News Flash

बिटुआच्या बेटकुळ्या फुरफुरताहेत, पण..

बऱ्याचदा शॉपिंग मॉलमध्ये मुलांसाठी खेळायची दुकानं असतात.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बऱ्याचदा शॉपिंग मॉलमध्ये मुलांसाठी खेळायची दुकानं असतात. तिथल्या खेळांमधल्या कामगिरीप्रमाणे मुलांना अमुक एक पॉइंटची तिकिटं मिळतात. मग निघताना दुकानाच्या काऊंटरवर त्या तिकिटांच्या बदल्यात मुलं काही छोटय़ा-मोठय़ा भेटवस्तू ‘विकत’ घेतात. त्या काऊंटरपुरता विचार केला तर ती तिकिटं हे एक चलन असतं. पण बाहेरच्या जगासाठी मात्र ते फक्त कागदाचे कपटे असतात! या तिकिटांचाच एक मोठय़ा पातळीवरचा आविष्कार म्हणजे बिटकॉइनसारखी गूढ चलनं (‘क्रिप्टो-करन्सीज’). ही चलनं कागदी स्वरूपात नाहीत, तर डिजिटल स्वरूपात असतात. त्यांच्या निर्मात्यांनी आखून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे काही संगणकीय कूटप्रश्न सोडवणाऱ्यांना या चलनांचं मंथन करता येतं, म्हणजे ते पैदा करता येतात. जे या गूढ चलनांमध्ये आर्थिक व्यवहार करायला तयार असतील, अशांच्या समुदायामध्येच त्यांचे व्यवहार होतात.

अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही चलनाचं मुख्य काम असतं ते आर्थिक विनिमयाचं आणि संपत्ती साठवण्याचं साधन म्हणून. मानवी इतिहासात बऱ्याच वस्तूंनी हे काम केलंय. पण एखाद्या वस्तूला चलनाचं काम करण्यासाठी स्वीकारार्हता लागते. सर्वसाधारणपणे राजकीय सत्तेचा आशीर्वाद त्या मान्यतेसाठी आवश्यक असतो. परंतु काही प्रसंगांमध्ये- उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी किंवा चलनाच्या मागे आपल्या मान्यतेची मोहोर उमटवून तिला ताकद देणारी राजकीय व्यवस्थाच लंगडी पडल्यावर- गरज असते ती ठरावीक राज्यांच्या अखत्यारीच्या पलीकडे जाऊन सार्वत्रिक आणि कालातीत मान्यता असणाऱ्या चलनाची. इतिहासात ती गरज सहसा सोन्याने भागवली. सोन्याची लकाकी, इतर वस्तूंबरोबर सहजपणे प्रक्रिया न होणं, नाणी उमटवण्यास सोयीस्कर असा द्रवीभवनाचा बिंदू, अतिमुबलकही नाही पण अतिदुष्प्राप्यही नाही अशी उपलब्धता, वगैरे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामुळे सोन्याच्या नशिबी अर्थकारणातली ही भूमिका आली होती. कागदी नोटांचा वापर सुरू झाल्यानंतरही बरीच वर्ष अधिकृत चलनाचा एकूण पुरवठा हा त्या त्या राजसत्तेकडे असलेल्या सोन्याच्या साठय़ाच्या प्रमाणात केला जायचा किंवा तसं करणाऱ्या दुसऱ्या एखाद्या चलनाच्या मूल्याशी कायम प्रमाण राखून केला जायचा. साधारण पाच दशकांपूर्वी मात्र अधिकृत चलनांची सोन्याशी असणारी ही नाळ तोडून टाकण्यात आली. आज साऱ्या अधिकृत चलनांची जनमान्यता (आणि म्हणून आर्थिक व्यवहारांसाठी त्यांची स्वीकारार्हता) ही केवळ राजदंडाच्या पाठबळावर आधारलेली आहे. त्यातल्या त्यात ज्या चलनांची मान्यता त्यांच्या राजकीय वेशीच्या बाहेर जाऊन जागतिक पातळीवर स्वीकारली जाते, अशी डॉलर, युरो वगैरे चलनं आंतरराष्ट्रीय चलनांमध्ये गणली जातात. चीनला आपलं युआन हे चलन त्या मालिकेत नेऊन बसवण्याची महत्त्वाकांक्षा काही वर्षांपासून आहे.

