वित्तीय सेवा क्षेत्रातील नवप्रवाह आणि गुंतवणूक नाविन्याचा विश्लेषणात्मक वेध घेणारे सदर
२००९ साली सेन्सेक्सने ८,५००ची पातळी गाठली. सेन्सेक्सच्या प्रारभांपासून (१९७८) विचार केला तर त्याचा सरासरी वार्षिक परतावा आहे १७.५ टक्के. मग २००९च्या सेन्सेक्सच्या पातळीनुसार गणित मांडले तर पुढील तीन वर्षांमध्ये (२०१६) सेन्सेक्स २६,३००ची पातळी गाठू शकतो. पण तुम्ही-आम्ही बाजाराची काळजी करण्यापेक्षा ज्या कंपन्यांचे ऐतिहासिक यशापयश वाखाणण्याजोगे आहे त्यामध्ये गुंतवणूक करावी आणि संयम बाळगावा हेच महत्त्वाचे नव्हे काय?
गेल्या वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था अतिशय केविलवाणी झाली होती. सकल राष्ट्रीय उत्पन्नातील घट, रुपयाचे अवमूल्यन, व्याजदर वाढ, चलनवाढ, अर्थसंकल्पीय- व्यापारी तूट, अप्रशासकीय कारभार अशा सर्वच आघाडय़ांवर अधोगती झाल्याने आपली अर्थव्यवस्था सुमारे १० वष्रे मागे गेली. वाढीव व्याजदरांमुळे कंपन्यांच्या भांडवली खर्चामध्ये मोठय़ा प्रमाणात कपात झाली. विक्री कमी झाल्याने कंपन्यांच्या नफ्यावर विपरीत परिणाम झाला. थोडक्यात, कौतुकास्पद म्हणावे अशी एकही गोष्ट घडली नाही.
आज २०१४च्या सुरुवातीला हीच परिस्थिती आहे आणि नजीकच्या भविष्यात त्यात काहीही सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जागतिकीकरणामुळे आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात अमेरिका आणि युरोपीय देशांमधील आíथक घडामोडींवर विसंबून आहे आणि या दोन्ही ठिकाणी आपल्यापेक्षा अधिक बिकट स्थिती आहे. अमेरिकेमध्ये बेलगाम नोटा छापण्याचा धंदा (महिन्याला ८५ अब्ज डॉलर) सुरूच आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये त्या देशातील आíथक घडी सुधारण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत त्यांचा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे म्हणावा तसा परिणाम झाला नाही. आजही तो देश जगातील सर्वात मोठा कर्जबाजारी (१८ लाख डॉलर म्हणजे सुमारे १०,८०,००० अब्ज रुपये) देश आहे आणि सप्टेंबर २०१३ पासून त्यात दर  दिवशी २.५० अब्ज डॉलर इतकी वाढ होत आहे. बेकारीचे प्रमाण आजही १३.२० टक्के आहे. तरीही त्यांच्या शेअर बाजाराचा निर्देशांक (ऊ६ खल्ली२) २००९च्या तुलनेत (६,८००) सुमारे ९००० अंश (१५,७००) वर आहे. त्यांच्या दुसऱ्या निर्देशांकाने (र & ढ 500) २०१३मध्ये ५० वेळा नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले.
अर्थव्यवस्था डळमळीत असताना हे असे का? सर्वसाधारण आíथक प्रगतीसाठी छापलेल्या नोटांचा ओघ औद्योगिक विकासाकडे जाण्याऐवजी शेअर बाजाराकडे वळविला गेला. त्यातील बराच पसा भारतीय बाजारातही आला. त्यामुळे डिसेंबर २०१३मध्ये बीएसई सेन्सेक्सने नवीन ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला. नवीन वर्षांमध्ये या नोटा छापण्याच्या (क्यूई३) कामावर र्निबध येण्याची शक्यता आहे आणि तसे जर झाले तर त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होणार याबाबत आज तरी अस्पष्टता आहे. मे २०१३मध्ये नोटा छापण्यावर र्निबध आणले आणि सेन्सेक्स २०,००० वरून १८,००० पर्यंत घसरला. अशाच प्रकारच्या कारवाईमुळे २३ जुल २०१३ला २०,३००च्या आसपास असलेल्या सेन्सेक्सने २० ऑगस्टपर्यंत १७,०००ची पातळी गाठली. परंतु १४ डिसेंबर २०१३ला या र्निबधात्मक कारवाईबाबत घोषणा झाली आणि सेन्सेक्सने नवीन उच्चांक प्रस्थापित केला. आजही त्याने २१,०००च्या आसपासची पातळी टिकवून ठेवली आहे.
