‘लोकसत्ता’चा ‘अर्थब्रह्म’ हा २०१५-१६ साठीचा दुसरा वार्षिकांक ठाण्यात समारंभपूर्वक प्रकाशित झाला. शेकडो वाचकांच्या साक्षीने शुक्रवारी (२७ मार्च) त्याचे टीप-टॉप प्लाझा, ठाणे (प.) येथे प्रकाशन झाले. कोटक म्युच्युअल फंडांच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी (रोखे) लक्ष्मी अय्यर, ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक व शेअर बाजार विश्लेषक अजय वाळिंबे आणि सनदी लेखाकार व कर सल्लागार जयंत गोखले या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची जोड या कार्यक्रमाला देण्यात आली आणि ठाणेकरांनीही त्याला यथोचित उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक बचत योजना ते भांडवली बाजार, म्युच्युअल फंड आणि नवागत पर्यायांवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. तर उपस्थितांनी या निमित्ताने आपल्या कर नियोजन, गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन करून घेतले. या मार्गदर्शन कार्यक्रमाचा हा लेखा-जोखा..

av-02गुंतवणुकीला पुरेसा वेळ द्यायलाच हवा.. – लक्ष्मी अय्यर
* म्युच्युअल फंड ही विखुरलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे एकत्रित करून विशिष्ट गुंतवणूक ध्येयानुसार त्याची सुरक्षित पद्धतीने तज्ज्ञ व्यवस्थापक गुंतवणूक करीत असतात. म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी या सगळ्याचा परिपूर्ण अभ्यास करून त्यातून जास्तीचा नफा कमावून तो गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवत असतात. गुंतवणूकतज्ज्ञांना सगळ्याच गोष्टी येतात, असेही नाही; पण त्यांचा बाजारात जास्तीत जास्त वेळ जात असल्याने त्यांना अधिकची माहिती मिळत असते. बाजारात रोजच नवीन क्लृप्त्या मिळत नसतात. अनेकदा जुन्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने मांडूनही सांगितल्या जातात. त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने माहिती घेऊन गुंतवणूक करावी.
विविध म्युच्युअल फंड, कंपन्यांवर सेबी या भांडवली बाजार नियामकाचे नियंत्रण असल्याने गुंतवणूकदारांनाही त्यांच्यामार्फत संरक्षण मिळत असते. त्यामुळे आपले पैसे घेऊन कुणी पळून गेले असे इथे चिट फंड कंपन्यांसारखे होत नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करण्यासाठी विविध माध्यमे आपल्यासमोर खुली असून ऑनलाइन पद्धतीने, वितरक बँका व तत्सम मध्यस्थ वा गुतंवणूक सल्लागाराच्या मदतीने किंवा म्युच्युअल फंडच्या थेट कार्यालयात जाऊनही तुम्ही गुंतवणूक करू शकता. सध्याच्या स्मार्टफोनच्या जमान्यात तशी फोनद्वारे गुंतवणुकीची सुविधादेखील आपल्याकडे सध्या उपलब्ध झाली आहे.
म्युच्युअल फंडांमध्येही एकाच वेळी पैसे भरून गुंतवणूक करता येते. तर प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम अशा नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेद्वारेही (एसआयपी) आपण या पर्यायात गुंतवणूक करू शकतो. दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमी फायदेशीर ठरत असते. सोने, मालमत्ता आणि बँकेच्या ठेवींमध्ये केलेल्या गुंतवणुकीपेक्षा हा परतावा नेहमीच मोठा असतो. सध्याचा महागाईचा दर लक्षात घेतला तर हा दर ७ टक्क्यांच्या आसपास असून पुढील २० वर्षांमध्ये ध्येयपूर्तीसाठी त्या दराने वाढलेल्या किमतीचा विचार आपल्याला आत्ताच करणे आवश्यक ठरणार आहे. विद्यमान स्थितीत एखाद्याचे २० हजार रुपयांच्या पगारात भागत असेल तर २० वर्षांनंतर आजच्यासारख्या जीवनशैलीसाठी त्याला सुमारे ८० हजारांचे उत्पन्न लागणार आहे. महागाईचा सध्याचा ७ टक्के दर गृहीत धरला तर बँकांमधील ठेवींवर अधिक व्याज मिळणे भविष्यातही कठीण आहे. एखाद्याला तीन वर्षांची मुलगी असेल आणि तिच्या लग्नासाठी सध्याच्या कालावधीत ३ लाख खर्च येणार असला तर २० वर्षांनंतर हा खर्च सुमारे १९ लाखांपर्यंत पोहोचलेला असेल. बँकेच्या ठेवीमधून इतक्या मोठय़ा प्रमाणात परतावा मिळणार नाही. मात्र समभाग निगडित म्युच्युअल फंडातील (इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंड योजना) गुंतवणुकीमधून मात्र इच्छित मोठा परतावा मिळविता येईल.
भारतातील बँकिंग व्यवस्था आजमितीला ९० लाख कोटींची आहे, तर म्युच्युअल फंड क्षेत्र केवळ १२ लाख कोटींपल्याड गेले आहे. पैकी समभागावर आधारित इक्विटी म्युच्युअल फंडातील रक्कम केवळ ३ लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. यातून आपल्याला या क्षेत्रातील दरी लक्षात येईल. गेल्या पाच वर्षांमध्ये परताव्याची टक्केवारी पाहिल्यास २० टक्क्यांपर्यंत परतावा केवळ म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीतून मिळू शकला आहे. सोन्यातून १० टक्के तर स्थावर मालमत्ता क्षेत्रातून १५ टक्क्य़ांच्या आसपास परतावा मिळाल्याचे आपण पाहिले. गेल्या १५ वर्षांतील कल पाहिला तर, बाजारात मंदी असताना गुंतवणूक करणारे आणि तेजी असताना गुंतवणूक करणारे यांच्यामधील फरक अवघा एक टक्का आहे. मंदीमध्ये संधी साधण्यासाठी मात्र अशा गुंतवणूकदारांना वेळ साधावी लागते. बाजारात टिकून राहण्यासाठी अधिकचा वेळ घालवावा लागतो. मात्र अगदी काही प्रसंगीच बाजारात गुंतवणूक करून कमी वेळात चांगला फायदा कमावला जाऊ शकतो. एखादी चांगली आणि दर्जेदार कलाकृती कष्टाविना प्राप्त होत असेल तर त्याची किंमत राहत नाही. गुंतवणुकीसाठी किंमत मोजली पण समर्पक ‘मूल्य’ हवे असेल तर तिला पुरेसा वेळ देण्याशिवाय गत्यंतर नाही.

