News Flash

अच्छे दिन आयेंगे!

आजचे मानकरी पराग उदास हे एका प्रसिद्ध संस्थेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

| May 19, 2014 07:16 am

आजचे मानकरी पराग उदास हे एका प्रसिद्ध संस्थेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. पराग उदास (४१) यांच्या कुटुंबात पत्नी वागेश्वरी (३८), अद्वैत (११) व अदिती (७) हे सदस्य आहेत. वागेश्वरी या गृहिणी आहेत. पराग सध्या कंपनीने त्यांना दिलेल्या घरात राहत आहेत. त्यांनी सेवानिवृतीनंतर राहण्यासाठी एक सदनिका मुंबईत खरेदी केली आहे. या सदनिकेचा ताबा त्यांना २०१६च्या दिवाळीत मिळणार आहे. या सदनिकेसाठी त्यांनी १५ वर्षांचे गृह कर्ज घेतले असून त्याचा हप्ता त्यांच्या वेतनातून कापून जायला सुरुवातही झाली आहे.
पराग यांनी एचडीएफसी बँकेच्या मुदत ठेवीत गुंतवणूक केली आहे. तसेच काही कंपन्यांच्या मुदत ठेवीतही त्यांची गुंतवणूक आहे. सात म्युच्युअल फंडांत त्यांच्या पाच वर्षांसाठीच्या ‘एसआयपी’ सुरू आहेत. त्यांनी जीवन सुरभी, एलआयसी मनी प्लस, एलआयसी मॅरेज/  एज्युकेशन अ‍ॅन्युइटी प्लॅन, जीवन किशोर व एलआयसी बीमा गोल्ड, एलआयसी जीवन बिमा बचत या योजना घेतल्या आहेत. या सर्व योजना मिळून त्यांना ८.७५ लाख रुपयांचे विमाछत्र लाभले आहे. याचबरोबर त्यांनी काही कंपन्यांचे शेअर विकत घेतले आहेत. तसेच नोकरीच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून त्यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच गट विम्याअंतर्गत मिळाले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २.५० लाख रुपयांचे आरोग्य विमा छत्र सेवाशर्तीचा भाग म्हणून लाभले आहे.
* पराग उदास यांना सल्ला
सध्या पराग उदास यांचे अंदाजपत्रक पाहिले असता वेतनाचा मोठा भाग बचतीपेक्षा विम्याचे हप्ते भरण्यात खर्च होत आहे. विमेदाराने खरेदी केलेल्या प्रत्येक पॉलिसीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. परंतु एखादी विमा योजना विक्रेता कशी विकतो हे पाहिले तरी योजनेच्या त्रुटी लक्षात येतील. कुठल्याही जीवन विम्याच्या योजनेची दोन भागांत विभागणी असते. पहिली विम्याचा हप्ता व गुंतवणूक. यातील विम्याच्या हप्त्यापायी नक्की किती शुल्क आकारले जाते व गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारणी नेमकी किती होते हे विमाधारकाने लक्षात घेतले पाहिजे.
विम्याचा हप्ता हा मृत्युदराच्या प्रमाणावर ठरतो. आज आयुर्मान वाढल्यामुळे मृत्युदराचे प्रमाण घटले आहे. आयुर्मर्यादा कमी धरली म्हणजे मृत्युदर जास्त धरला तर विम्याचा हप्ता वाढू शकतो. विमा कंपनीची मृत्युदर ठरविण्याची स्वत:ची पद्धत असते. या मृत्युदरावर विमाधारकाचा विम्याच्या विहित कालावधीत मृत्यू येण्याची शक्यता त्या पॉलिसीचा हप्ता ठरवत असते. मृत्युदर व सरासरी आयुर्मान काढण्याची पद्धत हे प्रत्येक विमा कंपनी ठरवत असते. तुम्ही ज्या कंपनीकडून विमा योजना घेतल्या आहेत त्या कंपनीचे विम्याचे दर इतर विमा कंपन्यांपेक्षा २० ते ५० टक्के अधिक आहेत. याचे कारण कदाचित ही विमा कंपनीच देऊ शकेल.
तुम्ही भरत असलेल्या वार्षकि हप्त्यावर तुम्हाला फक्त ८ लाखांचे विमा छत्र मिळाले आहे. या व्यतिरिक्त तुमची गुंतवणुकीचे व्यवस्थापन ही विमा कंपनी पाहणार आहे. या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी ही विमा कंपनी तुमच्याकडून शुल्क आकारणी करत असते. या अतिरिक्त शुल्क आकारणीमुळे व या कंपनीच्या मृत्युदराच्या गृहीतकामुळे तुम्ही विकत घेतलेल्या विमा योजना या इतर विमा कंपन्यांपेक्षा २५ ते ३० टक्के महाग आहेत. म्हणून या योजना तुमच्यासाठी संपत्तीची निर्मिती करू शकणार नाहीत. या पारंपरिक योजनांपासून तुम्हाला ना पुरेसे विमाछत्र मिळते ना गुंतवणुकीवर परतावा. या सर्व योजनांच्या परताव्याचा दर ३.२५ टक्के ते ५ टक्के आहे.
