जगभरातील राज्यकर्तेही आता महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत. निवडणुकीतील धोरणात्मक डावपेचांची आखणीही प्रक्रिया केलेल्या महामाहितीच्या आधारे केली जात आहे. सरकारी कल्याणकारी योजना परिणामकारकरीत्या राबवावयाच्या असतील तर या महामाहितीचे मोल फार मोठे आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांगल्या अर्थाने चौकस बुद्धीचे आपण कौतुक करतो, पण वाईट अर्थाने जिथे-तिथे नाक खुपसणारा असे दूषणपण देतो. पण या सर्वच चौकस वृत्तीच्या माणसांनी जमवलेल्या माहितीचा उपयोग ते कसा करतात यावरून ते कौतुकास पात्र आहेत की दूषणाला पात्र आहेत हे आपण ठरवतो. जगातील एका महान तत्त्ववेत्त्याने म्हटले होते की, ज्या माहितीचा माझ्याशी संबंध नाही किंवा ज्या माहितीमुळे मला कोणतेही नुकसान-नफा नाही ती माहिती मला देऊच नका! अशी माहिती देण्या-घेण्याच्या प्रक्रियेला आपण गावगप्पा किंवा कुटाळक्या अशी संबोधने वापरतो. पण या बदलत्या युगात माहिती ही एक अतिशय मौल्यवान संपत्ती बनू पाहत आहे. तंत्रज्ञानक्रांती व संगणकीय महाजालाबरोबर या माहितीचे अर्निबध स्रोत निर्माण झाले आहेत. आता केवळ माहितीच नाही तर महामाहितीचे युग अवतरते आहे. कोणत्याही उद्योगाला या महामाहितीचा उपयोग आपली उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी कसा करून घेता येईल यावर नवनवीन आराखडे बांधले जात आहेत. जीवघेणी स्पर्धा आणि मान मोडणारी गती या अडकित्त्यात सापडलेले आजचे उद्योग हे उद्योगवाढीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत आणि याच प्रक्रियेत महामाहितीचे मोल दिवसागणिक वाढत चालले आहे. आज बाजारपेठेचा भूगोल इतिहासजमा होत असताना मला काय माहिती आहे हे जेवढे महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही मला ते कधी माहीत झाले हेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाजारात जेव्हा एखाद्या गोष्टीचे मोल वाढत जाते तेव्हा त्याची उपयुक्तता व मागणीही वाढत जाते. मागणी वाढत गेली की त्या मालाची किंमत वाढत जाते. ज्यांच्याकडे या माहितीच्या मालाचा साठा असतो त्यांना अधिक नफा होतो. या अधिक नफ्याच्या आकर्षणाने नवीन उद्योग प्रमेये बाजारात येतात व पुरवठा वाढत जातो व किमती व मोल यांच्यातील समतोल राखला जातो. या गणितातील महत्त्वाचे पाऊल म्हणजे या मौल्यवान माहितीचा पुरवठा वाढवणे आणि म्हणूनच या महा माहितीच्या आधारावर आता नवीन उद्योग प्रमेयांची उभारणी होताना दिसते आहे. संगणकीय तंत्रज्ञान, दूरसंचारातील क्रांती, बाजारपेठांची गरज, ग्राहकांची सोय अशा अनेक बाबींना एकत्र करून या महामाहितीचा नवीन उद्योग आता फोफावत चालला आहे. या उद्योगांचा फायदा जसा मोठय़ा प्रस्थापित उद्योगांना आपली उत्पादकता व नफा वाढवण्यासाठी होतो तसाच तो ग्राहकांनाही होतो. आज मोठमोठय़ा बाजारपेठेत पुरवठादारांच्या मांदियाळीत माझी गरज काय हेच ग्राहक विसरू लागला आहे व बऱ्याचदा गोंधळू लागला आहे. महामाहितीच्या उद्योगांनी तयार केलेल्या ‘माला’चा उपयोग या ग्राहकांनाही वरदान ठरत आहे. उदाहरणार्थ, मी एखादे पार्सल परगावात पाठवले तर ते तेथे पोचेपर्यंत मला पत्ताही नसायचा की ते कोठे आहे. पण आज माहितीच्या आधारे त्या पार्सलची संपूर्ण हालचाल मला माझ्या चलत दूरध्वनीवरही मिळू शकते. मला मिळणारी ही माहिती मला अत्यंत सोईची वाटते. ही माहिती मला आपोआप मिळत नाही तर कोणी तरी ही माहिती सतत जमा करत असतो, कोणी तरी त्यावर प्रक्रिया करत असतो आणि कोणी तरी ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत असतो. महामाहितीच्या उद्योगाची ही तीन नवीन प्रमेये आहेत. स्वत:करिता माहिती मिळवून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेतच, पण आता या माहितीची दलाली करणारेही बाजारातील या नवीन उद्योगाचे भागीदार झाले आहेत.