सध्याच्या या प्रचलित चलनव्यवस्थेला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या बिटकॉइन या गूढ चलनांच्या अग्रणीचा जन्म झाला तो साधारण आठ वर्षांपूर्वी. बिटकॉइनचं मंथन करण्यासाठी जे संगणकीय कूटप्रश्न सोडवावे लागतात, त्यांच्या काठिण्याची पातळी टप्प्याटप्प्याने वाढत जाईल, अशी रचना बिटकॉइनच्या अज्ञात निर्मात्याने करून ठेवली आहे. त्यामुळे साधारण २.१ कोटींपेक्षा जास्त बिटकॉइन जगात कधीच असू शकणार नाहीत. त्यातल्या सुमारे ८० टक्के बिटकॉइनचं मंथन एव्हाना झालेलं आहे. उरलेल्यांचं मंथन अधिकाधिक खर्चीक आणि दुष्कर होत जातंय. बिटकॉइनच्या जगाचं वैशिष्टय़ असं की त्यातले व्यवहार पूर्णतया सुरक्षित असतात, ते व्यवहार करणाऱ्यांची ओळख पडद्याआड राहते आणि कुठल्याही व्यक्तीचं किंवा संस्थेचं या व्यवहारांवर किंवा बिटकॉइनच्या पुरवठय़ावर नियंत्रण नसतं. म्हणजे, अधिकृत चलनांच्या बाबतीत केंद्रीय बँका आपल्या धोरणांप्रमाणे मुद्रापुरवठा कमी-जास्त करतात, किंवा जागतिक समुदायाने इराणवर किंवा उत्तर कोरियावर आर्थिक व्यवहारांचे निर्बंध लादले, तसले प्रकार बिटकॉइनच्या जगात शक्य नाहीत.

या सगळ्यामुळे तीन प्रकारच्या मंडळींना बिटकॉइनसारख्या चलनांचं आकर्षण असतं. एक म्हणजे राजकीय दमनशक्तीचे विरोधक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असणाऱ्या काही आदर्शवादी बंडखोरांना. गेल्या काही वर्षांमध्ये विकसित देशांमधल्या केंद्रीय बँकांनी अतोनात सैल मुद्राधोरण राबवून अधिकृत चलनांचा मुद्रापुरवठा वारेमाप वाढवला असल्यामुळे या चलनांवरचा लोकांचा विश्वास कधी तरी उडेल आणि ते बिटकॉइनसारख्या खऱ्या अर्थाने जागतिक आणि नियंत्रणमुक्त चलनांकडे वळतील, अशी आशा त्यांना असते. (भविष्यात सोन्याला पुन्हा चलन म्हणून भूमिका मिळेल, असं म्हणणाऱ्यांचा युक्तिवादही याच्याशी मिळताजुळता असतो!). दुसरा गट आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर काळे धंदे करणाऱ्यांचा आणि दहशतवाद्यांचा. त्यांना आपली ओळख लपवून सीमापार व्यवहार झटक्यात करायला बिटकॉइनसारखी चलनं आदर्श वाटतात. काही दिवसांपूर्वी जगभर संगणकीय व्हायरस पसरवून खंडणी मागणाऱ्यांनी त्यासाठी बिटकॉइनचं माध्यमच निवडलं होतं. तिसरा गट आहे तो गुंतवणूकदारांचा. बिटकॉइनची डॉलरमधली किंमत २०१२-१३ पर्यंत दोन आकडय़ांमध्ये असायची, ती अलीकडेच पाच आकडय़ांमध्ये (सध्या सुमारे १४,००० डॉलर!) जाऊन पोचली आहे. अर्थात, मध्ये मोठे उतार-चढावही आले. गेल्या पाच वर्षांमध्ये ३६ प्रसंग असे आले की अवघ्या काही तासांमध्ये बिटकॉइनची किंमत १० टक्क्यांपेक्षाही जास्त कोसळली! तरीही गुंतवणूकदारांचं – खास करून सट्टेबाजांचं – बिटकॉइनबद्दलचं आकर्षण वाढतच आहे. येत्या १८ डिसेंबरपासून तर अमेरिकेतल्या शिकागो र्मकटाइल एक्स्चेंजवर बिटकॉइनच्या किमतीवर आधारलेल्या वायद्यांची खरेदी-विक्री सुरू होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत वैयक्तिक सट्टेबाजांपर्यंत प्रामुख्याने मर्यादित असलेलं हे प्रकरण आता संस्थात्मक गुंतवणूकदारांपर्यंत आणि औपचारिक वित्तीय बाजारांपर्यंत जाऊन पोचणार आहे.

