तिमाही परतावा निफ्टी-सेन्सेक्सच्या तिप्पट

श्रीकांत कुवळेकर

करोनामुळे या आर्थिक वर्षांतील पहिल्याच तिमाहीमध्ये मोठे आर्थिक संकट आलेले आपण पहिले. परंतु दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीलाच म्हणजे जूनमध्ये केंद्र सरकारने कृषी-पणन क्षेत्रासाठी घोषित केलेल्या जबरदस्त धोरण सुधारणांमुळे शेतकारणामध्ये नवे वारे वाहू लागले. अनेक संकटांचा मुकाबला करत अखेर या सुधारणांना संसदेची मान्यता मिळून त्याचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. तर बऱ्याच राज्यात त्याची अंमलबजावणी हळूहळू सुरू देखील झाली आहे, आणि काही राज्ये अजूनही या सुधारणांना अटकाव करण्यासाठी क्लृप्त्या लढवत आहेत. त्यामुळे त्याची पुढील रूपरेषा कशी असेल हे सांगणे कठीण आहे. परंतु हा या लेखाचा विषय नसून कृषिक्षेत्रातील झपाटय़ाने होणारे बदल, त्याचा कमॉडिटी बाजारावरील परिणाम आणि त्यानिमित्ताने गुंतवणूकदारांना निर्माण झालेल्या नवीन संधींचा ऊहापोह या लेखात करू.

जूनमधील कृषी सुधारणांच्या जेमतेम १० दिवस आधी कमॉडिटी बाजारात एक महत्त्वाची घटना घडली होती. देशातील पहिलावहिला कमॉडिटी निर्देशांक आणि तो देखील कृषिजिनसांच्या किमतींवर आधारित असलेला अ‍ॅग्रीडेक्स गुंतवणूकदारांसाठी खुला केला गेला. नॅशनल कमॉडिटी आणि डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज, अर्थात ‘एनसीडीईएक्स’ने सूचिबद्ध केलेल्या या निर्देशांकावर या स्तंभातून त्यावेळी सविस्तरपणे लिहिले गेले होते. सुरुवातीच्या चांगल्या प्रतिसादानंतर या निर्देशांकामधील व्यवहार पुढील काही दिवसात आटल्याचे निदर्शनास आले. याच काळात देशातील पूर्णपणे बंद पडलेल्या उद्योगांमध्ये हळूहळू हालचाल सुरू झाली होती. अर्थव्यवस्था परत एकदा रुळावर येण्यासाठी वाटचाल करू लागली होती. विशेषत: कृषी क्षेत्र सुरुवातीच्या झटक्यानंतर लगेचच पूर्णत: सावरले एवढेच नव्हे तर इतर उद्योगांमध्ये नकारात्मक वाढ झाली असताना फक्त कृषी क्षेत्राची जोरदार वाढ झाल्याचे देशाने पाहिले.

कृषिक्षेत्रात वेगाने होत असलेले बदल, तसेच निर्यात आणि देशांतर्गत बाजारात या क्षेत्राने मारलेली मुसंडी याचे प्रतिबिंब कुठेतरी कृषिमालाच्या सुधारलेल्या किमतींमध्ये उमटत होते. अर्थात अतिपावसाने घातलेला गोंधळ आणि त्याचा फळे आणि भाजीपाला तसेच उभ्या धान्यवर्गीय पिकांवर विपरीत परिणाम झाला. यामुळे या किमती खूपच वाढून अन्नपदार्थाच्या महागाई निर्देशांकातील झालेली वाढ रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती. यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि अगदी शेतीक्षेत्रासाठी देखील समस्या निर्माण झाल्या असल्या, तरी या काळातील परिस्थितीचे नेमके चित्र अ‍ॅग्रीडेक्स या निर्देशांकामध्ये पाहायला मिळाले. अर्थव्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून त्या अनुषंगाने आपल्या गुंतवणूकविषयक धोरणात सातत्याने बदल करण्यासाठी सल्लागार कंपन्यांना शेअर बाजारात ज्याप्रमाणे निफ्टी आणि सेन्सेक्स किंवा बँकनिफ्टीसारखे पर्याय आहेत. त्याप्रमाणे कृषिक्षेत्रासाठी अ‍ॅग्रीडेक्सची मदत होईल असे म्हणण्याइतपत या निर्देशांकाची कामगिरी झाली आहे. शेवटी गुंतवणूकदारांसाठी जोखीम व्यवस्थापनाद्वारे भांडवल सुरक्षित ठेवण्याबरोबरच अधिकाधिक परतावा देणारे साधन अधिक लोकप्रिय होते. या निकषावर विचार केला तर ऑक्टोबरअखेर संपलेल्या तिमाहीमध्ये अगदी निफ्टी, किंवा सेन्सेक्सच्या तुलनेमध्ये अ‍ॅग्रीडेक्सने दणदणीत परतावा दिल्याचे दिसेल.