कोणत्याही माणसाला मिळणारी माहिती कधीच नकोशी वाटत नाही. पण त्या माहितीवर तो पुढे काय प्रक्रिया करतो व निर्णय घेताना त्या प्रक्रिया केलेल्या माहितीचा कसा उपयोग करून घेतो यावर त्या माहितीचे मोल अवलंबून असते. फार पूर्वीपासून प्रत्येक राजाचे हेरखाते किती सक्षम आहे त्यावर त्याचे यश अवलंबून असायचे. औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक हेरगिरीलाही महत्त्व आले. प्रतिस्पर्धी उद्योगाची पुढची चाल काय असेल हे मला आधी समजले तर बाजारपेठेत मला त्याचा खूप फायदा होतो. भांडवली बाजारपेठेत तर वायद्याचे भाव, समभागाचे भाव हे पूर्णपणे मिळणाऱ्या माहितीच्या आधारावरच आराखडे बांधत ठरत असतात. प्रत्येक दलाल हा आपआपल्या ग्राहकाला ही माहिती देऊन त्याचा व आपला फायदा कसा होईल इकडे बघत असतात. याच माहितीच्या आधारावर ब्लूमबर्ग, थॉमसन रॉयटर्स असे दलाली उद्योग सुरू झाले व त्यांचे उद्योग आज या केवळ महामाहितीच्या आधारावर हजारो कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. मायकेल ब्लूमबर्गने १९८१ साली सुरू केलेल्या कंपनीमुळे त्याची स्वत:ची मालमत्ता आज ३०,००० कोटी रुपयांहून अधिक आहे! आज भारतात काही पत्रकारांनी एकत्र येऊन कोजन्सीस नावाची अशीच माहितीची दलाली करणारी कंपनी सुरू केली. माहिती मिळवून ती एकत्रित करणे, त्याची योग्य मांडणी करणे हेही उद्योग प्रमेय होऊ शकते. अमेरिकेतील एका किरकोळ साखळी दुकानांच्या उद्योगात, एका प्रभागामध्ये संगणकीय प्रणालीतून जेव्हा त्यांच्या विक्रीच्या माहितीवर प्रक्रिया करण्यात आली तेव्हा असे लक्षात आले की, लहान मुलांचे लंगोट, वेष्टनातील खाद्यपदार्थ व बीअर या तीन असंबंधित वस्तूंचा संबंध आहे असा भास होत होता. अधिक खोलात शिरल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्या प्रभागात तरुण जोडप्यांचे प्रमाण जास्त होते. बायकोने नवऱ्याला कार्यालयातून येताना मुलांसाठी लंगोट व रात्रीच्या जेवणाचे पदार्थ आणायला सांगितले. तो तरुण त्या दोन गोष्टींबरोबर बीअरच्या २-३ बाटल्याही खरेदी करत होता. या तिन्ही गोष्टी दुकानात लांब लांब ठेवलेल्या होत्या. त्यामुळे गाडी लांबवर पार्क करून तिन्ही गोष्टी खरेदी करून पैसे देऊन जायला त्याला वेळ लागायचा. त्या दुकानात जेव्हा तिन्ही गोष्टी जवळजवळ मांडण्यात आल्या तेव्हा दुकानाचा खप ३० टक्क्यांनी वाढला. आज उद्योगधंद्यांमध्ये अशी अनेक उदाहरणे दिसत आहेत. आता मोटारगाडय़ांचे उदाहरण घ्या. माझ्या गाडीत मी चाक कसे पकडतो आहे, गाडी किती वेळ किती वेगाने पळत आहे, पायांचा दाब कसा पडतो आहे असे कित्येक माहितीबिंदू गाडीतील संगणक जमा करतो आणि एका विशिष्ट वेळी मला घंटानाद करून सांगतो की, मालक, तुम्ही आता चहापानासाठी थोडे थांबावे व मग परत प्रवास सुरू करावा! सुरक्षिततेच्या दृष्टीने गाडीचा हा गुण मला खूप आकर्षक वाटतो. इंग्लंडमधील ‘टेस्को’ नावाचा किरकोळ बाजारातील उद्योग दर महिन्याला १५० कोटी माहितीबिंदू जमा करतो. याचा उपयोग कोणत्या ग्राहकांना काय गरज आहे, दररोजच्या वस्तूंच्या दरांचे बदल कसे करावेत, कोणत्या मालाला जास्त सवलतीचे आकर्षण द्यावे असे अनेक निर्णय या महामाहितीच्या प्रक्रियेतून आलेल्या निकालांच्या आधारे घेतले जातात. अ‍ॅमेझॉन या कंपनीने तर असा दावा केला आहे की, या जमवलेल्या माहितीच्या आधारे ते ग्राहकांना बऱ्याच शिफारशी करतात. त्यांच्या एकंदर विक्रीच्या ३०% हिस्सा हा अशा शिफारशींवर आधारित विक्रीचा असतो. आज महाजालावर मी एखादे पुस्तक विकत घेतले किंवा एखादे गाणे विकत घेतले तर लगेच हे पुस्तक विकत घेणाऱ्यांनी ही-ही पुस्तकेपण विकत घेतली आहेत किंवा कोणती इतर गाणी तुमच्या आवडीची असतील वगैरे शिफारशी टपकन पडद्यावर येतात. जेणेकरून मी ती पुस्तके किंवा गाणी खरेदी करावीत. विक्रीच्या वाढीबरोबर ग्राहक म्हणून मलाही या माहितीचा मोठा उपयोग होतो.