वर नमूद केलेल्या तीन गटांना बिटकॉइनचं असं आकर्षण असलं तरी अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहातलं चलन बनण्यासाठी बिटकॉइनला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. एक तर गैरवापराच्या शक्यतांमुळे बऱ्याच देशांमधल्या अधिकृत व्यवस्था बिटकॉइनच्या विरोधात आहेत. काही महिन्यांपूर्वीच आपल्या देशातलं भांडवल परदेशात जातंय, या भयाने पछाडलेल्या चिनी यंत्रणांनी बिटकॉइन बाजारांवर बंदी घातली होती. बरेच देश बिटकॉइन वापरून केलेले व्यवहार कायदेशीर मानत नाहीत. भारतीय नियामकांनीही आतापर्यंत अशी भूमिका घेतली आहे की या व्यवहारांना कायद्याचं संरक्षण नाही. पण त्याचबरोबर गूढ चलनातले व्यवहार करायला आपल्या सरकारने स्पष्टपणे बंदीही घातलेली नाही. जोपर्यंत या व्यवहारांना सरकारी यंत्रणांचा आशीर्वाद मिळत नाही, तोपर्यंत बिटकॉइनला एखाद्या चलनाइतकी स्वीकारार्हता लाभणं कठीण आहे. इंटरनेटवर वस्तू आणि सेवा विकणारी काही मंडळी बिटकॉइन स्वीकारत असली तरी भौतिक व्यापारी विश्वात मात्र ती संख्या अजून नगण्य आहे. बिटकॉइन हे संपत्ती साठवण्याचं साधन आहे, असंही सध्या तरी बिलकूल म्हणता येणार नाही. बिटकॉइनच्या किमतीतले वेगवान चढउतार कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या पचनशक्तीच्या पलीकडचे आहेत. बिटकॉइनचा वापर विनिमयासाठी कमी आणि सट्टेबाजीसाठी जास्त होत असेपर्यंत ते संपत्ती साठवण्याचं साधन बनू शकणार नाही. बिटकॉइन हे चलन नाही, तर सट्टेबाजांची सोय आहे किंवा तो एक मोठा फ्रॉड आहे, असं अनेक जण मानतात; त्यात काही मोठय़ा बँकांचे मुख्याधिकारी आणि काही नोबेल-विजेते अर्थतज्ज्ञही आहेत.

बिटकॉइनचे समर्थक मात्र असं मानतात की त्याचा पुरवठा कायम मर्यादितच राहणार असल्यामुळे बिटकॉइनच्या किमती भविष्यात सदैव वाढतच राहतील. पण बिटकॉइनना आर्थिक व्यवहारांमधली स्वीकारार्हता मिळेपर्यंत त्या मर्यादित पुरवठय़ाच्या जोरावर तशी हमी देता येणं कठीण आहे. शिवाय खुद्द बिटकॉइनचा पुरवठा मर्यादित राहणार असला तरी इतर गूढ चलनंही स्पर्धेत असतील. बिटकॉइनमागचं मूळ तंत्रज्ञान वापरून, पण त्या पद्धतीतल्या गुप्ततेच्या आवरणाचा गैरवापर टाळू शकेल, असं एखादं दुसरं डिजिटल चलन उद्या काही सरकारांनी त्यांचा आशीर्वाद देऊन मैदानात उतरवलं तर बिटकॉइनचा फुगा फुटूही शकतो.

बिटकॉइनची योग्य किंमत काय असावी, याचं तर्कशुद्ध गणित मांडणं सध्या तरी अशक्य कोटीतलं आहे. इतर गुंतवणुकीच्या साधनांच्या बाबतीत ते बाळगण्यामुळे भविष्यात काय उत्पन्न मिळेल, याच्या आडाख्यांवर त्यांची योग्य किंमत ठरवली जाते. उदाहरणार्थ, समभागांच्या बाबतीत भावी काळातले डिव्हिडंड, रोख्यांच्या बाबतीत व्याजाचं उत्पन्न, स्थावर मालमत्तेच्या बाबतीत भाडे-उत्पन्न, वगैरे. बिटकॉइन हे गुंतवणुकीचं साधन म्हणावं तर त्यातून असं काही नियमित उत्पन्न नाही. बिटकॉइन हे चलन म्हणावं तर चलनाची योग्य किंमत ही त्या चलनातून काय वस्तू विकत घेता येतात, त्या चलनाच्या प्रदेशात महागाईचा दर किती आहे, त्या चलनात कर्जाऊ  दिलेल्या रकमांवरचा व्याजदर काय आहे त्यावर ठरत असते. पण जोपर्यंत बिटकॉइन वस्तूंच्या खरेदीसाठी व्यापकपणे वापरलं जात नाही, तोपर्यंत हे ठोकताळेही त्याच्या बाबतीत शक्य नाहीत.

एकंदर, चालू वर्षांतल्या बिटकॉइनच्या डोळे दिपवणाऱ्या भरारीमुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना त्याचं आकर्षण वाटू लागलं असलं तरी समजून-उमजून करता येईल, अशी ही गुंतवणूक नाही. सट्टेबाजाची निधडी छाती, गरगरवणारे चढउतार पचवण्याची शक्ती आणि मोठी जोखीम घेण्याची ताकद असलेल्यांनीच जावं अशी ती वाट आहे ..काहींसाठी रोमांचक, पण बहुतेकांसाठी डरावनी!

मंगेश सोमण

mangesh_soman@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2017 4:31 am

Web Title: indias central bank warns beware of bitcoin 2
Next Stories
1 सोनू, तुला मूडीज्वर भरोसा नाही का?
2 जीएसटीची फिकी रंगोटी
3 लालभाईंना ध्यास हिरवाईचा
Just Now!
X