29 October 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा!

१२ वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये कंपनीने प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारे (आयपीओ) भांडवली बाजारात प्रवेश केला.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

गुंतवणूकदारांसाठी मे आणि जून हे दोन महिने फार महत्त्वाचे असतात. कारण याच काळात त्यांना आपण ज्या कंपनीत गुंतवणूक केली आहे, त्याचा आढावा वार्षिक आर्थिक निष्कर्ष बघून घेता येतो. हे निष्कर्ष तपासून शेअर खरेदी – विक्रीचे निर्णय तर घेता येतातच; पण त्या शिवाय नवीन गुंतवणुकीचे निर्णयदेखील घेता येतात.

आज सुचवलेल्या समभागाची ‘इन्सेक्टीसाइड्स इंडिया लिमिटेड’ ही अशीच एक कंपनी. १२ वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये कंपनीने प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारे (आयपीओ) भांडवली बाजारात प्रवेश केला. प्रत्येकी ११५ रुपयांना मिळालेला हा समभाग आज साधारण ७०० रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजे गेल्या १२ वर्षांत ६०९% परतावा!

आज ‘इन्सेक्टीसाइड्स इंडिया लिमटेड’ ही  विविध १२० ‘फॉर्मुलेशन’ उत्पादने तर १५ तांत्रिक उत्पादंनांची निर्मिती करते.

कंपनीच्या प्रमुख उत्पादनात इन्सेक्टीसाइड्स, पेस्टीसाइड्स, फंजीसाइड्स, वीडीसाइड्स इत्यांदीचा समावेश होतो. कंपनीने उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सहयोग केला आहे. यात जपानी निस्सान केमिकल्सच्या सहकार्याने कंपनी पल्सर आणि हकामा ही उत्पादने; तर अमेरिकेतील अ‍ॅम्वाकच्या तांत्रिक सहकार्याने थीमेट आणि नुवानचे उत्पादन करते.

कंपनीच्या प्रमुख नाममुद्रांमध्ये लेथल, व्हेक्टर, एक्सप्लोड, हायजॅक, मोनोसील आदी नाममुद्रांचा समावेश आहे. कंपनी अजूनही नवीन किफायतशीर उत्पादने बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी संशोधन प्रकल्पात कंपनीने जपानच्या ओट अग्रिओ कंपनीशी संयुक्त प्रकल्प स्थापित केला आहे.

मार्च २०१९ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने १,१९१.९५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १२२.४१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे.

गेल्या वर्षांच्या तुलनेत तो ४५% ने अधिक आहे. तर गत वर्षीच्या तुलनेतील याच कालावधीच्या तुलनेत कंपनीने १९८.९४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २८.५५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तो तब्बल २७१%ने अधिक आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षांत तसेच आगामी कलावधीतदेखील कंपनीकडून आकर्षक कामगिरीची अपेक्षा असून एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून कुठलेही कर्ज नसलेल्या ‘इन्सेक्टीसाइड्स इंडिया लिमिटेड’चा जरूर विचार करता येईल.

लार्ज कॅप समभाग

प्रवर्तक : हरिषचंद्र अगरवाल

व्यवसाय : किटकनाशक, कृषीरसायन उत्पादननिर्मिती

बाजार भांडवल : रु. १,४२२ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु. ८००/३७०

भागभांडवल : रु. २०.६७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक     ६८.७५

परदेशी गुंतवणूकदार    ३.६६

बँक्स/म्यु.फंड       १४.७६

इतर/जनता १२.८३

इन्सेक्टीसाईड्स (इंडिया) लिमिडेट

(बीएसई कोड – ५३२८५१)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६९०.७०

पुस्तकी मूल्य :   रु. ३२०/-

दर्शनी मूल्य :    रु. १०/-

लाभांश :   २०%

प्रति समभाग उत्पन्न :      रु. ५९.२

पी/ई गुणोत्तर :  ११.८

समग्र पी/ई गुणोत्तर :  १९.५४

डेट इक्विटी गुणोत्तर :  ०

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर     :    ११.०५

आरओई :  १७.४९

बीटा :     १.०९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 2:06 am

Web Title: advantage of long term investment
Next Stories
1 भेट आणि प्राप्तिकर
2 व्यापारचक्र
3 कांद्यासाठी अच्छे दिन
Just Now!
X