नीरज राऊत niraj.raut@expressindia.com

झाडांपानांवर गुंतवणूक केलेल्या पैशाचे नेहमीच मूल्यवर्धन होते हे बोईसर येथील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तीन व्यावसायिकांनी दाखवून दिले आहे. भाडय़ाच्या जागेत, दहा हजार रोपांपासून नर्सरीची केलेली सुरुवात सध्या साडेतीन-चार लाख झाडांच्या साठय़ांपर्यंत पोहोचली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये व्हर्टिकल गार्डन तयार करण्याचा हा दांडगा अनुभव प्राप्त केल्यानंतर त्यांनी टिश्यू कल्चर पद्धतीने शोभेची झाडे स्वत: तयार करण्याची प्रयोगशाळा कार्यरत केली आहे. देशातील काही हरित लॅण्डस्केपिंग प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन व सहभाग घेऊन लीडरशिप इन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड डिझाइन (लीड्स) प्रमाणपत्रप्राप्त प्रकल्पांत महत्त्वपूर्ण सहभाग घेतला आहे.

सन २००९ नंतर आलेल्या जागतिक मंदीच्या वातावरणाचा आर्थिक फटका बसल्यानंतर स्टील व्यापार करणारे बोईसरचे अजित मरकळे (५२) तसेच हॉर्टिकल्चर लॅण्डस्केपिंग क्षेत्रात नोकरी करणारे अतुल सोनावणे (३७) यांनी एकत्र येऊन एक लहानशी नर्सरी सन २०१० मध्ये स्थापित केली. ७५ पैसे प्रति रोप इतक्या दरात घेतलेल्या ‘आरेका पाम’ या रोपची किंमत काही महिन्यांत काही पटीने वाढली. हे मूल्यवर्धन पाहून या दोघांनी तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका भाडय़ाच्या जागेत दहा हजार झाडे विकत आणून नर्सरी सुरू केली. या नर्सरीत सर्व प्रकारची झाडे उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी अपेक्षित विक्री झाली नाही. खरेदी केलेली झाडे गार्डन व लॅण्डस्केपिंगच्या छोटय़ा-मोठय़ा कंत्राटामध्ये वापरून त्यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला.

रोपांसाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या कुंडय़ा खरेदी करण्यासाठी निघालेले अतुल सोनवणे मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात प्रवेश करू शकले नाहीत. मात्र कुंडय़ांच्या बदल्यात विक्रेत्याच्या सांगण्यावरून ऐरोली येथे जाऊन व्हर्टिकल गार्डनचे मॉडय़ूल ते घेऊन आले. नंतर त्यांनी स्वत: लहानसे व्हर्टिकल गार्डन उभारले. व्हर्टिकल गार्डनचा प्रयोग सुरू ठेवत, या व्यवसायातील सखोल माहिती त्यांनी मिळवली. याच सुमारास त्यांच्यासोबत एकेकाळचे त्यांचे स्पर्धक, लॅण्डस्केपिंग व्यावसायिक व क्रिकेट मैदानाचे क्युरेटर म्हणून काम करणारे प्रशांत सावे (५६) हे सोबत जोडले गेल्याने ‘ए प्लांट्समॅन’ या कंपनीचा पाया भक्कम होण्यास मदत झाली. सन २०१३-१४ मध्ये व्हर्टिकल गार्डन तयार करण्याची कंपनीला मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील काही विकासकाने संधी दिली. त्यानंतर आजपर्यंत या क्षेत्रामध्ये कंपनीने सहा-सात मोठय़ा प्रकल्पांसह इतर ३०-३५ प्रकल्प यशस्वीपणे उभारले आहेत.

व्हर्टिकल गार्डनला लागणारी शोभेची झाडे ही आंध्रप्रदेशमधील राजमुंद्री तसेच पुण्याहून ट्रक लोड पद्धतीने विकत घ्यावी लागत. वातावरणाच्या बदलानंतर या रोपांना स्थिर होण्यासाठी वेळ लागत असे. आपल्या प्रकल्पाला लागणाऱ्या शोभेच्या झाडांची संख्या, त्याची उपलब्धता, इतरांवर अवलंबित्व, किफायतशीरपणा, झाडांचा दर्जा- विविधता व इतर मुद्दय़ांचा विचार करून झाडे विकत घेण्यापेक्षा त्याचे उत्पादन हाती घ्यावे असा विचार या तिघांच्या मनामध्ये आला.

बोईसरमधील कुडण येथे असलेल्या सुमारे तीन एकर क्षेत्रफळावर टप्प्याटप्याने शेडनेट आणि नंतर पॉलीहाऊस उभारून त्या ठिकाणी रोपे साठविण्यास आरंभ केला. त्याचप्रमाणे जवळच कुरगाव येथे त्यांनी टिश्यू कल्चरची प्रयोगशाळा स्थापन करून या पद्धतीने दर महिन्याला पन्नास हजार शोभेची झाडे तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. सध्या कुडण येथे त्यांच्याकडे व्हर्टिकल गार्डनसाठी तसेच इतर प्रकारची साडेतीन-चार लाखांहून अधिक झाडे तयार स्थितीत असून झाडांचा आवश्यकतेनुसार वापर करणे सोयीचे ठरत आहे.

