|| प्रवीण देशपांडे

  • प्रश्न : मी जानेवारी २०१६ मध्ये एक घर ३० लाख रुपयांना खरेदी केले होते, ते मी एप्रिल २०१८ मध्ये ३१ लाख रुपयांना विकले. मला या व्यवहारामधून मिळालेली रक्कम आईला भेट म्हणून द्यावयाची आहे. यावर मला कर भरावा लागेल काय? – किशोर शिंदे, ई-मेलद्वारे

उत्तर : आपण जानेवारी २०१६ मध्ये घर खरेदी करून ते एप्रिल २०१८ मध्ये विकले म्हणजेच खरेदी केलेल्या तारखेपासून २४ महिन्यांनंतर विकले, म्हणजेच ही संपत्ती दीर्घ मुदतीची भांडवली संपत्ती झाली. त्यामुळे आपल्याला महागाई निर्देशांकाचा फायदा मिळतो. आपला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा खालीलप्रमाणे :

आपल्याबाबतीत महागाई निर्देशांकानुसार खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा झाला आहे. आपण वर दिलेली घराची प्रत्यक्ष विक्री किंमत (३१ लाख रुपये) ही रेडी रेकनर मूल्यांकनापेक्षा जास्त असली तर वरील तोटा बरोबर आहे. घराची प्रत्यक्ष विक्री किंमत ही रेडी रेकनर मूल्यांकनापेक्षा कमी असली तर मूल्यांकनाएवढी विक्री किंमत विचारात घेऊन भांडवली नफा गणावा लागला असता. आपल्याला वरील व्यवहारात २,०७,०८७ रुपयांचा भांडवली तोटा झाला आहे. हा तोटा आपण त्या वर्षीच्या इतर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करू शकता किंवा तो होत नसेल तर पुढील आठ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करून त्या त्या वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करू शकता. हे पैसे आपण आईला भेट दिले तर त्यावरसुद्धा आपल्याला कर भरावा लागणार नाही. कारण ठरावीक नातेवाईकांना दिलेल्या भेटी करपात्र नाहीत.

  • प्रश्न : मी एका कंपनीत नोकरी करतो. मला या वर्षी (आर्थिक वर्ष २०१८-१९) मध्ये वार्षिक ५,२०,००० रुपये इतका पगार मिळेल. याशिवाय मुदत ठेवीवरील व्याज ५०,००० रुपये असेल. या वर्षी शेतीपासून मला १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मी ‘कलम ८० सी’नुसार ५०,००० रुपये गुंतविले आहेत. मला किती कर भरावा लागेल? – सूरज कदम, औरंगाबाद</strong>

उत्तर : शेतीचे उत्पन्न जरी करमुक्त असले तरी ज्या शेतकऱ्यांचे शेतीच्या व्यतिरिक्त इतर उत्पन्न आहे अशांसाठी शेतीचे उत्पन्न हे फक्त कराचा दर ठरविण्यासाठी विचारात घेतले जाते.

अशा करदात्यांचे करदायित्व किती आहे हे ठरविण्यासाठी दोन क्रम आहेत (१) शेतीचे आणि बिगरशेतीचे अशा दोन्ही उत्पन्नावर एकूण कर गणावा (तो वरीलप्रमाणे २८,५०० रुपये आला) आणि (२) कमाल करमुक्त उत्पन्नात शेतीचे उत्पन्न मिसळून त्यावर किती करदायित्व आहे ते गणावे (ते वरीलप्रमाणे ५,००० रुपये आले) आणि येईल त्या रकमेची करसवलत करदात्याला मिळते. त्यानुसार आपले एकूण करदायित्व २३,५०० रुपये इतके गणले गेले. ज्या शेतकऱ्यांचे फक्त शेतीचे उत्पन्न असते त्यांना कर भरावा लागत नाही.

  • प्रश्न : मी एका कंपनीत नोकरी करते. माझा पगार वार्षिक २ लाख रुपये इतका आहे. या उत्पन्नावर कंपनीने उद्गम कर (टीडीएस) न कापल्यामुळे, कंपनी फॉर्म १६ देण्यास नकार देत आहे. मला फॉर्म १६ मागण्याचा अधिकार आहे का? – ईशा गोडे, ई-मेलद्वारे

उत्तर : ‘फॉर्म १६’ हा उद्गम कर कापल्याचे प्रमाणपत्र आहे. आपल्या बाबतीत आपले उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे आपल्या उत्पन्नावर उद्गम कर कापला नाही, त्यामुळे कंपनीला फॉर्म १६ देणे बंधनकारक नाही. परंतु आपण पगाराचे प्रमाणपत्र कंपनीकडून मागू शकता.

