|| आशीष ठाकूर

बाजारातील   पडझड कुठवर?

गेल्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक ही सेन्सेक्सवर ३९,४०० आणि निफ्टीवर ११,५०० या सूचित पहिल्या लक्ष्यासमीप येऊन गेली आणि पुन्हा बाजारात घसरण सुरू होऊन सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी निफ्टीने दिवसांतर्गत १०,८२७ चा नीचांक नोंदवत, आपले १०,८०० हे खालचे लक्ष्य साध्य केले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३७,५७६.६२

निफ्टी : १०,९८९.४५

गेल्या महिन्यातील १७ फेब्रुवारीला आपण सेन्सेक्सवर ४१,००० आणि निफ्टीवर १२,००० या पातळीवर होतो. आता हे अनेकांना कदाचित अविश्वसनीय वाटेल. कारण कामकाज झालेल्या अवघ्या पंधरा दिवसांच्या आत, बाजारात घातक उतार येऊन, धुळवडीच्या अगोदरच बाजाराची धूळधाण झाली. आतापर्यंत सेन्सेक्सवर ५,००० अंशांची आणि निफ्टीवर १,६०० अंशांची घसरण होऊनही, या स्तरावरून ती बाजार सावरेल काय, अशी सुतराम शक्यता वाटत नाही. किंबहुना बाजार कोसळण्याचे ‘भय इथले संपत नाही’ अशी आजची सद्य:स्थिती आहे.

तेव्हा आता काळाची गरज लक्षात घेता निर्देशांकाची भविष्यकालीन रूपरेषा कशी असेल त्याचा आज आढावा घेऊया.

येणाऱ्या दिवसांत सेन्सेक्सवर ३६,००० आणि निफ्टीवर १०,७०० चा स्तर राखण्यात, निर्देशांक यशस्वी ठरल्यास पडझडीतून एक सुधारणा अपेक्षित असून तिचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३९,४०० आणि निफ्टीवर ११,५०० असे असेल. या स्तरावर तेजीच्या वाटचालीला पूर्णविराम अपेक्षित असून पुन्हा मंदीचे आवर्तन सुरू होऊन निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३५,००० आणि निफ्टीवर १०,५०० असे असेल.

इतिहासात डोकावता..

आज सर्वत्र चर्चेत असलेल्यायेस बँकेचा आढावा तिमाही निकालांतर्गत यापूर्वी कधी घेतला होता का? मागे वळून पाहिले असता, या स्तंभात २२ एप्रिल २०१९ च्या लेखात येस बँकेचे विश्लेषण आले होते. त्या वेळेला तिमाही निकालाच्या २६ एप्रिल या नियोजित तारखेआधी या समभागाचा आढावा घेण्यात आला होता. समभागाचा त्यासमयी म्हणजे १८ एप्रिल २०१९ चा बंद भाव २५५ रुपये होता. निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर २३० रुपये होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट, असे सुचविले गेले होते. भविष्यात प्रत्येक तिमाही निकालानंतर २३० रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराच्या वर येस बँक जात नाही तोपर्यंत तिमाही निकालात सुधारणा नाही आणि बाजारभाव कोसळण्याचे भयही कायम असेल, हेही सांगितले गेले. जून ते डिसेंबर २०१९ मध्ये प्रत्येक तिमाही निकालानंतर येस बँक २३० रुपयांच्या जवळपास फिरकला देखील नाही, गेल्या शुक्रवारी, ६ मार्चला त्याने दिवसांतर्गत साडेपाच रुपयांचा तळही गाठला. ज्या गुंतवणूकदारांनी ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना जोपासली ते येस बँकेपासून कटाक्षाने दूर राहिले आणि आपले भांडवल/मुद्दल वाचविण्यात यशस्वी ठरले.

हे जवळपास अकरा महिन्यापूर्वीचे झाले हो! आताचे बोला की..  असे म्हणणे रास्तच आहे.

या स्तंभातील ६ जानेवारीच्या लेखातील समभाग होता इंडसइंड बँक. तिमाही निकालाची नियोजित तारीख ही १४ जानेवारी होती. तर ३ जानेवारीचा बंद भाव १,५२९ रुपये होता. निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर १,४८० रुपये होता. तिमाही निकालानंतर १,४८० रुपयांवर भाव टिकणे नितांत गरजेचे होते तर निकाल उत्कृष्ट अन्यथा निराशाजनक, असे निष्कर्ष मांडले होते. जानेवारी अखेरीला मंदीचा मागमूसही नसताना इंडसइंड बँकेचा बाजारभाव १,२५० पर्यंत घसरला तर गेल्या शुक्रवारी ६ मार्चचा बंदभाव १,०१४ रुपये होता. ज्या गुंतवणूकदारांनी ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तरा’वर लक्ष ठेवून त्याचे पालन केले त्यांना आज ‘रक्तपाताच्या दिवसात’आपली मुद्दल वाचवण्यात यश आले असे समजण्यास हरकत नाही.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.