||  वसंत माधव कुळकर्णी

गेल्या दोन दशकांत म्युच्युअल फंड व्यवसायाने भरीव कामगिरी केली आहे. त्याच वेळी वित्त बाजाराने या काळात पुष्कळ चढउतारही अनुभवले आहेत. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमणियन हे या व्यवसायातील असे एक धुरीण आहेत की, ज्यांनी या व्यवसायातील अशा अनेक चढ-उतारांमधून या कंपनीचे यशस्वी नेतृत्व केले. मग तो कसोटीचा काळ ‘डॉट कॉम बबल’मधील गुंतवणुकीचा (जी २००० सालामध्ये धोक्यात आली) असो किंवा त्यानंतरचा २००८ मधील जागतिक आर्थिक मंदीचा काळ असो. बालासुब्रमणियन यांनी या सर्व कठीण परिस्थितीचा सामना केला आहे. तमिळनाडूमधील तंजावूर जिल्ह्य़ातील मेलात्तूर गावातून सुरूझालेल्या कारकीर्दीचा आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंतचा प्रवास अतिशय रंजक आहे. या फंड घराण्यासह त्यांच्याही रौप्य महोत्सवी कारकीर्दीचा हा एक धावता आढावा.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणानंतर खासगी मालकीच्या म्युच्युअल फंड स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. आदित्य बिर्ला समूहाने म्युच्युअल फंड व्यवसायात पदार्पण करण्याचे ठरविल्यानंतर १९९४ मध्ये ते आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे बालासुब्रमणियन हे सातवे कर्मचारी म्हणून दाखल झाले. ‘बॉण्ड ट्रेडर’ म्हणून दखल झालेल्या बालासुब्रमणियन लवकरच फंड घराण्यांचे विक्री आणि वितरण प्रमुख, पोर्टफोलिओ मॅनेजर आणि त्यानंतर मुख्य गुंतवणूक अधिकारी बनले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांची नेमणूक फंड घराण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली. बालासुब्रमणियन यांनी समभाग आणि रोखे गुंतवणुकीच्या व्यवस्थापनाचे काम केले असले तरी त्यांची आवड रोखे गुंतवणूकच राहिली आहे. निश्चित उत्पन्न व्यवस्थापक हे ढोबळ अर्थव्यवस्थेचे (मॅक्रो इकोनोमिक्स) आडाखे बांधत त्याआधारे मूल्यांकन निश्चित करत असतात. ‘बाँड ट्रेडर’ म्हणून काम करताना ‘क्रेडिट’ आणि ‘डय़ुरेशन’ दोन्ही मूल्यांकनाच्या आधारे, रोख्यांची खरेदी-विक्री करणे त्यांना आवडत असे. सार्वजनिक क्षेत्रातील जीआयसी म्युच्युअल फंडातून म्युच्युअल फंड उद्योगात १९९२ मध्ये पदार्पण करणाऱ्या बालासुब्रमणियन यांनी लवकरच सार्वजनिक क्षेत्राची कास सोडून, १९९४ मध्ये खासगी क्षेत्रातील बिर्ला कॅपिटल इंटरनॅशनलची कास धरली. याच कंपनीची पुढे बिर्ला म्युच्युअल फंड या नावाने ओळख बनली. बिर्ला म्युच्युअल फंडाची १९९९ पर्यंतची वाटचाल प्रतिस्पध्र्याना हेवा वाटावा अशीच होती. व्यवसायास १९९४ मध्ये प्रारंभ केल्यापासून १९९९ पर्यंत फंड मालमत्ता १,७८० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यास फंड घराणे यशस्वी झाले. बालासुब्रमणियन यांची आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे नववे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून २००९ मध्ये नेमणूक झाली. त्यांची निवड झाल्यानंतरच्या दोन वर्षांच्या कालावधीत आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत ३५ टक्के वाढ झाली. या वाढीस मुख्यत्वे रोखे गुंतवणूक कारणीभूत ठरली. आदित्य बिर्ला सन लाइफ हे फंड घराणे मुख्यत्वे रोखे गुंतवणुकीसाठी ओळखले जात होते. महेश पाटील यांची २०११च्या दरम्यान सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून नेमणूक झाल्यानंतरच्या काळात फंड घराण्याने आपला समभाग गुंतवणुकीत दबदबा निर्माण केला. म्युच्युअल फंड व्यवसाय म्हणून नफ्यात असण्यासाठी मालमत्तेची विभागणी, कठोर जोखीम व्यवस्थापन आणि मालमत्तेतील वाढ हे तीन घटक जबाबदार असतात. या व्यवसायातील एक सक्षम, सद्धान्तिक मानसिकता लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात आणि त्याच्या या गुणवैशिष्टय़ांमुळेच बिर्ला म्युच्युअल फंडाला त्यांनी भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगात चौथ्या मोठय़ा स्थानावर नेले आहे.

बालासुब्रमणियन ‘अ‍ॅम्फी’चे अध्यक्ष असताना ‘म्युच्युअल फंड सही है’ या जाहिरात मोहिमेस प्रारंभ झाला. या जाहिरात मोहिमेची आखणी प्रत्यक्ष ‘अ‍ॅम्फी’च्या गुंतवणूकदार साक्षरता समितीने केली असली तरी या मोहिमेस ‘अ‍ॅम्फी’चे अध्यक्ष या नात्याने मार्गदर्शन त्यांचेच होते. या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर एका वर्षांत ५० लाख नव गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा ओनामा केला. म्युच्युअल फंड फक्त शेअर बाजारात गुंतवणूक करतात या गरसमजाला या जाहिरात मोहिमेने छेद देण्याचे काम केले. बालासुब्रमणियन यांनी २०१६ ते २०१८ या कालखंडामध्ये ‘अ‍ॅम्फी’चे अध्यक्षपद भूषविले आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात म्युच्युअल फंड उद्योगाला वित्त बाजारातील मंदी, रोखे बाजारातील व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या मुद्दलाच्या अनियमितता यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. या अनियमिततेचा या फंड घराण्याच्या फंडावरसुद्धा त्याचा परिणाम होऊन या फंड घराण्याच्या फंडांची कामगिरी खालावली. परंतु बालासुब्रमणियन यांच्या अनुभवाच्या व वित्त क्षेत्रातील कौशल्याच्या जोरावर हे फंड उत्कृष्ट कामगिरी बजावतील आणि आपली घोडदौड कायम राखतील, अशी अपेक्षा धरायला मोठा वाव नक्कीच आहे.

shreeyachebaba@gmail.com

 म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती  देणारे साप्ताहिक सदर