उपलब्ध माहितीप्रमाणे ऑगस्ट-ऑक्टोबर या तिमाहीमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्सने साधारणपणे पाच टक्कय़ांहून थोडा जास्त परतावा दिला असताना अ‍ॅग्रीडेक्समधील परतावा जवळपास तिपटीहून थोडा कमी म्हणजे १३.७ टक्के एवढा घसघशीत होता. याच काळात सोने आणि चांदी यातील गुंतवणुकीवर अनुक्रमे ५.७ टक्के आणि ६.२ टक्के एवढे नुकसान झाले आहे. केवळ ऑक्टोबरचा विचार करता, अ‍ॅग्रीडेक्स, निफ्टी आणि सेन्सेक्समधील परतावा अनुक्रमे ४.९ टक्के, ३.५ टक्के, ४.१ टक्के राहिला असून सोने आणि चांदीत तो अर्धा ते एक टक्कय़ाच्या दरम्यान राहिला आहे. कृषिक्षेत्रातील गुंतवणुकीद्वारे देशाच्या प्रगतीमध्ये सामील होण्याची संधी मिळते या पुस्तकी वाटणाऱ्या वाक्याला अ‍ॅग्रीडेक्सने आपल्या अस्तित्वाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये खरे करून दाखवले आहे. त्यामुळे ‘गेमचेंजर’ म्हटल्या गेलेल्या कृषिधोरण सुधारणा, करोना परिस्थितीमध्ये कृषिमाल पुरवठा साखळीमध्ये झालेली उलथापालथ, कृषिमाल खरेदी करण्याबाबत ग्राहकांची बदललेली मानसिकता आणि किरकोळ ग्राहक तसेच कंपन्यांनी चांगल्या मालासाठी अधिक किंमत मोजायची दाखवलेली तयारी, त्या अनुषंगाने निर्माण होणारी एक नवीन कृषिपणन व्यवस्था, यामुळे कृषिमाल प्रक्रियाधारक कंपन्यांच्या नफ्यात झालेली घसघशीत वाढ या सर्वच गोष्टी या एकाच तिमाहीमध्ये एकदम घडत असताना त्याचे प्रतिबिंब अ‍ॅग्रीडेक्समध्ये उमटणे याला योगायोग म्हणायचे कीगुंतवणूक क्षेत्रात येऊ घातलेला बदल हे पुढील काळात स्पष्ट होईल.

एकंदर कृषिजिनसांच्या किमतीमधील चढउतार, त्यांचा कॉर्पोरेट क्षेत्रातील नफ्यावर होणारा परिणाम, कंपन्यांचे क्रेडिट रेटिंग आणि भांडवल उभारणीची किंमत इत्यादी गोष्टी या एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी अ‍ॅग्रीडेक्स हे एक प्रभावी साधन होऊ शकेल. अगदी शेतकरी उत्पादक कंपन्यांनादेखील जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी अ‍ॅग्रीडेक्सचा वापर करणे लाभदायक ठरू शकते. अर्थात संस्थात्मक व्यवहारांसाठी लागणारी तरलता अजूनही कमी असली तरी गुंतवणूक सल्लागार कंपन्या, म्युच्युअल फंड तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील वित्तीय विभागातील विशेषज्ज्ञ या निर्देशांकामध्ये हळूहळू रस घेताना दिसत असल्याचे भांडवल बाजारातील मोठय़ा दलालांकडून कळते.  विशेष म्हणजे महागाई निर्देशांक आणि अ‍ॅग्रीडेक्समधील परस्परसंबंध जसजसे निश्चित होत जातील तसतसे गुंतवणूक क्षेत्रातील मोठमोठय़ा संस्था आणि फंड यात वळतील हे नक्की. मल्टी-अ‍ॅसेट फंड कमॉडिटीमध्ये रस घेत असतानाच सोने-चांदीबरोबरच सोयाबीन, सोयाबीन तेल आणि चणा देखील आपल्या ताटात वाढून घेतील अशी आशा करण्याइतपत अ‍ॅग्रीडेक्सची तयारी झाली आहे.

