News Flash

डोंगर भासतोय खुजा 

सध्या चीनची गंगाजळी तीन हजार अब्ज डॉलर आहे

सध्या चीनची गंगाजळी तीन हजार अब्ज डॉलर आहे आणि दर महिन्याला त्यातून पन्नासेक अब्ज गायब होताहेत. काही अभ्यासक असेही मानतात की, चीनच्या गंगाजळीचा अंदाजे एक-तृतीयांश भाग हा अतरल साधनांमध्ये गुंतवलेला आहे, म्हणजे तेवढय़ा चलनसाठय़ाचे रूपांतर रोकड डॉलरमध्ये किंवा इतर चलनांमध्ये ताबडतोबीने होऊ  शकणार नाही. ही धारणा खरी असेल तर चीनच्या परकीय चलनसाठय़ाचा डोंगर दिसतो तेवढा कणखर नाही.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला चीनची परकीय चलनाची गंगाजळी जवळपास १७० अब्ज डॉलर होती. म्हणजे तेव्हाच्या भारतीय परकीय चलनसाठय़ाच्या सुमारे चौपट. नंतरची वर्षे चीनसाठी प्रचंड भरभराटीची होती. जगाची फॅक्टरी बनलेल्या चीनची निर्यात चौखूर वाढली. जगभरातून परकीय गुंतवणुकीचा ओघ चीनकडे वाहत होता. या दोन्ही घटकांच्या जोरावर २००६ पर्यंत चीनचा परकीय चलनसाठा एक ट्रिलियनच्या पुढे (एक हजार अब्जांच्या पुढे) पोहोचला. त्यानंतर सरासरी दर तीन वर्षांत चीन एकेक हजार अब्ज जोडत गेला. आणि २०१४च्या मध्यापर्यंत चीनची गंगाजळी चार हजार अब्जांपर्यंत पोहोचली. गेल्या कित्येक वर्षांपासून चीन हा जगातला सर्वात मोठा परकीय चलनसाठा बाळगणारा देश आहे. २०१४ मध्ये भारताच्या परकीय चलनसाठय़ाने तीनशे अब्जांची पातळी ओलांडली होती. म्हणजे चीनच्या एक-दशांशापेक्षा थोडी कमी, पण या लेखाचा विषय तो नाहीये. आजचा लेख आहे २०१४ नंतर चीनच्या बाबतीत काय घडले, त्याबद्दल!

गेल्या वर्षांअखेरीसही चीनचा याबाबतीतला जगातला अव्वल क्रमांक कायम आहे. पण डिसेंबर २०१६च्या शेवटपर्यंत चीनची परकीय चलनाची गंगाजळी उरली आहे ती तीन हजार अब्जांच्या काही बोटे वपर्यंतच. म्हणजे गेल्या अडीच वर्षांमध्ये चीनने साधारण एक-चतुर्थाश परकीय चलनसाठा गमावला आहे. चीनचा परकीय चलनसाठा वाढणे जेवढे रोमांचक होते, तेवढीच त्याची घसरणही नाटय़मय ठरतेय. हे नाटय़ बहुधा चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या अंगावर काटा उभा करतेय. कारण गेल्या काही महिन्यांपासून ही घसरण रोखण्यासाठी चीनने देशातले भांडवल बाहेर नेण्यावर वेगवेगळ्या प्रकारचे र्निबध घालायला सुरुवात केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना देशाबाहेर गुंतवणूक करण्यावरची बंधने जास्त करकचली गेली आहेत. चिनी कंपन्यांचे परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव डोळ्यात तेल घालून तपासले जात आहेत आणि काही प्रस्ताव फेटाळलेही गेले आहेत. परकीय चलनाच्या रोडावणाऱ्या पातळीबद्दल चीनची सरकारी यंत्रणा एवढी चिंतेत का आहे?

परकीय चलनसाठा हा काही देशाच्या अस्मितेचा विषय नाही. पण कुठल्याही देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या संदर्भात परकीय चलनसाठय़ाची एक सुदृढ पातळी राखणे आवश्यक मानले जाते. अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी, परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि देशातल्या मुद्रापुरवठय़ाचा तोल सांभाळण्यासाठी ही गंगाजळी पुरेशा प्रमाणात असावी लागते. विशेषत: ज्या देशांचे स्वत:चे चलन आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी सहजरीत्या स्वीकारले जात नाही त्यांच्यासाठी. ही पातळी धोक्याच्या प्रमाणाच्या खाली ओसरली की अनेकदा त्या देशाच्या चलनाचे मोल चलनबाजारात घसरते, ते पाहणारे चलनबाजारातले सट्टेबाज अशा चलनावर सावज समजून तुटून पडतात आणि मग कोलमडलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी त्या देशाला पदर पसरून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दारात शरण यावे लागते.