  • प्रश्न : माझे वय ५८ वर्षे आहे. माझे एकूण उत्पन्न २,५०,००० रुपयांपेक्षा कमी आहे, मी दरवर्षी नियमित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करतो. या वर्षीचे (आर्थिक वर्ष २०१७-१८) विवरणपत्र ३१ ऑगस्ट २०१८ पूर्वी दाखल करू शकलो नाही. मी हे विवरणपत्र आता दाखल केले तर मला दंड भरावा लागेल का?   – एस. के. शेवडे, ई-मेलद्वारे

उत्तर : आर्थिक वर्ष २०१७-१८ वर्षांपासूनचे विवरणपत्र वेळेत दाखल न केल्यास अतिरिक्त शुल्काची तरतूद करण्यात आली आहे. ज्या करदात्यांना ‘कलम १३९’नुसार विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे अशांना ५,००० रुपये (जर विवरणपत्र ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी दाखल केल्यास) आणि त्यानंतर केल्यास १०,००० रुपये अतिरिक्त शुल्क भरून विवरणपत्र दाखल करावे लागेल. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांना ही अतिरिक्त शुल्काची रक्कम १,००० रुपये इतकी आहे. आपले उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या म्हणजेच २,५०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे आपल्याला कलम १३९ नुसार विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक नाही, आपण हे विवरणपत्र स्वैच्छिकरीत्या दाखल करीत आहात, त्यामुळे आपल्याला कोणताही दंड किंवा अतिरिक्त शुक्ल भरावे लागणार नाही.

  • प्रश्न : मी आणि माझी पत्नी दोघेही नोकरी करतो. आम्ही संयुक्त नावाने एक घर खरेदी केले आहे. हे घर आम्ही आता भाडय़ाने दिले आहे. याचे भाडे माझ्या बँक खात्यात धनादेशाद्वारे जमा होते. हे उत्पन्न माझ्या उत्पन्नात गणले जाईल का?   – विक्रम दोंदे, ई-मेलद्वारे

उत्तर : हे घर आपणा दोघांच्या नावाने आहे, आपण दोघेही घराचे बरोबरीचे मालक आहात. त्यामुळे या घरातून मिळणारे उत्पन्नसुद्धा दोघांमध्ये याच प्रमाणात विभागले जाईल आणि त्याप्रमाणे आपापल्या करपात्र उत्पन्नात गणले जाईल.

  • प्रश्न : मी माझ्या व्यवसायासाठी एक जागा भाडय़ाने घेतली आहे. ही जागा सध्याच्या माझ्या वापरासाठी फार मोठी आहे. काही महिन्यांसाठी जागेतील काही भाग माझ्या मित्राला भाडय़ाने दिला आहे. याबदल्यात तो मला दरमहा भाडे देतो. हे भाडय़ाचे उत्पन्न मला करपात्र आहे का? – सुरेंद्र आचार्य, ई-मेलद्वारे

उत्तर : हे उत्पन्न आपल्याला करपात्र आहे. परंतु हे उत्पन्न ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरात गणले जात नाही. कारण आपण जागेचे मालक नाही. जागेच्या भाडय़ाचे उत्पन्न ‘घरभाडे उत्पन्न’ म्हणून फक्त मालकाच्या उत्पन्नातच गणले जाते. भाडेकरूने जागा पोट-भाडेकरूला दिल्यास त्यापासून मिळालेले उत्पन्न ‘इतर उत्पन्न’ या सदरात गणले जाईल. या उत्पन्नावर आपल्याला ३० टक्के प्रमाणित वजावट मिळणार नाही.

  • प्रश्न : माझे ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरात ३,५०,००० रुपयांचा तोटा आहे. माझे इतर उत्पन्न १२,००,००० रुपये आहे. या ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरातील फक्त २ लाख रुपयांचा तोटा मी इतर उत्पन्नातून वजा करू शकतो. बाकीचा राहिलेला दीड लाख रुपयांचा तोटा मी कॅरी फॉरवर्ड करू शकतो का? आणि तो मी पुढील वर्षी कोणत्या उत्पन्नातून वजा करू शकतो? – गणेश बनसोड, ई-मेलद्वारे

उत्तर : ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरातील तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो. मागील वर्षांतील सुधारणेप्रमाणे याला २ लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. जो तोटा त्या वर्षी वजा होऊ शकत नाही, तो पुढील आठ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. आणि हा पुढील वर्षी फक्त ‘घरभाडे उत्पन्ना’मधूनच वजा करता येतो. इतर कोणत्याही उत्पन्नातून नाही.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.