इंजिनीअर असलेले पराग यांनी नोकरीत असतानाच एमबीएचे शिक्षण घेतले तेव्हा त्यांना ‘आयआरआर’ ही एखाद्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर मोजण्याची पद्धती शिकविली होती. या पद्धतीने त्यांनी त्यांच्याच विमा योजनांवरचा परताव्याचा दर मोजून पाहिला व या स्तंभातून पारंपरिक विमा योजनांचे हप्ते बंद करण्याचा त्यांनी विचार केला आहे. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीत धोरणे चुकली याची जाणीव पाच वर्षांपूर्वी झाली. पाच वर्षांपूर्वी जरी टर्म प्लान व म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू केली असती तरी आज त्यांच्याकडे असलेल्या पॉलिसीच्या ‘सरेंडर व्हॅल्यू’ पेक्षा कितीतरी अधिक रक्कम हाती आली असती. त्यांच्या दोन योजनांची मुदतपूर्ती २७ जानेवारी २०१७ रोजी होणार आहे. या दोन योजना मुदतपूर्तीपर्यंत सुरू ठेवाव्यात.
अन्य योजनाबाबत त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. म्हणून पहिला क्रमांक वगळता दुसऱ्या ते चौथ्या क्रमांकावर ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ असलेल्या पकी कोणत्याही एका कंपनीची दीड कोटीची १८ वष्रे मुदतीची टर्म पॉलिसी खरेदी करा. ही पॉलिसी तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीपर्यंत विमाछत्र देईल. तुम्हाला १.२५ लाख आरोग्य विमा छत्र देणारी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची योजना खरेदी करा. भविष्यात यावर टॉपअप खरेदी करण्याचा विचार करू शकता. यामुळे वार्षकि १० हजारांत तुम्हाला ६.२५ लाखांचे आरोग्य विमा छत्र मिळू शकेल.
सध्याच्या खर्चाचा विचार करता अद्वैतच्या शिक्षणासाठी २०२१ ते २०२५ व अदितीच्या शिक्षणासाठी २०२४ ते २०२९ या कालावधीत मिळून ३० लाख रुपये लागणार आहेत. गुंतवणुकीचा परतावा १२ टक्के जरी धरला तरी दोघांसाठी दरमहा १२,००० रुपयांची बचत करण्याची गरज आहे. म्हणून या प्रत्येकी दोघांसाठी आजच पीपीएफ खाते सुरू केले व दरमहा प्रत्येकी ८,००० रुपयांची बचत त्यात केली तरी १५ वर्षांत सध्याच्या व्याजदराने २३,२८,९९७ रुपये जमतील. अनेक वधुपिते आपल्या भविष्य निर्वाह निधीतून मुलीच्या लग्नाची तरतूद होईल, या आशेवर असतात. अदितीच्या लग्नासाठी २० लाख रुपयांची तरतूद २०३४ पर्यंत जरुरी आहे. परताव्याचा दर १२ टक्के धरल्यास दरमहा ७,००० रुपयांची बचत होणे जरुरीचे आहे. तुमच्या सेवानिवृती पश्चात जीवनाची तरतूद करण्यासाठी आज अतिरिक्त रोखता दिसत नाही.
पुढील वर्षी तुमचे वाहन कर्ज फेडून संपणार आहे. २०१७ मध्ये एका विमा योजनेची मुदतपूर्ती होणार आहे. घराचा ताबा मिळाल्यानंतर भाडे मिळण्यास सुरुवात होईल. या अतिरिक्त रोखतेचा उपयोग जुन्या चुका सुधारण्यासाठी करता येईल. अन्यथा काही वित्तीय ध्येयांची पूर्तता होणार नाही. पराग हे उच्चशिक्षित आहेत. व्यवस्थापनाचे शिक्षण घेते वेळी अर्थ नियोजनात चक्रवाढ व्याज किंवा आयआरआर या तंत्रांचा परिचय झाला आहेच. तेव्हा वरील विधानांची तथ्यता ते नक्कीच जाणतात. जून महिन्यात त्यांना पगारवाढ व वार्षकि बोनस मिळणार आहे. पुन्हा एकदा वाढीव पगाराप्रमाणे आíथक नियोजनाचा आढावा घ्यायला हवा.

* चुकीची दुरुस्ती
५ मे २०१४ च्या लेखात ‘रोखे गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंडांतून मिळालेला दीर्घकालीन नफा करमुक्त असतो’ असे म्हटले होते. प्रत्यक्षात दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १० टक्के अथवा निर्देशांकावर आधारित नफा काढला असता २० टक्के कर आकारला जातो. सध्या महागाईचा दर जास्त असल्यामुळे ८० ते ९० टक्के नफा करमुक्त असतो. ही अनवधानाने झालेली चूक वाचक सायली देसाई यांनी नजरेस आणून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 7:16 am

Web Title: acche din ayenge
Next Stories
1 पुस्तकी मूल्यापेक्षा स्वस्तात उपलब्ध!
2 झळाळी गेली, रया गमावली!
3 अर्थव्यवस्था सुधाराचे प्रतिबिंब उमटण्याच्या प्रतीक्षेत
Just Now!
X