जगभरातील राज्यकर्तेही आता या महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत. निवडणुकांची संपूर्ण धोरणात्मक डावपेचांची आखणी ही या प्रक्रिया केलेल्या महामाहितीच्या आधारेच तर केली जाते. या माहितीचे एकत्रीकरण करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योजक आज जगभरात सर्वच राजकीय पक्षांना आपला ‘माल’ विकून श्रीमंत होताना दिसत आहेत. पण याचबरोबर सरकारी कल्याणकारी योजना परिणामकारकरीत्या राबवयाच्या असतील तर या महामाहितीचे मोल फार मोठे आहेत. अशा योजनांच्या यशस्वी सक्षमीकरणामुळे जर राजकीय पक्ष निवडून येऊ लागले तर निवडणुकीतील इतर वाम मार्गानाही आळा बसेल. महामाहितीचे मोल असे सामाजिक व राजकीय फायद्याचेही आहे. एका जागतिक सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार जर अमेरिकन सरकारने या महामाहितीचा योग्य उपयोग केला तर वर्षांकाठी त्यांची १८ लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकेल.
अर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे महामाहितीच्या या उद्योगालाही दुसरी बाजू आहे. ही माहिती जमा करताना तुम्ही कोणाच्या खासगी आयुष्यात किंवा गोपनीय गोष्टीत लुडबुड करीत नाही ना, हे बघणे महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीचे कोणते माहितीबिंदू हे गोपनीय आहेत व कोणते माहितीबिंदू हे महामाहितीचा भाग म्हणून वापरताना विकता येतील याचे भान या उद्योगाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. भारतात आधार कार्डाच्या संदर्भात जमा केलेले भारतीय नागरिकांचे माहितीबिंदू कसे व कोठे वापरता येतील किंवा येणार नाहीत या बाबतीचे निर्णय आता न्यायालयीन वादात अडकले आहेत. आताच्या नवीन चुणचुणीत चलत दूरध्वनींची ध्वनिसंवर्धक यंत्रणा ही २४ तास सुरू राहू शकते व या आधारे बाजूला दूरध्वनी ठेवून तुमचे संपूर्ण संभाषण त्यावर कोणी बोलत नसतानाही मला ऐकता येते. हे वैयक्तिक गोपनीयतेचे सरळ सरळ उल्लंघन आहे. पण आज मी माहिती उद्योगात अशा संगणकीय प्रणाली पाहिल्या आहेत की, ते हे काम करतात. आज त्याचा उपयोग तुम्ही दूरदर्शनवर कोणत्या जाहिराती- कार्यक्रम बघता वगैरे माहितीबिंदू जमा करण्यासाठी होतो. पण या सर्वाचा दुरुपयोगही होऊ शकतो. यामुळे उद्योगाने व समाजाने दक्ष राहणे गरजेचे आहे. माहितीचे हे पर्वत उभे राहत असताना व त्यातून नवोद्योग तयार होत असताना त्याच्यामागचा हेतूही महत्त्वाचा आहे. अग्नीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठीही होतो व सारे भस्मसात करण्यासही होतो. आपण या महामाहितीचा कसा उपयोग करणार, हे त्या त्या समाजाने, बाजारपेठेने, उद्योगांनी व राज्यकर्त्यांनी ठरवायचे आहे. महामाहितीचे मोल त्यावरच ठरणार आहे.

लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल
deepak.ghaisas@gencoval.com

मराठीतील सर्व अर्थ विकासाचे उद्योग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on information
First published on: 11-12-2015 at 01:23 IST