अ‍ॅग्रीडेक्समध्ये अंतर्भूत असलेल्या १० जिन्नसांपैकी सोयाबीन, हरभरा, सोयातेल, सरकी पेंड या चार कमॉडिटींचे वजन ५३ टक्के असून, मोहरी, गवार सीड, गवार गम, एरंडी किंवा कॅस्टर, जिरे, आणि धणे या सर्वाचे मिळून ४७ टक्के वजन आहे.

सध्या साधारण १,२०५ च्या दरम्यान व्यवहार होत असलेल्या या निर्देशांकाच्या एका कॉन्ट्रॅक्टमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे ५०० युनिट्स विकत घेतल्यासारखे आहे. म्हणजे एक वायदा ५०० गुणिले १२०५ = ६,०२,५०० रुपयांचा होतो. याचा सौदा करण्यासाठी ६ टक्के सुरुवातीचे मार्जिन भरायला लागते. म्हणजे साधारण ५०,००० रुपयांमध्ये मार्जिन देऊन शिवाय भावातील चढ-उतारांची काळजी घेण्यासाठी सुरक्षित रक्कम धरून सौदा करणे शक्य होते. आपण खरेदी किंवा विक्री केल्याच्या भावामध्ये एक रुपयाचा बदल म्हणजे ५०० रुपयांचा फायदा किंवा तोटा असे किरकोळ गुंतवणूकदारांना समजण्यास सोपे गणित असते. विशेष म्हणजे हा निर्देशांक ‘कॅश-सेटल्ड’ असल्यामुळे इतर कृषी वायद्यांमध्ये येऊ शकणारी डिलिव्हरीची शक्यता यात नसते. हाच घटक आगामी काळात म्युच्युअल फंडांसाठी देखील उपयुक्त ठरेल.

* लेखक वस्तू बाजार विश्लेषक.

ksrikant10@gmail.com

(हा लेख अ‍ॅग्रीडेक्स या निर्देशांकाबाबत गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी लिहिलेला असून तो गुंतवणूक करण्यासाठी दिलेला सल्ला मानू नये.)

 

कांदा अन् कोंडी

सध्या कांद्याच्या किमती परत एकदा सलग तिसऱ्या वर्षी वेगाने वाढत असून नेहमीप्रमाणे माध्यमांमध्ये चर्चा आणि सरकारी पातळीवर ठिगळे लावण्याची नेहमीची प्रथा सुरू झाली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, अत्यंत खराब हवामानामुळे चाळींमधील साठवणूक केलेल्या कांद्याचे अतोनात नुकसान झाल्यामुळे विक्रमी पिकाच्या वर्षांत देखील टंचाईला सामोरे जायला लागत आहे. तर लांबलेला पाऊस आणि खरीप पिकाच्या सर्वच अवस्थांमध्ये झालेला अति पाऊस यामुळे येऊ घातलेले पीक देखील निम्मे तरी असेल का, याबद्दल अजूनही शंका आहे. पाऊस अजूनही जाण्याचे नाव घेत नाही तर ‘ला-नीना’च्या प्रभावामुळे डिसेंबपर्यंत हवामान कसे राहील याबद्दल शाश्वती नाही. एवढय़ावरच कांदे उत्पादकांवरील संकटे थांबत नसून येत्या रब्बी पिकासाठी बियाण्याची टंचाई आणि उगवण क्षमतेची खात्री नसताना देखील त्याच्या किमतीमध्ये झालेली अनेकपट वाढ, यामुळे पुढील काही महिन्यांतील परिस्थिती देखील बिकट झालेली आहे. नुकतीच साठवणूक मर्यादा घातल्यावर  व्यापाऱ्यांनी खरेदी कमी केल्यामुळे देखील कांद्याच्या भावात थोडी नरमाई आली आहे. जरी कांदा आयात झाला तरी वरील परिस्थिती पाहता नजीकच्या काळात पुरवठय़ामध्ये मोठी वाढ होणे कठीण असल्यामुळे किमतीमध्ये अजून फार घट होण्याची शक्यता नाही. साधारणपणे डिसेंबरपर्यंत पुरवठा जेमतेमच राहणार असल्यामुळे उत्पादकांनी पॅनिक सेलिंग टाळून कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात आणल्यास घाऊक किमती आहेत त्या पातळीवर स्थिर राहून कदाचित अजून १५-२० टक्के वाढू शकतील.