News Flash

फंडाचा  ‘फंडा’… : गुंतवणुकीचा वार्षिक आढावा महत्त्वाचाच!

सर्वसाधारणपणे ‘फोर परसेंट रुल’ हा सेवानिवृत्तीनंतर किती पैसे काढून घ्यावेत हे ठरवण्यासाठी वापरला जातो.

|| भालचंद्र जोशी

एक जबाबदार गुंतवणूकदार म्हणून आपले नवीन वर्ष हे जानेवारीत नव्हे, तर एप्रिलपासूनच सुरू व्हायला हवे. नवीन आर्थिक वर्षारंभाचा संकल्प म्हणून आपल्या गुंतवणुकीचा नियमित वार्षिक आर्थिक आढावा घेण्याची सवय गुंतवणूकदारांनी अंगीकारणे आवश्यक आहे. हा आढावा घेतल्यानंतर आपल्या आर्थिक गुंतवणुकीमध्ये योग्य ते बदल करणे अपेक्षित आहे. सामान्य गुंतवणूकदारांना भेडसावणाऱ्या त्यांच्या पोर्टफोलिओसंबंधीच्या शंकांचे निरसन करीत असताना असे जाणवते की, अनेक समस्या या मुळात वार्षिक आर्थिक आढावा न घेतल्याने निर्माण झाल्या आहेत.

पोर्टफोलिओच्या वार्षिक आर्थिक आढाव्यातून या समस्यांची उत्तरे निश्चित मिळू शकतील. ‘माझ्या गुंतवणुकीची प्रगती माझे आर्थिक उद्दिष्ट साध्य होण्यास मदत करत आहे का?’ हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न वार्षिक आढाव्याच्या निमित्ताने तुमच्या वित्तीय नियोजकाला विचारणे गरजेचे आहे. वित्तीय उद्दिष्ट साध्य करण्यास आवश्यक असलेल्या रकमेपैकी किती रक्कम जमा झाली आहे. उदाहरणार्थ, निवृत्ती नियोजनांत निवृत्तिकोश संचयाचे दोन भाग असतात. पहिला भाग सक्तीचा ज्यात भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी यांसारखी सक्तीची साधने समाविष्ट असतात, तर दुसरा हिस्सा ऐच्छिक बचतींचा असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे पाच कोटींचा निवृत्तीकोश जमविण्याचे लक्ष्य असेल तर साधारण ३० टक्के रक्कम सक्तीच्या बचतीचा हिस्सा असतो. उर्वरित ७० टक्के रक्कम ऐच्छिक बचतीच्या माधमातून जमवायची असते. गुंतवणुकीचा वार्षिक आढावा घेताना या ७० टक्के ऐच्छिक रकमेच्या योगदानाची कार्यक्षमता तपासता येते. एक उदाहरण म्हणून धरून चला, आपल्या सध्याच्या पोर्टफोलिओने वर्षारंभी आर्थिक ध्येयाच्या ७८ टक्के उद्दिष्टापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मागील वर्षी याच सुमारास अपेक्षित उद्दिष्टपूर्तीपेक्षा कमी लक्ष्य गाठले गेले असेल. या वर्षी मागील वर्षभरात बाजारात आलेल्या जबरदस्त तेजीच्या लाटेने अपेक्षित उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य ओलांडून १० ते १५ टक्के अधिक कोश जमा झाला असू शकेल. जेव्हा बचत दराचा परतावा कमी होत असेल तेव्हा आपल्याला जास्त बचत दराचे लक्ष्य ठेवावे लागेल. आपण सेवानिवृत्तीव्यतिरिक्त इतर उद्दिष्टांसाठी उदाहरणार्थ मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी अथवा सेवानिवृत्तीपश्चात राहण्यासाठी घर बांधणे इत्यादीसाठी बचत करीत असाल तर बचत परतावा कमी झाल्यामुळे गुंतवणुकीतील २०१८ साली असलेला बचत दर आपल्याला वाढवावा लागेल. सेवानिवृत्ती पैसे काढण्याचा दर (अ‍ॅन्युइटी रेट) नेमका किती असावा आणि प्रत्यक्षात किती असू शकेल याचा आढावा घेणे गरजेचे आहे.