सर्वसाधारणपणे पाहिले तर परकीय चलनाची गंगाजळी दोन मुख्य गोष्टींच्या गोळाबेरजेवर अवलंबून असते. एक म्हणजे त्या देशाच्या आयात-निर्यातीतली जमा किंवा तूट. आणि दुसरे म्हणजे त्या देशात येणारे आणि जाणारे भांडवल. कित्येक वर्षे या दोन्ही खात्यांवर चीनसाठी जमाच जमा होती. थेट परकीय गुंतवणुकीसाठी पाश्चात्त्य जगासाठी चीनसारखे दुसरे आकर्षक ठिकाण नव्हते. या दशकात मात्र परिस्थिती थोडीफार बदलू लागली. जगाने आपल्याला एक महासत्ता म्हणून स्वीकारावे, अशी राजकीय महत्त्वाकांक्षा चीन काही काळापासून बाळगून आहे. त्याचा एक भाग म्हणून चीनचे चलन युआन हे डॉलर, युरो यांच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारले जावे, या उद्देशाने चीनने आपल्या सीमा भांडवली व्यवहारांसाठी अधिकाधिक खुल्या करायला सुरुवात केली. चिनी श्रीमंत नागरिक, चिनी कंपन्या आणि सरकारदेखील त्यानंतर झपाटय़ाने परदेशी मालमत्ता खरेदी करू लागले. चीनने आफ्रिकेत खनिजांच्या खाणी खरीदल्या, युरोप आणि अमेरिकेत स्थावर मालमत्तेत गुंतवणूक केली, चिनी कंपन्यांनी परदेशी कंपन्या पादाक्रांत केल्या. काही पाश्चात्त्य देशांमध्ये चीनचा हा खरेदीचा झपाटा पाहून हा चीनचा आर्थिक साम्राज्यवाद आहे, अशी हाकाटी सुरू झाली. याच्या दुसऱ्या बाजूला चीनची स्वत:ची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता थोडी उणावली. हळूहळू वाढणारे मजुरीचे दर, चीनमध्ये बऱ्याच उद्योगांमध्ये निर्माण झालेली अतिरिक्त क्षमता आणि उद्योगांच्या नफ्यांमध्ये जाणवणारे साचलेपण यांचा तो परिणाम होता. या सगळ्यामुळे २०१४ पासून चीनचे भांडवली खाते तूट दाखवू लागले. गेल्या वर्षी पहिल्यांदाच चीनने देशाबाहेर केलेली थेट परकीय गुंतवणूक ही बाकीच्या जगाने चीनमध्ये केलेल्या थेट परकीय गुंतवणुकीपेक्षा जास्त भरली!

अर्थात चीनच्या परकीय चलनाच्या गंगाजळीतली घट ही केवळ चीनच्या परकीय गुंतवणुकीच्या बदललेल्या दिशेमुळे नाही. वित्तीय बाजारातल्या बदलांमुळे या गंगाजळीचे मूल्य घटण्याचंही कारण त्यात आहे. या कहाणीचा दुसरा पदर लक्षात घेण्यासाठी आपल्याला युआनच्या मूल्यातले बदल पाहावे लागतील. या शतकाच्या सुरुवातीला युआन आणि डॉलर यांच्यातला विनिमय दर चीनने एका पातळीवर बांधून ठेवला होता. हळूहळू चीनने युआनचे मूल्य ठरवण्यासाठी चलनबाजाराला मोकळीक द्यायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक वर्षे युआनचे मूल्य वधारत होते. कारण चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये भरघोस जमा असण्याचा तो काळ होता. २००५-०६ मध्ये एका डॉलरसाठी जवळपास आठ युआन मोजावे लागायचे, तो विनिमय दर २०१४च्या सुरुवातीला साधारण सहापर्यंत आला. युआनचे मूल्य वधारत असताना चिनी कंपन्यांना डॉलरमध्ये कर्ज घेणे फायद्याचे ठरले, कारण कर्जाची परतफेड करताना कमी युआनमध्ये काम भागून जात होते. ज्यांना शक्य होते त्यांनी अशी डॉलरमध्ये कर्जे उभारली.

