28 March 2020

News Flash

कर बोध : अग्रिम कर दुसरा हप्ता १५ सप्टेंबरपूर्वी

ज्या करदात्यांचे अंदाजित करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात

(संग्रहित छायाचित्र)

 

प्रवीण देशपांडे

आर्थिक वर्ष २०१९-२०चा (कर निर्धारण वर्ष २०२०-२१) अग्रिम कराचा दुसरा हप्ता भरण्याची वेळ आली आहे. हा हप्ता भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१९ ही आहे.

अग्रिम कर कोणी भरावयाचा आहे?

ज्या करदात्यांचे अंदाजित करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. ज्या करदात्याच्या उत्पन्नातून उद्गम कर (टीडीएस) कापला जातो अशा करदात्यांना अग्रिम कराच्या तरतुदीसाठी अंदाजित करदायित्व गणताना उत्पन्नावरील उद्गम कर वजा केल्यानंतर देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर अग्रिम कर भरावा लागतो.

अग्रिम कराचा पहिला हप्ता कोणाला भरावयाचा नाही :

(१) निवासी ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही, अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत.

(२) करदाता अनुमानित कराच्या योजनेचा लाभ घेणार असेल, म्हणजेच ‘कलम ४४ एडी’ किंवा ‘कलम ४४ एडीए’नुसार अनुमानित कर भरण्यासाठी पात्र असेल आणि या कलमांतर्गत कर भरत असेल तर अशा करदात्यांना १०० टक्के देय कर १५ मार्चपूर्वी भरावा लागेल. १५ जून किंवा १५ सप्टेंबरपूर्वी त्यांना अग्रिम कर भरावा लागत नाही.

अग्रिम कर कसा गणावा आणि किती भरावा?

करदात्याने २०१९-२० या आर्थिक वर्षांत अंदाजित उत्पन्नाचा आढावा घेऊन, त्या उत्पन्नातून प्राप्तिकर कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या वजावटी (गृह कर्ज, कलम ८० सी वगैरे) विचारात घेऊन बाकी उत्पन्नावर एकूण किती कर भरावा लागेल याची गणना करावी. या रकमेतून उद्गम कर वजा करावा आणि बाकी कर हा अग्रिम कराच्या रूपाने भरावा. अग्रिम कराचा पहिला हप्ता या एकूण अंदाजित कराच्या (उद्गम कर वजा जाता) १५ टक्के इतका १५ जूनपूर्वी भरला असेलच.

आता या दुसऱ्या हप्त्यात अंदाजित कराच्या एकूण ४५ टक्के इतका कर भरला गेला पाहिजे आणि हा हप्ता १५ सप्टेंबर २०१९ पूर्वी भरावा लागेल.

उदाहरणार्थ, एखाद्या करदात्याचे अंदाजित करदायित्व (उद्गम कर वजा जाता) २०,००० रुपये आहे. या करदात्याने १५ सप्टेंबरपूर्वी एकूण ९,००० रुपये इतका कर भरला पाहिजे. त्याने पहिला हप्ता जून २०१९ मध्ये २,००० रुपये भरला असेल तर आता १५ सप्टेंबरपूर्वी त्याला ७,००० रुपये अग्रिम कर भरावा लागेल. करदात्याला नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त काही उत्पन्न अग्रिम कराचा हा हप्ता भरल्यानंतर मिळाले असेल. (उदाहरणार्थ, भांडवली नफा, करपात्र भेट, वगैरे) तर असे उत्पन्न अग्रिम कराचा पुढील हप्ता भरताना विचारात घ्यावे.

अग्रिम कर कसा भरावा?

अग्रिम कर ऑनलाइन किंवा बँकेत चलन देऊन भरता येतो, यासाठी २८० क्रमांकाचे चलन वापरून अग्रिम कर भरता येतो.

* अग्रिम कर न भरल्यास, कमी किंवा उशिरा भरल्यास : अग्रिम कर न भरल्यास, कमी भरल्यास किंवा मुदतीनंतर भरल्यास व्याज भरावे लागते.

* अग्रिम कर जास्त भरल्यास : अग्रिम कर जास्त भरल्यास विवरणपत्र भरून कर परताव्याचा (रिफंड) दावा करता येतो.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी pravin3966@ rediffmail.com या ई-मेलवर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 12:57 am

Web Title: advance tax tds fiscal year 2019 20 abn 97
Next Stories
1 नियोजन भान : तुम्हाला वार्षिकीची गरजच काय?
2 बाजाराचा तंत्र कल : भय इथले संपत नाही!
3 नावात काय? : स्टिम्युलस अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस
Just Now!
X