भारतात जर नवोद्योगांची यशोगाथा मांडायची असेल तर आम्ही भारतात सिलिकॉन व्हॅली बनवू, असे म्हणण्यापेक्षा तेथील यशस्वितेच्या कारणांचा अभ्यास करून ती भारतात कशी आणता येतील याचा विचार होणे आवश्यक आहे.

जगाच्या गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात संपूर्ण जगातील बहुतेक लोकांवर ज्या भूगोलाचा जास्तीत जास्त परिणाम झाला असेल तर तो अमेरिकेत ओळखल्या जाणाऱ्या सिलिकॉन व्हॅली या भौगोलिक भागाचा! सॅनफ्रॅन्सिस्को शहराच्या दक्षिण पूर्वेला पावलो अल्टो व सॅनहोजे उपनगरांच्या आजूबाजूला पसरलेले हे खोरे. सँटा क्लारा हे या खोऱ्याचे मूळ नाव. जानेवारी १९७१ मध्ये तेथे असणाऱ्या अर्धवाहक उत्पादन उद्योगांमुळे गमतीने एका वर्तमानपत्राने या खोऱ्याचे नाव सिलिकॉन व्हॅली केले. पुढे हा अर्धवाहकाचा उद्योग जपान व तैवान या देशांनी खेचून नेला, पण अर्धवाहकातील मूळ कच्चा माल म्हणजे सिलिकॉनच्या नावाने हे खोरे आजही जगाच्या नकाशावर हेवा वाटावा असे स्थान मिळवून आहे. मी या खोऱ्यात गेल्या २५ वर्षांत कित्येक फेऱ्या केल्या व या काळातील बदलत्या औद्योगिक वातावरणाचा साक्षीदार ठरलो. अगदी १९८९ मध्ये झालेला भयंकर भूकंप मी पाहिला. या भागातील अर्धवाहक उद्योग खूप जवळून पाहता आले. संगणकाच्या विकासाबरोबर ह्य़ुलेट पॅकार्डसारखी कंपनी दुसऱ्या महायुद्धानंतर या खोऱ्यात सुरू झाली. स्टॅनफर्ड विश्वविद्यालयाच्या फ्रेड्रिक टरमन यांनी ह्य़ुलेट व पॅकार्ड या दोन विद्यार्थ्यांना हा नवोद्योग काढण्यास प्रोत्साहन दिले व त्यानंतरच्या ५०-६० वर्षांत एखादे व्रत असावे त्याप्रमाणे वेगवेगळ्या नवोद्योगांची सुरुवात या खोऱ्यात सुरू झाली. वास्तविक १९९०च्या दशकात मी जेव्हा बॉस्टनजवळच्या रुट १२८ या मार्गावर जात असे तेव्हा तेथील डेल, प्राइम, वँग अशा कित्येक जागतिक संगणक कंपन्या तिथे फोफावल्या होत्या. पण पुढे या कंपन्यांचा प्रभाव कमी होत गेला. आजच्या पिढीला तर वँग व प्राइमसारखी संगणकाची नावेही माहीत नसतील, पण ह्य़ुलेट पॅकार्डबरोबर सुरू झालेला हा नवोद्योगांचा महायज्ञ या पश्चिम अमेरिकेतील खोऱ्याने आजही लक्षणीयरीत्या चालू ठेवला आहे. आज जगातील बहुतेक सर्वच मानवजातीच्या जीवनात आमूलाग्र बदल करणाऱ्या अ‍ॅपल, गुगल, ई-बे, सिस्को, फेसबुक अशा सर्वच कंपन्यांची कल्पना व जन्म हा या सिलिकॉन व्हॅलीत झाला व जगभरातील उद्योगांवर व लोकांवर त्या अधिराज्य गाजवू लागल्या. कधी काळी फक्त फळ-फळांची निर्यात व शेतीवर अवलंबून असलेली या खोऱ्याची अर्थव्यवस्था गेल्या ६० वर्षांत पूर्ण बदलून गेली. आज या गेल्या २० वर्षांत सुरू झालेल्या नवोद्योगाचे भांडवली बाजारातील मूल्य हे कित्येक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाएवढे मोठे असेल. एकटय़ा अ‍ॅपलचे बाजारमूल्य आज ६१,४३० कोटी डॉलर एवढे आहे. सिस्कोचे बाजारमूल्य आज १२,७८० कोटी डॉलर एवढे आहे. भांडवल बाजारमूल्यांचे हे आकडे पाहिले आणि फेसबुकसारख्या नुकत्याच आलेल्या कंपनीचे बाजारमूल्य २४,५८० कोटी डॉलर एवढे आहे व या कंपनीचा आज समाजजीवनावर झालेला प्रभाव पाहिला तर सिलिकॉन व्हॅलीच्या नवोद्योगांचे हे सुसंगत यश हे जगातील कोणत्याही माणसाला हेवा वाटावा असे ठरते.