av-03गुंतवणूकदारांसाठी कर हे आद्यकर्तव्यच! –  जयंत गोखले
* एक काळ असा होता की, मराठी मध्यमवर्गीय माणूस सर्वार्थाने मुदत ठेवीपलीकडे गुंतवणूक करत नव्हता आणि मुदत ठेवीव्यतिरिक्त गुंतवणूक म्हणजे ती धोकादायकच, असे त्याचे ठाम मत असायचे. यामुळे गुंतवणूकदार म्हणजे सर्वसाधारण गुजराती, मारवाडी समाजातला असायचा. पूर्वी अशीच परिस्थिती होती. पण मराठी माणूस आता गुंतवणुकीकडे वळला आहे.
तुम्ही पुढील वर्षांचे वित्तीय नियोजन करणार असाल तर ध्यानात घ्या की, नुकताच नव्या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर व्हायचे आहे. मात्र त्यातून साधारणत: पुढच्या वर्षांचे नियोजन कसे करावे याचा अंदाज बांधता येतो.
बदलत्या काळानुसार आम्हीही नियोजनाच्या व्याख्येत बदल केले. यामुळे कर नियोजनाऐवजी आम्ही कर व्यवस्थापन असे म्हणतो. कारण कर नियोजन करणे मोठय़ा कंपन्यांना कदाचित परवडते. पण सर्वसामान्य माणसाला कर नियोजन करून त्याच्यातून होणाऱ्या कटकटी या सवलतीपेक्षा जास्त जाचक वाटतात. यामुळे कर नियोजन करणे कितपत योग्य आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. कष्टाने मिळविलेल्या पैशाची योग्य गुंतवणूक होऊन त्याचा चांगला परतावा मिळावा आणि त्यायोगे कुटुंबासोबत आनंदाने व शांतपणे जीवन जगावे, असे सर्वानाच वाटत असते. यासाठी प्राप्तिकराची एक नोटीस आपल्या गुंतवणूक नियोजनाला सुरुंग लावणारा प्रकार ठरू शकतो. त्यामुळे याकडेही लक्ष केंद्रित केले पाहिजे. काही सल्लागार उत्तम सल्ला देतात. पण जगापेक्षा आपण हुशार असल्याचे दाखविल्यावर प्राप्तिकर आडवा येतो. त्याच्या मनस्तापामुळे पैसे कमावल्याचा आनंदही नाहीसा होतो.
यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठे बदल करण्यात आले असून ते तुमच्या पुढच्या नियोजनासाठी लागू ठरायला हवेत. त्यात एक उल्लेख असलेल्या सुकन्या-समृद्धी योजनेमध्ये मुलीच्या उच्च शिक्षणाकरिता किंवा तिच्या लग्नासाठी अशा दोन कारणांसाठी पैसे काढता येऊ शकतात. प्रधानमंत्री जन धन योजनेमुळे सरकारकडे मोठे भांडवल उभे राहील आणि त्याचा सामाजिक लाभही होईल. सहकारी बँकेतील ठेवींमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत. ठेवींवरील व्याज उत्पन्नातून करवसुली  होऊ नये म्हणून खातेदार एकाच बँकेच्या विविध शाखांत ठेवी ठेवत. मात्र, कोअर बँकिंगमुळे प्रत्येक शाखा ही वेगळी समजण्याचा प्रश्नच येत नाही. आता तर तुम्हाला आता टीडीएस भरावा लागणार आहे. यामुळे हा कर वाचविण्याचा प्रयत्न करू नका. तोच काय पण कोणताही कर चुकविण्याचा प्रयत्न करू नका. कर हा गुंतवणुकीचा दुसरा मार्ग असल्याने त्याचा भरणा करणे आपले आद्यकर्तव्य आहे. त्याचबरोबर कराबाबत हिंदू अविभक्त कुटुंब पद्धती ही कर व्यवस्थापनासाठी एक चांगला विषय असला तरी तो काळजीपूर्वक वापरावा. कारण त्याचे काही तोटेही आहेत. काही धोकेही त्यात आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

