मराठी माणसाला गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराच्या पर्यायाकडे गंभीरतेने व अधिक अभ्यासपूर्ण रीतीने पाहायला लावणाऱ्या साप्ताहिक सदर.. सलग पाचव्या वर्षांत!
सोबतच्या कोष्टकातील गुंतवणुकीवरील परतावा पाहून ‘माझा पोर्टफोलियो’च्या वाचकांना आणि गुंतवणूकदारांना यंदा निराश केले असेल. मात्र सरलेल्या वर्षांतील एकूणच शेअर बाजाराच्या परतावा कामगिरीपेक्षा आपल्या पोर्टफोलियोचा परतावा चांगला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स होता २७,४९९.४२ आणि यंदाच्या ३१ डिसेंबर २०१५ रोजी बाजार बंद होतेवेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६,११७.५ वर होता. म्हणजेच शेअर बाजार निर्देशांकांत १,३८३ अंशांची घसरण करून गुंतवणूकदारांचे उणे ५% परताव्यातून या वर्षांने नुकसान केले आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१४ सालात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना त्या वर्षांतील गुंतवणुकीकरिता सुमारे ३०% परतावा दिला होता. त्या तुलनेत गेले वर्ष कुठल्याच गुंतवणुकीसाठी फलदायी ठरले नाही. मग ते सोने असो वा स्थावर मालमत्ता. खरे तर २०१५ सालात सर्वात जास्त फायदा कुणाला झाला असेल तर तो बँकांच्या मुदत ठेवीधारकांना, ‘आयपीओ’साठी अर्ज करून शेअर्स पदरी पडलेल्या भाग्यवान गुंतवणूकदारांना आणि अर्थात करमुक्त रोख्यांत आणि काही अंशी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना.
कच्च्या तेलातील प्रचंड घसरण आपल्या सारख्या राष्ट्रांना फायद्याची असली तरीही ती जागतिक मंदीकडे नेणारी असू शकते ही भीती आहे. जागतिक मंदी बरोबरच देशांतर्गत गोंधळ वाढत चाललेला आहे. केवळ व्याजदर कपात करून आणि ‘मॅट’ रद्द करून उद्योगधंद्यातील मंदी आवाक्यात येणार नाही हे एव्हाना गुंतवणूकदारांना कळलेच असेल. देशांतर्गत आíथक घडी सुधारण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी लांबलेले जमीन अधिग्रहण आणि वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी विधेयक, चीनमधील मंदीचे सावट, अमेरिकेतील व्याजदर वाढ, जागतिक मंदीचे संकट आणि पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट अशा अनेक चिंतांनी भारतीय शेअर बाजार ग्रासला आहे. गेल्या वर्षांत परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक निर्गुतवणूक करून काढता पाय घेतला आहे. तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युचुअल फंड किंवा शेअर बाजार हाच उत्तम पर्याय आहे.
२०१६ साल कसे असेल याची भाकीते सुरू झालेली आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहता शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडांत दीर्घकालीन गुंतवणूकच फायद्याची ठरते हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे संधी मिळताच प्रत्येक मंदीला शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे. चांगल्या कंपन्यांतील दीर्घ कालीन गुंतवणूक कायम फायद्याचीच ठरते हे आपण अनुभवले आहेच. वाचकांच्या माहितीसाठी गेल्या तीन वर्षांच्या (२०११ ते २०१४) पोर्टफोलियोचा आढावा घेऊन दीर्घकालीन गुंतवणुकीने किती फायदा करून दिला आहे, ते खालील तक्त्यातून पाहता येईल.
‘माझा पोर्टफोलियो’च्या वाचकांना आणि गुंतवणूकदारांना नवीन वर्षांच्या हार्दकि शुभेच्छा. या स्तंभाचे हे सलग पाचवे वर्ष. वाचकांना आतापर्यंत जसा फायदा या स्तंभाच्या माध्यमातून झाला तसाच या वर्षीही होऊ दे आणि मराठी माणूस गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराच्या पर्यायाचा अधिक गंभीरतेने विचार करू दे अशी प्रार्थना करून नवीन वर्षांचे स्वागत करू या. अर्थात मी सुचवत असलेल्या शेअर्सबरोबर तुमचेही निरीक्षण, अभ्यास आणि त्या अनुषंगाने निर्णय तितकाच महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवायलाच हवे. कारण पोर्टफोलियो तुमचाच आहे.

Untitled-30

Untitled-31

Untitled-32

– अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com