आपल्या देशातील बाजारावर परिणाम करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे सार्वत्रिक निवडणुका गेल्या १० वर्षांमध्ये सरकारने जे काय तारे तोडले आहेत त्यामुळे २०१४ साली होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. भ्रष्टाचार, अनेक प्रकारचे घोटाळे, काही कारण नसताना लाल फितीत अडकवून ठेवलेले मोठ-मोठे प्रकल्प, यामध्ये गुंतलेल्या सध्याच्या सरकारने निवडणुकांतील मतपेटय़ांवर डोळा ठेवून लोकप्रिय अशी काही नवीन धोरणे घोषित केली तर हेच सरकार पुन्हा निवडून येईल की विरोधक बाजी मारतील याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे.
सार्वजनिक निवडणुका ही शेअर बाजाराच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण घटना असते. त्या वेळी गुंतवणूकदार आपापल्या परीने याची निष्पत्ती काय होईल याचे अंदाज बांधत असतात. मोठमोठे ब्रोकर निवडणुकांचे काय होणार आणि त्यामुळे कोणत्या प्रकारच्या औद्योगिक क्षेत्राची भरभराट होणार वगरे प्रकारची गाजरे दाखवून गुंतवणूकदारांना प्रभावित करत असतात.
माझ्या मते, हा प्रकार निखालस विश्लेषण नसून तर्क-वितर्क करण्याचे डावपेच आहेत. आपल्या देशातील निवडणुकांवर प्रादेशिक राजकीय पक्षांचा फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळे कोणत्याही पक्षाला निर्विवाद बहुमत मिळत नाही. या वस्तुस्थितीमुळे आपली लोकशाही ही अचर लोकशाही नसून संमिश्र आणि अनिष्ट तडजोडींची लोकशाही आहे. त्यामुळे सरकार कोण बनविणार याचा अंदाज बांधणे म्हणजे चक्क सट्टा आहे. संमिश्र सरकार म्हणजे तडजोड आलीच. त्यामुळे देशाच्या प्रगतीपेक्षा लोकप्रिय योजनांना जास्त महत्त्व दिले जाते.
निवडणुकांचे तर्क करण्यामध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या चुकांची अनेक उदाहरणे आहेत. अगदी अलीकडचे म्हणजे २००९ सालचे. यूपीए सरकार निवडून आल्यावर त्यांनी निवडणुकांच्या वेळी केलेल्या घोषणांमुळे जनता खूश झाली होती. प्रत्यक्षात त्यांनी काय केले ते आज सर्वासमोर आहे.
२०१३मध्ये शेअर बाजाराने नवीन उच्चांक प्रस्थापित केला हे खरे आहे. परंतु तो सरकारने राबविलेल्या योजनांमुळे, उद्योग क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे नव्हे तर अमेरिकेतील क्यूई३ या प्रक्रियेमुळे. उत्पन्न झालेल्या रोकड सुलभतेमुळे. आता प्रश्न उभा राहतो २०१४मध्ये काय होणार? शेअर बाजाराच्या निर्देशांकाने उच्चांक स्थापित केला आहे. ही तेजीची सुरुवात आहे की मंदीची? माझ्या मते, ही नवीन तेजीची सुरुवात आहे. वर निर्देशित केलेल्या, अमेरिकेतील नोट छपाई आणि निवडणुका या दोन गोष्टींमुळे बाजारातील तेजीबाबत गुंतवणूकदारांमध्ये थोडी धाकधूक आहेच. सध्या तरी निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी सरकार येण्याची शक्यता जास्त वाटते आणि तसे जर झाले तर बाजार वर जाण्याची शक्यता आहे. सध्याचे यूपीए सरकार आले तर अल्प काळासाठी बाजार खाली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र बाजाराचे भवितव्य देशाच्या आर्थिक प्रगतीवरच अवलंबून असणार आहे.
गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजाराच्या चढ-उतारांचा विचार करत बसण्यापेक्षा ज्या नामांकित कंपन्या आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले तर जास्त लाभ होण्याची शक्यता आहे. बाजार केव्हा आणि किती खाली जाईल ते कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे तो खाली जाईल तेव्हा मी गुंतवणूक करणार, अशी तत्त्वप्रणाली ठेवून काम केले तर माझ्या मते तरी ते चुकीचे आहे. कारण त्याला ‘टायिमग द मार्केट’ म्हणतात आणि ते कोणालाही साधत नाही.
तज्ज्ञ आणि प्रामाणिक व्यावसायिकांनी चालविलेला चांगला उद्योग हा विपरीत परिस्थितीमध्येही प्रगती करीत असतो. त्यामुळे पूर्ण बाजाराचा विचार न करता काही ठरावीक कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून गुंतवणूक केली तर नक्कीच चांगली गंगाजळी तयार करता येते. गेल्या २५ वर्षांच्या अनुभवावरून माझे असे ठाम मत झाले आहे की, सर्वसामान्य गुंतवणूकदारांची मानसिकता त्यांना या उपयुक्त पर्यायाचा लाभ घेण्यापासून वंचित करते. बाजार मंदीत असतो तेव्हा ते बाजारापासून अलिप्त असतात. हा प्रकार मी १९९२, २००० आणि २००८च्या तेजीनंतर जी मंदी सुरू झाली त्या वेळी अनुभवला. फक्त चाणाक्ष आणि मुरब्बी गुंतवणूकदारच अशा वेळी गुंतवणूक करतात आणि जास्तीत जास्त फायदा करून घेतात.
थोडक्यात- बाजाराची काळजी करू नका. ज्या कंपन्यांचे ऐतिहासिक यशापयश वाखाणण्याजोगे आहे त्यामध्ये गुंतवणूक करा आणि संयम ठेवा. १९९२च्या तेजीनंतर (सेन्सेक्स ४,६४३) बाजार १९९४ अंकापर्यंत घसरला. पण पुढील ७ वर्षांमध्ये सेन्सेक्स पुन्हा ६,१५०पर्यंत पोहोचला (द.सा.द.शे. सरासरी वाढ १७.५ टक्के) त्यानंतर तो पुन्हा २,६२५च्या पातळीवर आला आणि पुढील ७ वर्षांमध्ये (२००८) त्याने २१,२००ची पातळी गाठली. (द.सा.द.शे. सरासरी वाढ ३४.६ टक्के) २००९ साली सेन्सेक्सने ८,५००ची पातळी गाठली. सेन्सेक्सच्या सुरुवातीपासूनच्या काळाचा (१९७८) विचार केला तर त्याने नमूद केलेला सरासरी परतावा आहे १७.५ टक्के. तो विचारात घेऊन २००९च्या सेन्सेक्सच्या ८,५००च्या पातळीनुसार गणित मांडले तर पुढील तीन वर्षांमध्ये (२०१६) सेन्सेक्स २६,३००ची पातळी गाठू शकतो.
प्रत्येक गोष्ट मग ती कितीही चांगली असो की वाईट, कधीतरी तिचा अंत होतो. गेले १२ वर्षे अखंडपणे चालू असलेल्या सोन्यामधील तेजीला २०१३मध्ये खीळ बसली आणि सोन्याचा भाव सुमारे ३० टक्के घसरला. परंतु १० वर्षांपूर्वीचा भाव विचारात घेतला आणि आजच्या भावाशी तुलना केली तर परताव्याचा दर होतो द.सा.द.शे. सरासरी १४.१५ टक्के. आज जगातील सर्वच देश कर्जबाजारी आहेत त्यामुळे सोन्यामध्ये पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे.
पुढील पाच वर्षांचा कालावधी विचारात घेतला तर शेअर बाजार किंवा निवडक इक्विटी फंडांमध्ये ८० टक्के ते ८५ टक्के आणि सोन्यामध्ये १५ टक्के ते २० टक्के गुंतवणूक केली तर भाववाढीपेक्षा जास्त परतावा पदरात पाडता येईल.