गेल्या दोन वर्षांत मात्र समीकरण बदलायला लागले. युआन थोडा-थोडा कमजोर होऊ  लागला. २०१५-१६ मध्ये युआनच्या घसरणीचा वेग वाढला. जागतिक पातळीवर डॉलर मजबूत होत होता. त्यामुळे काहींनी डॉलरमधल्या कर्जाचे रूपांतर युआनमधल्या कर्जात करायला सुरुवात केली. डॉलरमधली कर्जे फेडण्यासाठी डॉलरची मागणी वाढली. युआनचे मूल्य घसरतेय, हे पाहून काही चिनी गुंतवणूकदारांनी देशाबाहेर गुंतवणूक करण्याचा झपाटा आणखीनच वाढवला. युआन घसरतोय म्हणून भांडवल बाहेर पळतेय आणि भांडवली खात्यावरची तूट वाढतेय म्हणून युआन कमजोर होतोय, असे दुष्टचक्र सुरू झाले. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर युआनच्या किमतीवर आणखी झपाटय़ाने परिणाम झाला. ट्रम्प यांच्या कारकीर्दीत अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडतील आणि अमेरिकेचे व्यापारधोरण बचावात्मक बनून चीनच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होतील, अशी भीती वित्तीय बाजारातल्या मंडळींना वाटतेय. या सगळ्या वातावरणात युआनचा विनिमय दर आता साताच्या दिशेने घरंगळतो आहे. कदाचित त्यामुळेच चिनी यंत्रणा धास्तावली आहे.

एक शक्यता अशीही वर्तवण्यात येते आहे की, चीनच्या परकीय चलनाची गंगाजळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली असावी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कुठल्याही देशाची गंगाजळी पुरेशी आहे की नाही, हे मापण्यासाठी एक समीकरण वापरते. ते समीकरण त्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार, लघुमुदतीची विदेशी कर्जे, देशांतर्गत मुद्रापुरवठा असे घटक विचारात घेते. नाणेनिधीच्या समीकरणानुसार चीनसाठी अशी सुदृढ पातळी पावणेतीन हजार अब्जांच्या आसपास आहे. सध्या चीनची गंगाजळी तीन हजार अब्ज डॉलर आहे आणि दर महिन्याला त्यातून पन्नासेक अब्ज गायब होताहेत. काही अभ्यासक असेही मानतात की, चीनच्या गंगाजळीचा अंदाजे एक-तृतीयांश भाग हा अतरल साधनांमध्ये गुंतवलेला आहे, म्हणजे तेवढय़ा चलनसाठय़ाचे रूपांतर रोकड डॉलरमध्ये किंवा इतर चलनांमध्ये ताबडतोबीने होऊ  शकणार नाही. ही धारणा खरी असेल तर चीनच्या परकीय चलनसाठय़ाचा डोंगर दिसतो तेवढा कणखर नाही.

भांडवलाच्या प्रवाहावर र्निबध टाकून चीनचे अधिकारीही अशा भीतीला बळच देत आहेत. काही चिनी गुंतवणूकदार ते र्निबध चुकवण्यासाठी बिटकॉइनद्वारे भांडवल देशाबाहेर पाठवताहेत, अशा बातम्या आहेत. बाजारात घबराटीची भावना पसरत असल्याची ही लक्षणे आहेत.

अशा र्निबधांची परिणामकारकता ठोसपणे वर्तवणे कठीण असते. बाजारभावनेत घबराटीची लाट हलकी असेल तर असे र्निबध ती लाट वेळेत थोपवून जिरवून टाकू शकतात. पण जर ती लाट तगडी असेल तर मग ती र्निबधांनाच उधळून टाकते आणि आणखी अक्राळविक्राळ रूप घेते. या कहाणीच्या संदर्भात जर लाट तगडी ठरली तर कदाचित युआनचे एका फटक्यात अवमूल्यन स्वीकारूनच चीनला हा अध्याय संपवायला लागेल. अन्यथा, भांडवलाच्या प्रवाहावरचे र्निबध आणखी आवळून युआनची घसरण थांबवण्यात चीनला यश येईल. आजपर्यंतच्या इतिहासात र्निबधांचा प्रभावी वापर करण्यात चीन सहसा यशस्वी ठरत आला आहे. चीनच्या त्या ख्यातीचा या वेळी कस लागणार आहे, एवढे मात्र नक्की.

 

मंगेश सोमण

mangesh_soman@yahoo.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 2:41 am

Web Title: article on economy of china
Next Stories
1 नोटाबदल – एक हंगामी जमाखर्च
2 भांडवली कराविषयी मांडवली शक्य
Just Now!
X