सद्य:स्थितीत ‘ए प्लांट्समॅन’तर्फे सुशोभीकरणाचे ठेके घेण्याचे काम सुरू असून शोभेच्या झाडांच्या उत्पादनापासून त्यांच्या साठवणुकीसाठीची इन-हाऊस व्यवस्था असल्याने कामाचा दर्जा राखणे तसेच काम वेळेत पूर्ण करणे शक्य होत आहे. त्याच बरोबरीने राजमुंद्री येथे भाडेतत्त्वावर जागा घेऊन त्या ठिकाणाहून दीड कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या झाडांची निर्यात गेल्या वर्षी कंपनीने केली आहे.

जमशेदपूर येथील टाटा स्टील प्रकल्प, अदानी इस्टेट्स यांसह अनेक मोठय़ा उद्योग समूहांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुशोभीकरणाचे काम करणाऱ्या बोईसर येथील या व्यावसायिकांच्या मदतीला येथील अनेक आदिवासी तरुण व महिलांची साथ लाभली आहे. तसेच स्थनिक आदिवासी बांधव व नागरिक या व्यवसायात विविध प्रकारे जोडले गेले आहेत. चेन्नईजवळील इंटरनॅशनल फ्लेव्हर्स अँड फ्रेग्रन्सेस (आयएफएफ) यांच्यातर्फे  राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाला लीडरशिप इन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड डिझाइन (लीड) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

या व्यवसायातील आरंभाच्या काळात अजित मरकळे यांनी आपल्याकडील पुंजी व्यवसायात गुंतवली, प्रशांत सावे यांनी त्यांनी जागा उपलब्ध करून योगदान दिले तर अतुल सोनवणे यांनी त्यांच्याकडे असलेले तांत्रिक ज्ञान या उद्योगासाठी वापरात आणल्याने कंपनीची भरभराट झाली. टिश्यू कल्चरवर आधारित प्रकल्पाचा विचार करताना या कंपनीने ‘स्टार्ट अप’ व ‘स्टँड अप’ या शासकीय योजनाअंतर्गत लाभ घेण्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला. जिल्हा उद्योग केंद्र, जिल्ह्य़ातील लीड बँकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तसेच राज्य शासनाच्या विविध स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला. मात्र कर्ज देताना सर्व बँकांनी कोलॅटरल सिक्युरिटी (दुय्यम सुरक्षा) रकमेचा मुद्दा उपस्थित करून अर्थसाहाय्य नाकारले. यामुळे कंपनीला कोणत्याही योजनेचा लाभ होऊ शकला नाही. अखेर ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सने (सध्याची पंजाब नॅशनल बँक) सुमारे दोन कोटी रुपयांचा पतपुरवठा केला. त्यामुळेच कंपनीची उलाढाल या वर्षांत आठ कोटी रुपयांपुढे जाण्याची शक्यता आहे.

झाडे-पाने याबद्दल असलेली आपुलकी, मेहनत करण्याची तयारी तसेच नवनिर्मितीचा छंद असणाऱ्या बोईसर येथील तीन उद्योजकांनी उभारलेला हा व्यवसाय अनेकांना अनुकरणीय ठरणारा आहे. जागेची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असताना नागरिक व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमातून आपल्या अवतीभोवती  सुशोभीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याच पद्धतीने टिश्यू कल्चर पद्धतीने झाडांचे उत्पादन केल्यास सर्वसामान्य बागायतदार-शेतकरी वेगवेगळ्या फळ झाडांद्वारे भरघोस उत्पादन करू शकतात हे या बोईसरच्या ‘ए प्लांट्समॅन’ने दाखवून दिले आहे.

अजित मरकळे, प्रशांत सावे, अतुल सोनावणे     

ए प्लांट्समॅन , पालघर

’ व्यवसाय – सुशोभीकरण प्रकल्प,  टिश्यू कल्चर

’ कार्यान्वयन : २०११ साली

’ मूळ गुंतवणूक : १,८०० रुपये

’ सध्याची उलाढाल : वार्षिक २.२५ कोटी रुपये (२०२०-२१ मध्ये ८ कोटींची उलाढाल अपेक्षित)

’ कर्जपुरवठा : ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स   (सध्याची पंजाब नॅशनल बँक)

’ सरकारी योजनेतून मदत : नाही

’ कामगार किती : थेट ३२, संलग्न ४०-५० (कामाच्या व्याप्ती प्रमाणे)

’ संकेतस्थळ :  http://www.aplantsman.com

* लेखक ‘लोकसत्ता’चे  पालघर जिल्हा प्रतिनिधी

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.