरांमध्ये झुवरचे सध्या ३५० सुप्रशिक्षित, विश्वासू आणि कुशल असे गाडीवान (ज्यांना ‘कॅप्टन्स’ संबोधले जाते) सुसज्ज आहेत. अ‍ॅपवर आधारित या सेवेत कोणाही प्रवासी वाहनाच्या मालकांना गरज पडल्यास, विनाविलंब (उशिरात उशिरा ४० मिनिटांत) इच्छित ठिकाणी प्रशिक्षित चालक हजर होतो. नव्या विस्ताराच्या दृष्टीने दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर आणि नागपूर या शहरांवर आपण लक्ष केंद्रित केले असल्याचे झुवरचे सह-संस्थापक सिद्धांत मल्ली यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्या त्या शहरांमध्ये कारच्या मालकीचे प्रमाण किती हे विस्तारासाठी नवीन शहर निवडीचा मुख्य निकष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वर्षभरात १००० चालकांना सेवेत सामावून घेण्याचे सध्या प्रत्येक शहरात दिवसाला सरासरी ५० फेऱ्या हे प्रमाण १०० ते १२० फेऱ्या इतके वाढविण्याचे आपले लक्ष्य आहे, असे सिद्धांत यांनी सांगितले. आर्थिक महसुली लाभात ३० ते ४० टक्के वृद्धीदराचे हे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हर्मीस ग्रुप आणि श्रुत अ‍ॅण्ड होल्डिंग्ज या प्रारंभिक गुंतवणूकदारांच्या बीजभांडवलावर वर्षांरंभी कार्यान्वित झालेल्या कंपनीने अल्पावधीत लक्षणीय पल्ला गाठला असून, नव्याने ८ कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी गुंतवणूकदारांशी तिच्या वाटाघाटी सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली. आगामी महिन्यांत या संबंधाने अंतिम निर्णय होऊन पुढील विस्तार कार्यक्रम मार्गी लागू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Zuver expansion issue