सिलिकॉन व्हॅलीतील नवोद्योगांच्या या यशाचे रहस्य काय या विषयी जगात वारंवार चर्चा होतात. व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, अर्थतज्ज्ञ, राजकारणी अशा सर्वच क्षेत्रांतील लोकांनी आपापल्या परीने हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला, पण हे नेमके रहस्य काय आहे हे अजून समजत नाही. खुद्द अमेरिकेत आधी म्हटल्याप्रमाणे रुट १२८ हा भौगोलिक भाग पूर्व किनाऱ्यावरचाच नव्हे तर जागतिक संगणक उद्योगाचे केंद्रस्थान होता, पण सिलिकॉन व्हॅलीने ही जागा दोन-तीन दशकांपूर्वी हळूहळू काबीज केली व आज जागतिक स्तरावर नवोद्योगांचे माहेरघर, काशी, मक्का वगैरे स्थानावर निर्विवादपणे नामांकित झाले. या रहस्यामागे कदाचित अनेक कारणे असतील. पण आज जगातील कोणत्याही राजकारणी पुढाऱ्याला किंवा उद्योजकाला किंवा अर्थतज्ज्ञाला विचारा, त्या प्रत्येकाला स्वत:च्या देशात सिलिकॉन व्हॅली बनवायची असते. जपान-तैवानमध्ये हा प्रयत्न झाला. इस्रायलमध्ये प्रयत्न होत आहे, तसेच चीनमध्येही ‘सिलिकॉन व्हॅली’ची प्रतिकृती निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, पण कोणालाच अजूनही म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. याच काळात अमेरिकेतील या खोऱ्यात नवीन उद्योग जन्माला येत आहेत व जागतिक स्तरावर घवघवीत यश मिळवण्याची त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. वास्तविक एका पाहणीनुसार या खोऱ्यातील नवोद्योगांचे अध्र्याहून अधिक प्रवर्तक हे जगातील दुसऱ्या देशातून आलेले आहेत. जगातील प्रत्येक तंत्रज्ञाला आपण अमेरिकेत जाऊन काम करावे अशी प्रबळ आंतरिक इच्छा असते. भारताप्रमाणेच कित्येक देशांतील तंत्र-विज्ञानातील हुशार विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत जातात व तेथेच स्थायिक होतात. ‘सिलिकॉन व्हॅली’मधील प्राथमिक यशामुळे, ह्य़ुलेट पॅकार्डसारख्या कंपन्यांमुळे या भूगोलाचे जगातील सर्वच अव्वल विद्यार्थ्यांना आकर्षण वाटते, मग रुट १२८ वरील संगणक कंपन्यांमध्येही हाच कल का दिसला नाही? याचे एक कारण म्हणजे या कंपन्या मोठय़ा होताना त्यांची संस्था म्हणून घडणारी रचना फार ताठर होत गेली. त्यामुळे त्यात भरती होणाऱ्या नवीन अव्वल तरुणांना वपर्यंत पोहोचायचे असेल तर खूप वेळ लागणार होता. व्यवस्थापकीय तंत्रांमुळे या कंपन्यांनी जे शिस्तीचे कडक धोरण अवलंबले त्यामुळे या तरुणांना विचारांचा व कामाचा मोकळेपणा मिळेनासा झाला. या कंपन्यांची प्रयोगशीलता ही तेथील एका विभागापुरतीच मर्यादित राहिली. अशा वातावरणात गुदमरलेली ती तरुण मंडळी मग पश्चिम किनाऱ्यावरील या खोऱ्यात पोहोचू लागली. तिथे संस्थांची रचना ही मनोऱ्याप्रमाणे उभी न राहता सपाट होती व वातावरणात मोकळेपणा होता, प्रयोगशीलतेला वाव होता. त्यामुळेच कदाचित हे तरुण-तरुणी येथील संस्थांत रमले. नवीन गोष्टींचा शोध घेत राहिले, नवीन तंत्रज्ञान बनवत राहिले. सिलिकॉन व्हॅलीच्या यशाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
झपाटलेल्या तरुणांबरोबरच आधी यशस्वी झालेल्या लोकांनी ‘जोखीम भांडवल’ संकल्पनेला आकार दिला. हे जोखीम भांडवल घेत नवीन संशोधकांनी व तंत्रज्ञांनी नवीन संस्था उभारल्या व यशाचे हे चक्र वेगाने पुढे जायला लागले. जोखीम भांडवल ही कदाचित सिलिकॉन व्हॅलीने औद्योगिक जगताला दिलेली मोठी देणगी आहे. मी एकदा सॅन मटाओला राहत असताना सॅण्डहिल नावाच्या उपनगराला भेट दिली. तेथे एक उपाहारगृह आहे. सकाळच्या नाश्त्याला तेथे पोहोचल्यावर प्रत्येक टेबलावर एका बाजूला पन्नाशीतली एक-दोन माणसे व दुसऱ्या बाजूला २५-२७ वर्षांचे तरुण-तरुणी असा देखावा होता. जोखीम भांडवल द्यायचे की नाही याबाबत प्रकल्पांवर