av-04अभ्यासाअंती केलेली गुंतवणूक आनंददायीच!- अजय वाळिंबे
*  मराठी माणूस कायमच छोटय़ा आशा ठेवून जगत राहिला आहे. पण काळ  खूप बदलत चालला आहे. ३० वर्षांपूर्वी मी स्वत: जेव्हा शेअर बाजारात रस घ्यायला सुरुवात केली त्या वेळी माझ्या आईने ते वाईट असल्याचे सांगितले होते. त्यापासून मला दूर राहण्यास सांगितले गेले; मात्र त्याकडे लक्ष न देता मी ते करत राहिलो. त्यामुळे आता तिचे ऐकले नाही, याचे समाधान मिळते. तुम्हीदेखील गुजराती – मारवाडी यांच्यासारखे विचार करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मात्र त्यासाठी डोळे उघडे ठेवून तुम्हाला वागावे लागेल. काम करताना कायद्यानेच काम करायचे असते; चुका-अपयशातून मार्ग शोधण्याची गरज असते. गुंतवणुकीसाठी मी जेव्हा विचार करतो तेव्हा प्रत्येक वेळी मी यशस्वी झालोच, असे नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण म्हणून सतत अपयश आलेच पाहिजे असेही नाही.
शेअर बाजारामध्ये ‘आशा’ नावाची एक वाईट गोष्ट आहे. आपण एक शेअर खरेदी करून ठेवतो आणि तो वाढणार आहे या आशेवर जगत असतो. कोणी तरी सांगून शिकण्यापेक्षा शेअर बाजार हा तुमचा तुम्हीच शिका. कुणी तरी टिप दिली म्हणून काही वर्षांपूर्वी मी एक १८ रुपये किमतीचा शेअर घेतला होता. मात्र पुढे तो कधीच वाढला नाही. अखेर तो शेअर बुडीत गेला. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अशा चुकांपासून दूर राहिले पाहिजे. आपण नेहमीच जलद परताव्याकडे आकर्षित होतो. वर्षभरात दामदुप्पट मिळत असले तर आपण सहज त्यात पैसे टाकतो. हा मनुष्य स्वभावच आहे. पण त्याच वेळी आपल्याला संयमही राखता आला पाहिजे. कित्येक चांगल्या कंपन्यांचे भाव खूप वरती आहेत. त्यांचे कर्जाचे प्रमाण पाहा, डेट- इक्विटी रेशो, इंटरेस्ट कव्हरेज रेशो काय आहे हे पाहिल्याशिवाय त्यात गुंतवणूक करू नका. केवळ अमुक एकाने सांगितले म्हणून शेअर विकत घेतला, असे करू नका. तुमचा स्वत:चा अभ्यास त्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तुम्ही स्वत: जोपर्यंत एखाद्या कंपनीविषयी, समभागाबाबत वाचत नाही, अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गुंतवणुकीतून काहीच मिळणार नाही. शिवाय त्याचा आनंदही तुम्हाला घेता येणार नाही. तुम्ही स्वत: विचार करून गुंतवणूक कराल तेव्हाच तुम्हाला फायदा आणि आनंद दोन्ही मिळतील.
शेअर बाजाराव्यतिरिक्त अन्यही काही गुंतवणुकीचे पर्याय आहेत. अपरिवर्तनीय रोखे (नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स) हा त्यातला एक मार्ग आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्षच जात नाही. शेअर बाजारापेक्षा बाकीचे गुंतवणूक पर्याय पाहिल्यास त्यातूनही चांगला परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंड, करमुक्त रोखे यातसुद्धा फायदा आहे. केवळ शेअर्सचा विचार करण्याव्यतिरिक्त सोने, मालमत्ता यांचाही विचार करायला हवा. तुलनेत बँका तुम्हाला कधीच फार श्रीमंत करू शकणार नाहीत. तुम्ही बँकेत मुदत ठेव ठेवली तर त्यावर मिळणारे सध्याचे व्याज आणि महागाई यांची सांगड लक्षात घेतली पाहिजे. भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस) यांचाही विचार करावा. कोणतीही गुंतवणूक करताना एक कागद समोर ठेवून एकूण उत्पन्न व खर्चाचा विचार करून गुंतवणूक व्हायला हवी.
मुलीचे लग्न म्हणून अनेक वेळा सोने बाजूला काढले जाते. सोने घरात साठविण्याची एक प्रवृत्ती आपल्याकडे आहे. त्यामुळे नियोजन करताना समभागात (शेअर) ५० टक्के, पीपीएफ आदींमध्ये अन्य अशी गुंतवणूक विभागली पाहिजे. म्युच्युअल फंड, मुलांचे शिक्षण, दुसऱ्या घराचा विचार हेही करा. कारण जागांचे सध्याचे दर पाहता पुढच्या पिढीला घर घेणे आव्हानात्मक बनणार आहे. त्यामुळे त्याचा विचार आताच करा. विमा संरक्षण हा महत्त्वाचा विषय असून आपल्या मालमत्ता आणि आखलेले नियोजन सुरक्षित करण्यासाठी ते आवश्यकच.
शेअर बाजार नेमका कुणाला कळतो या विषयी साशंकता असणे साहजिक आहे. कारण ९० टक्के लोक आपल्याला बाजारातील काहीच कळत नाही, हे मान्य करतात. तर उर्वरित १० टक्के हे सर्व काही समजत असल्याच्या आविर्भावात असले तरी त्यांनी मांडलेले अनेक अंदाज हे चुकीचे ठरताना दिसतात. गुंतवणूक करताना गुंतवणुकीचे घडय़ाळ प्रत्येकाने पाहण्याची गरज आहे. योग्य वेळ साधून निर्णय घेतल्यास त्याचा फायदा हा होतच असतो. योग्य वेळी केलेली गुंतवणूक तुम्हाला नक्की फायदा मिळवून देईल. तेजीचा माहोल येतो तेव्हा खूप टिप्स दिल्या जातात. शेअरविषयी टिप देणारे अनेक असतात. मात्र अशा वेळी गुंतणूकदारांनी सावध राहून निर्णय घेण्याची गरज आहे.