सर्वसाधारणपणे ‘फोर परसेंट रुल’ हा सेवानिवृत्तीनंतर किती पैसे काढून घ्यावेत हे ठरवण्यासाठी वापरला जातो. या नियमानुसार ढोबळपणे आपण आपल्या निवृत्तीच्या वेळी जमा रकमेपैकी ४ टक्के रक्कम दरवर्षी वापरू शकतो. हा नियम सेवानिवृत्तीसाठी स्थिर उत्पन्न मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे; परंतु किती पैसे काढणे ही बाब मुख्यत: व्याज दर आणि गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभांशांवर अवलंबून असते. पोथिनिष्ठ गुंतवणूक सल्लागार या नियमाचे अंधानुकरण करताना दिसतात. तरल व्याज दराच्या दिवसांत सरकारी योजना (पंतप्रधान वय वंदन, एलआयसी जीवन अक्षय वगैरे सारख्या) सुद्धा एप्रिल महिन्यात वर्षभरासाठी व्याज दराची निश्चिती करीत असताना ‘फोर परसेंट रुल’नुसार सेवानिवृत्तीनंतर किती पैसे काढून घेणे योग्य होईल? हा प्रश्न वार्षिक आर्थिक आढाव्यात ठरवणे योग्य ठरेल.

पोर्टफोलिओचे मूल्यांकन आणि मालमत्तेची विभागणी करण्यासाठी ‘मॉर्निंगस्टार एक्स-रे’सारख्या किंवा तत्सम इतर तंत्रांची मदत घेणे कधीही योग्य ठरेल. ‘मॉर्निंगस्टारच्या इन्स्टंट एक्स-रे’द्वारे आपल्या एकूण पोर्टफोलिओच्या रोखे, समभाग, सोने यांचा तपशील आपल्याला वास्तवातील मालमत्ता विभाजन आणि अपेक्षित विभाजन यांच्यातील तुलना करून पोर्टफोलिओचे संतुलन साधून देऊ शकतील. आपल्या गुंतवणुकीची कार्यक्षमता तपासण्यासाठी मॉर्निंगस्टारचे ‘लाइफटाइम अलोकेशन इंडेक्स’ किंवा इतर तत्सम पर्याय वापरून साधन मानदंड निश्चित करता येते. तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले मालमत्ता विभाजन नुसतेच उपयुक्त नसेल तर गुंतवणुकीची कार्यक्षमता तसेच उच्च-गुणवत्ता राखण्याची ते ग्वाही देईल.

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये समभागांची जोरदार उसळी पाहता बऱ्याच गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओतील मालमत्ता विभाजन हे समभागांकडे अधिक झुकलेले असेल. पोर्टफोलिओचे संतुलन साधताना निवृत्तीला किती वर्षे शिल्लक आहेत याचा प्रामुख्याने विचार करून मालमत्ता विभाजनाचे संतुलन साधता येईल. निवृत्ती दृष्टिपथात असलेले आणि निवृत्तीस किमान १० वर्षे शिल्लक असलेल्यांचे मालमत्ता विभाजन वेगवेगळे असायला हवे. आपल्या पोर्टफोलिओत समभागाची मात्रा अधिक असेल आणि आपण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असाल तर समभागाची मात्रा त्वरित कमी करायला हवी. रोख्यांसारख्या सुरक्षित मालमत्तेत पैसे नियमितपणे स्थानांतरित करणे आपल्या एकूण पोर्टफोलिओचे मूल्यांकनाच्या ऱ्हासापासून बचाव करेल.

समभाग गुंतवणुकीवरील १ लाखावरील भांडवली लाभावर १० टक्के कर आकारणी होत आहे. एक लाखापर्यंत समभाग गुंतवणुकीवरील दीर्घकालीन भांडवली लाभ घेणे हे गुंतवणुकीची कर कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. दर वर्षी एक लाख नफा काढून न घेतल्यास जेव्हा पैसे काढून घ्याल त्या वर्षी १ लाख वगळता सर्व नफा करपात्र उत्पन्न समजला जाईल. एक लाखापर्यंत करमुक्त असलेल्या भांडवली लाभाचा गुंतवणूकदारांनी दर वर्षी फायदा घ्यायलाच हवा. गुंतवणुकीचा नियमित वार्षिक आर्थिक आढावा घेण्याची सवय कराल तितकी गुंतवणुकीतील अस्थिरता कमी जाणवेल व आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होईल.

तळटीप : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल  मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारी

bhalchandra.joshi@ whiteoakindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 12:01 am

Web Title: an annual review of the investment is important akp 94
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : बाजार चैतन्याची आस २०२१ मध्येही!
2 ‘ऑटो डेबिट’संबंधी नवीन निर्देशांना रिझर्व्ह बँकेकडून सहा महिने मुदतवाढ
3 Auto-debit Payment ची सुविधा १ एप्रिलपासून बंद होणार? बँकांच्या चुकीचा ग्राहकांना बसणार भुर्दंड!
Just Now!
X