|| वसंत माधव कुळकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंड

सरलेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता मुंबई’ सहदैनिकांत ‘म्हाडाच्या नव्या अ‍ॅपचे अनावरण’ ही बातमी आली आहे. एखाद्या अ‍ॅपच्या अनावरणाच्या गोष्टीला असलेले बातमी मूल्य वाढता डेटा वापर अधोरेखित करते. मोबाइलधारक रोज नवीन अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करून त्यांचा वापर करीत असल्याने जगाच्या डेटा वापरात मोठी वाढ होत आहे. डेटाचा वाढता वापर आणि कमी होणाऱ्या किमतीचा स्मार्ट लाभार्थी असलेल्या ‘आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंडा’ची ही ओळख आहे.

नव्या सहस्रकाच्या उदयासोबत अलायन्स न्यू मिलेनियम नावाचा फंड गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. समीर अरोरा निधी व्यवस्थापक असलेला हा फंड प्रामुख्याने टेक्नॉलॉजी क्षेत्रात गुंतवणूक करणारा फंड होता. पुढे २००५ मध्ये अलायन्स फंड घराण्याच्या योजना बिर्ला म्युच्युअल फंडाने खरेदी केल्याबरोबर हा फंड बिर्ला मिलेनियम फंड म्हणून ओळखला जाऊ  लागला. फंड सुसूत्रीकरणानंतर १६ एप्रिल २०१८ पासून या फंडाला आदित्य बिर्ला सनलाइफ डिजिटल इंडिया फंड अशी नवी ओळख मिळाली आहे.

हा फंड बिर्ला घराण्याकडे आल्यावर गुंतवणूक धोरणात बदल होत हा फंड ‘टीएमटी’ (टेक्नॉलॉजी, मीडिया, टेलिकॉम) क्षेत्रात गुंतवणूक करणारा फंड बनला. नव्या रूपात या फंडाच्या गुंतवणुकीच्या केंद्रस्थानी तंत्रज्ञान क्षेत्र राहिले आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर भारती, आयडिया यांसारख्या वायरलेस सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांऐवजी निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीसाठी टेलीकॉम उद्योगासाठी ऑप्टिकल फायबर नेटवर्क व्यवसायात असलेल्या स्टरलाइट टेक्नॉलॉजीला पसंती दिली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘कन्सल्टिंग’, ‘प्रॉडक्ट’, ‘डिजिटल टेक्नॉलॉजी’ या उपशाखांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एल अँड टी इन्फोटेक, माइंड ट्री, केपीआयटी टेक्नॉलॉजी या कंपन्यांना गुंतवणुकीत स्थान देत निधी व्यवस्थापक कुणाल संगोई यांनी आपले वेगळेपण दाखविले आहे.

निधी व्यवस्थापक फंडाच्या गुंतवणुकीचे सक्रिय व्यवस्थापन करतात. ‘टेक्नॉलॉजी फंडां’चा ‘पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो’ अन्य फंडांच्या तुलनेत नेहमीच अधिक असतो. तसाच या फंडाचासुद्धा आहे. गुंतवणुकीच्या कमाल २५ टक्के गुंतवणूक परदेशी कंपन्यांत करण्यास फंडाला भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने परवानगी दिली असून, फंडाच्या गुंतवणुकीत फेसबुक, अ‍ॅपल यांसारख्या किंवा सिलिकॉन व्हॅलीतील सिस्को, ओरॅकल, अ‍ॅमेझॉन, अल्फाबेट, गुगल, डेल टेक्नॉलॉजी यांसारख्या कंपन्यांना लवकरच स्थान मिळण्याची शक्यता आहे.

तंत्रज्ञानामुळे संवाद साधण्याची माध्यमे आणि पद्धतीत बदल होत आहेत. विशीतल्या युवकांची भाषा आणि तिशी ओलांडलेल्या पिढीच्या संवाद साधण्याच्या भाषेत (चिन्हात) मोठी तफावत आढळते. ‘घरी कधी येणार?’ या आईच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील प्रश्नाला विशीतली युवती कऊङ असे उत्तर देते. तिशीतल्या तरुणाला हाच प्रश्न बायकोने विचारला तर, प्रश्नांकित चेहऱ्याची इमोजी पाठविली जाते. सोबत ‘मिस यू’ची इमोजी असते. स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानामुळे चिन्हात्मक चित्रांचा वापर वाढू लागला आणि संवादाची भाषा बदलली. शब्दांची जागा चित्रांनी घेतल्याने ‘शब्दावाचून कळले सारे’ अशी परिस्थिती निर्माण झाली. भाव व्यक्त करण्यासाठी आवाजात चढ-उतार करण्याऐवजी इमोजीचा वापर होऊ  लागला. जगभरात ‘फेस विथ टियर्स ऑफ जॉय’, ‘हार्ट’, ‘स्मायलिंग विथ हार्टशेप आईज’, ‘फेस ब्लोविंग किस’ हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इमोजी आहेत. एकतृतीयांश लोकसंख्या तिशीच्या आतील असलेल्या भारतात मोबाइलधारकांच्या मासिक सरासरी डेटा वापरात १४४ टक्के वाढ झाल्याचे ‘ट्राय’ची आकडेवारी सांगते. मागील सहा महिन्यांतील वाढ २६ टक्के, तर वर्षभरात १०० टक्के वाढ झाल्याचे आढळते, तर एप्रिल जून २०१८ या तिमाहीतील सर्व मोबाइलधारकांचा मासिक एकत्रित डेटा वापर ११ गिगाबाइट होता. एका अनुमानानुसार, २०२३ मध्ये भारतातील मोबाइलधारकांचा मासिक सरासरी डेटा वापर ३.९ जीबी, तर एकत्रित डेटा वापर २०२३ पर्यंत १.३ ईबी असेल. संवादासाठी फेसबुक ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांचा वापर वाढत आहे आणि जगभरात डेटा स्वस्त होत आहे. रोजच्या समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे त्या अनुषंगाने गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र सरकारचे याबाबतीतील धोरण सकारात्मक असून मुंबई महानगरपालिकेचे पाण्याचे किंवा मालमत्ता कराच्या देयकाची रक्कम महानगरपालिकेचे अ‍ॅप डाऊनलोड करून भरता येते. आजची पिढी फेसबुकवर ‘सेल्फी’ अपलोड करण्यासाठी डेटा वापरण्याबरोबर बँक, विमा, म्युच्युअल फंड व्यवहार यांसारख्या रोजच्या वापरात मोठय़ा प्रमाणावर डेटा वापरते.

तंत्रज्ञानातील गुंतवणूक संधींचे सोने करणारा हा फंड असल्याने या फंडाला ‘लाइक’ देणे अनिवार्य आहे. हा फंड थिमॅटिक प्रकारात मोडणारा असल्याने अंगठा उंचावून ‘लाइक’ देताना या फंडाची गुंतवणुकीतील मात्रा किती असावी यासाठी गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे. हे भान बाळगले नाही तर अश्रुभरल्या डोळ्यांची इमोजी व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट करावी लागेल.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya birla sun life digital india fund
First published on: 10-09-2018 at 01:57 IST