उपस्थित वाचकांच्या प्रतिक्रिया
ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्नांवर उत्तरास मदत
सेवानिवृत्त झाल्यानंतर हाती असलेल्या मिळकतीची बचत नक्की कशी करावी, हा प्रश्न सर्वच ज्येष्ठ नागरिकांसमोर असतो. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या अर्थविषयक कार्यक्रमामुळे माझ्यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना मिळालेल्या मिळकतीची योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
विजय गावडे, मुलुंड

* नियोजित गुंतवणुकीचा लाभदायी पर्याय
‘अर्थब्रह्म’च्या प्रकाशन सोहळ्यातून निश्चितच समजला. मुदत ठेवीव्यतिरिक्त गुंतवणुकीचे अन्य स्रोत कळण्यास मदत झाली. मुदत ठेवीत आपले पैसे गुंतवण्यापेक्षा म्युच्युअल फंड हा मार्ग आजच्या घडीला किती महत्त्वाचा व फायदेशीर आहे याविषयी लक्ष्मी अय्यर यांनी केलेले मार्गदर्शन भविष्यात निश्चितच लाभदायी ठरेल. शेअर बाजाराविषयी सर्वसामान्य नोकरदारांना फारशी जाणीव नसते. परंतु या मार्गदर्शक व्यासपीठावर तज्ज्ञांनी सुचवलेला नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेचा (एसआयपी) पर्याय विशेष पसंतीस उतरला.
– सुहास कोकड,