चर्चा करणारी ही मंडळी होती. प्रत्येक टेबलावर एक टॅब आणि ही तरुण मंडळी ज्येष्ठ भांडवल देणाऱ्या व्यक्तींना समजावून सांगत होती. वातावरणात पूर्ण मोकळेपणा होता. माझी ओळख असल्याने मी दोन-तीन टेबलांवरील चर्चेत भाग घेतला. प्रथमत: मूर्खपणाच्या वाटतील, अशा कल्पनांपासून जग बदलून टाकू शकतील, अशा कल्पनांबद्दल चर्चा होत होत्या. मुलाखतीत हसतखेळतेपणा असला तरी तरुण वर्गाचा अभ्यास चोख होता व प्रश्नकर्तेही गंभीरपणे चर्चा करीत होते. अशा २-३ मुलाखतींमध्येच १० ते ५० कोटी रुपयांचे भांडवल पक्के केले जाते. हा नुसता पैशाचा प्रश्न नाही तर नवोद्योगांकडे बघण्याच्या दृष्टिकोनातील फरक आहे. येथे धंद्यातील जोखमीला, उद्योगातील धोक्यांना कोणी घाबरत नाही. प्रत्येक अपयशातून नवीन शिकून मंडळी आणखी एका नवोद्योगाला तयार होतात. उद्योगातील तोटा किंवा तो बंद पडणे ही नामुष्की मानली जात नाही, तर अशा परिस्थितीतून तावून-सुलाखून निघालेल्या उद्योजकांना पुढच्या उद्योगाच्या भांडवलासाठी जास्त पात्र मानण्यात येते. या भूभागात मोठय़ा प्रमाणावर भारतीय आहेत व खासकरून कित्येक मराठी उद्योजक आहेत. एखादी कंपनी बंद झाली तर हेच उद्योजक व तंत्रज्ञ कर्मचारी एखाद्या शोभादर्शक यंत्राप्रमाणे नवीन कंपू बनवतात व पुढच्या उद्योगाच्या तयारीला लागतात. म्हणजे या खोऱ्यात राहणारा मराठी माणूसही पूर्ण बदललेला आढळला. अशा वेळी ही उद्योजक वृत्तीही जनुकीय नसून या खोऱ्याच्या हवेत व पाण्यातच आहे की काय, असा संशयही कधी कधी मला येतो! या महिन्याच्या अखेरीस भारताचे पंतप्रधान सिलिकॉन व्हॅलीला भेट देणार आहेत. त्यांचे नेहमीप्रमाणे जोरदार उत्कृष्ट भाषण होईल. भारतातील प्रत्येक दूरदर्शन संच अगदी मध्यरात्री ते दाखवेल, पण पुढे काय? भारतात जर नवोद्योगांची यशोगाथा मांडायची असेल तर आम्ही भारतात सिलिकॉन व्हॅली बनवू, असे म्हणण्यापेक्षा तेथील यशस्वितेच्या कारणांचा अभ्यास करून ती भारतात कशी आणता येतील याचा विचार होणे आवश्यक आहे. आज भारतात स्थानिक व परदेशीय ‘जोखीम भांडवल’ येऊ पाहत आहेत, पण अनिश्चित करप्रणाली व करकायदे व त्याची होणारी विचित्र अंमलबजावणी अत्यंत निराशाजनक आहे. उद्योगातील अपयश हा कलंक मानणारी भारतीय मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
सिलिकॉन व्हॅलीत जेवढय़ा यशस्वी उद्योगांचे नाव आहे त्याच्या निदान पाचपट उद्योग हे अयशस्वी होऊन बंद पडले आहेत, पण या बंद पडलेल्या उद्योजकाने पुन्हा उभे राहून नवीन उद्योग सुरू केल्याची जेवढी उदाहरणे तेथे आहेत त्याच्या १० टक्के उदाहरणेही भारतात नाहीत. स्वत:च्या नातेवाईकांना, सग्या-सोयऱ्यांना कर्ज देऊन ती बुडीत काढणाऱ्या व करदात्यांचे कोटय़वधी रुपये घशाखाली घालणाऱ्या संस्थांनी हाच पैसा किंवा त्याचा काही भाग प्रामाणिक नवोद्योग ओळखून त्यांच्या उद्योगात जोखीम भांडवल म्हणून टाकला असता तर दरवर्षी सरकारला त्यांच्या भांडवलात पैसा ओतायची वेळ आली नसती आणि त्याहून मुलांच्या कल्पकतेला, प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी शिक्षण व्यवस्था या शिक्षणसम्राटांच्या कचाटय़ातून बाहेर काढल्याशिवाय भारतात येणार नाही. या व अशा अनेक गोष्टी जर आपले पंतप्रधान सिलिकॉन व्हॅलीतील यशस्वी नवोद्योगांशी चर्चा करून घेऊन आले व भारतात राबविल्या तर नुसत्या रोजगारनिर्मितीबरोबर तरुणांच्या कल्पकतेला वाव मिळून सर्व भारतच सिलिकॉन व्हॅलीप्रमाणे जगाला हेवा वाटावा, अशी यशस्विता दाखवू शकेल, पण भारतीयांनी किती आशादायी असावे यालाही काही सीमा आहेत!

दीपक घैसास

> लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल deepak.ghaisas@gencoval.com

> उद्याच्या अंकात गिरीश कुबेर यांचे ‘अन्यथा’ हे सदर