* कार्यक्रमासाठी उपस्थित तिन्ही मान्यवरांनी गुंतवणूकविषयक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. अजय वाळिंबे यांचे ‘लोकसत्ता  अर्थ वृत्तान्त’मधील अभ्यासपूर्ण सदर मी नियमित वाचतो; त्यामुळे या कार्यक्रमात त्यांना प्रत्यक्ष ऐकण्यासाठी आलो आणि त्यांनी  केलेले विवेचन अभ्यासपूर्णच होते. लक्ष्मी अय्यर यांनी म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील दाखवलेला पर्यायी मार्ग तर जयंत गोखले यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातील करविषयक नवीन तरतुदींचे विवेचन सोप्या भाषेत विशद केले. त्यामुळे अर्थविषयक अनेक क्लिष्ट बाबीही नीट समजून घेता आल्या.
– अरुण भारंबे, कळवा

‘लोकसत्ता’चा अर्थसंकल्पानंतर आलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य होता. ‘कर’ विषयावरील उत्तम मार्गदर्शन यानिमित्ताने मिळाले. त्याचबरोबर नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामधील ‘सुकन्या-समृद्धी’विषयी सविस्तर आणि सोप्या शब्दांत माहिती मिळाली. गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून ‘म्युच्युअल फंडा’चा आम्ही नक्की विचार करणार आहोत. ‘लोकसत्ता’चे आभार मानत, अशा गुंतवणूकविषयक परिसंवादाचा पुन्हा लवकरच आम्हाला लाभ घेता यावा, हीच सदिच्छा.
– केशव दंड, ठाणे</p>

* ‘लोकसत्ता’ नेहमीच ‘अर्थ वृत्तान्त’च्या माध्यमातून आम्हाला अर्थविषयक माहिती देत असते. परंतु स्वत: अभ्यास करून गुंतवणूक कशी करावी हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने समजले. गुंतवणूकदारांमध्ये अर्थविषयक  जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे या निमित्ताने उत्तम मार्गदर्शन मिळाले. पुढील पिढीसोबतच निवृत्तीनंतरच्या उर्वरित आयुष्यासाठी ‘म्युच्युअल फंड’ कसे उपयोगी ठरणार आहेत याबाबत आम्हाला या कार्यक्रमाद्वारे कळले. त्यासाठी ‘लोकसत्ता’ला धन्यवाद.
– शुभदा बोरकर, ठाणे

* उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालताना भविष्यातील नियोजनाकडेही लक्ष ठेवावे लागते. विम्यांमध्ये गुंतवणूक करावी, म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवावेत, मालमत्ता खरेदीतून भविष्याची तरतूद करावी का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता -अर्थब्रह्म’च्या या कार्यक्रमातून मिळाली. तसेच करसल्लागार जयंत गोखले, गुंतवणूक तज्ज्ञ अजय वाळिंबे आणि म्युच्युअल फंडाच्या जाणकार लक्ष्मी अ य्यर या तज्ज्ञांचे मार्गदर्शन या माध्यमातून अत्यंत योग्य समयी आम्हाला लाभले.
– अशोक तिगडे, ठाणे

* ‘लोकसत्ता’चा मी नियमित वाचक आहे. अर्थविषयक घडामोंडीच्या बाबतीत दिशादर्शक म्हणून ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त’चा वाचकांना नेहमीच उपयोग होतो. मार्गदर्शनपर कार्यक्रमातून मनातील गुंतवणूकविषयक शकांची उत्तरे करसल्लागार जयंत गोखले, गुंतवणूक तज्ज्ञ अजय वाळिंबे यांच्या व्याख्यानातून समजली. लक्ष्मी अय्यर यांनी म्युच्युअल फंडांसंदर्भात दिलेली माहिती निश्चितच उपयुक्त होती. ठाणेकरांच्या ‘अर्थ’ज्ञानात निश्चितच या कार्यक्रमामुळे भर पडली आहे.
– राजेंद्र रोकडे, ठाणे

* गेल्या वेळच्या ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ मार्गदर्शनाला हजेरीची संधी हुकली होती. म्हणूनच यंदाच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिलो. गुंतवणूक व करविषयक प्राथमिक माहिती प्रत्येकाकडे हवी. हे आज खूपच गरजेचे आहे. नव्या आर्थिक वर्षांत या मार्गदर्शनाचा निश्चितच उपयोग होईल. अर्थविषयक घडामोडी सामान्य वाचकांना उलगडून देणारे ‘लोकसत्ता’ हे एकमेव मराठी वृत्तपत्र आहे.
– निनाद पाटील, शहापूर