भक्ती रसाळ bhakteerasal@gmail.com

महामारीमुळे मृत्युदर वाढत असताना, जीवन विमा योजना १५ दिवसांच्या प्रतीक्षा काळानंतर ग्राहकाला उपभोगता येणे हे अभूतपूर्व साहसच. विमा नियामक ‘इर्डा’ने ते विक्रमी वेळेत करून दाखविले. ‘करोना कवच’ या आरोग्य विम्याद्वारे आजारपणातील खर्चाची तजवीज करता येणे शक्य झाले. तद्वतच आर्थिक जोखमांची काळजी अत्यावश्यक होती. ‘इर्डा’ने त्याचीही समर्पक दखल घेतली.. 

करोनाकाळातील टाळेबंदीने अनेक उद्योगधंद्यांवर कायमचा पडदा टाकला. तर काही ठिकाणी नोकरकपात, वेतनकपात, तात्पुरती उत्पादनबंदी अपरिहार्य ठरली. गरीब-श्रीमंत, पगारदार-व्यावसायिकांपुढे उभ्या ठाकलेल्या या आर्थिक जोखमांनाही तोंड देणे अत्यावश्यक होते. मोठय़ा प्रमाणावर मध्यमवर्गीय पगारदारांवर गृहकर्ज हप्त्यांचा भार आहे. आपत्कालीन उपाययोजनेअंतर्गत रिझव्‍‌र्ह बँकेने कर्जे फेडण्याची मुदतवाढ उपलब्ध करून दिली. परंतु ती पुरेशी नव्हती. पगारकपात आणि बेरोजगारीला तोंड देताना सामान्य नागरिक अनाकलनीय महामारीशी सामना करत होता. कुटुंबप्रमुखावरच जर मृत्यूने घाला घातला तर उद्भवणारी आर्थिक आणीबाणीची कल्पनाच करवत नाही.

टाळेबंदीच्या काळात विमा नियामक ‘इर्डा’ने सर्वसामान्यांपुढील आर्थिक विवंचना ओळखून, त्याला समर्पक साद दिली. केवळ १५ दिवसांच्या प्रतीक्षा काळाची मुभा देणाऱ्या जीवन विमा योजना अल्पावधीत बाजारात आणल्या गेल्या. केवळ कोविड मृत्यूंसाठीची विमाराशी उपलब्ध व्हावी जेणेकरून संपूर्ण कुंटुंबाच्या भविष्यातील प्रत्येक गरजेची तजवीज करता येईल अशी कोविड टर्म पॉलिसी बाजारात आली. चालू जीवन विमा योजनांतील सम अश्युअर्ड म्हणजे विमा राशी कोविडमुळे मृत्यू पावलेल्या पॉलिसीधारकास तातडीने उपलब्ध करून दिली गेली.

जोखीम व्यवस्थापन करताना ‘कॅटास्ट्रॉपिक’ अर्थात आपात-जोखीम म्हणजेच भूकंप, ढगफुटी,महापूर, दुष्काळ यांसारख्या महाआपत्तींना विमा कंपन्यांकडून त्यांच्या पॉलिसीत अपवाद केला जातो. याचे प्रमुख कारण यासारख्या आपत्तींद्वारे होणारे आर्थिक नुकसान फार मोठे असते. विमा कंपनीला स्वतचा व्यवसाय चालवताना, पॉलिसीधारकांचा विम्याच्या हप्त्यांद्वारे मिळणाऱ्या निधीपेक्षा मृत्युदाव्यांवाटे वितरित भरपाईवर प्रचंड रक्कम खर्च करावी लागली तर त्या कंपनीलाच भविष्यात दिवाळखोरी घोषित करावी लागू शकते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या विषयांत तज्ज्ञता असणारे विमागणिती विशेष उपाययोजना आखतात.

करोनाकाळातील जोखीम ही केवळ अभूतपूर्व नव्हती तर कोणतीही ऐतिहासिक सांख्यिकी माहिती उपलब्ध नसलेली ती एक दुर्मिळातील दुर्मीळ आपत्ती होती! लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे त्या आपत्तीची मुदत, नुकसानीची व्याप्ती, जागतिक टाळेबंदीचा कालावधी सगळेच अदमास लावण्याच्या पलीकडले होते. अशा अभूतपूर्व जोखमीत पॉलिसीधारकास केवळ १५ दिवसांत जीवन सुरक्षाकवच उपलब्ध व्हावे हे ‘साहस’च आणि ते आजपर्यंतच्या इतिहासात कधीही नोंदवले गेले नाही.

भारतीय जनमानस हे टर्म पॉलिसीद्वारे जीवन विमा सुरक्षा मिळविण्याविषयी कमालीचे उदासीन आहे. भरलेला विमा हप्ता परत न मिळता केवळ मृत्यूपश्चात कुटुंबाला ‘फायदा’ होतो हा मुदतीच्या जीवन विम्याबाबत अपसमज वर्षांनुवष्रे पाळला गेला आहे. हेच अपसमज कुटुंबप्रमुखास योग्य विमा सुरक्षा कवच घेण्यापासून आजपर्यंत परावृत्त करीत आले. मनीबॅक योजना, एन्डोमेंट योजना, युनिट लिंक्ड योजना असे ‘गुंतवणुकीचा मुलामा चढवलेले’ आकर्षक विमा विकल्प गुंतवणूकदारास जास्त भावत असल्याने ‘टर्म प्लान’ अर्थात मुदतीचा विमा ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात नव्हता.

करोनाकाळातील आर्थिक आणीबाणीत जेव्हा प्रचंड वेगाने महामारीतील मृत्युदर वाढत असताना पगारकपात, बेरोजगारी, टाळेबंदी अशा संलग्न जोखमांवरही मात करण्यांची आव्हाने उभी ठाकली तेव्हा ग्राहकांना आपल्या चालू जीवन विमा राशींची बेरीज ही कुटुंबाच्या आर्थिक गरजांच्या सापेक्ष नाही हे लक्षात आले.

योग्य जीवन विमा योजना म्हणजेच टर्म प्लान! जेणेकरून गृह कर्ज, मुलांचे शिक्षणविषयक खर्च तसेच जोडीदाराच्या उर्वरित आयुष्याची तरतूद यांचे विम्याद्वारे संरक्षण होणे हा सुज्ञ विचार गुंतवणूकदारास अनुभवाद्वारे पटण्यासही २०२० साल उजाडावे लागले. तरीही थोडके नाही, असेच म्हणावे लागेल.

ग्राहकांनी जीवन विमा योजनांची निवड करताना लक्षात घ्यावयाचे घटक-

१) विमाकवच ठरविताना चालू गृह कर्जाची मुदत, सध्याचे उत्पन्न लक्षात घेतले जावे.

२) मुलांचे शिक्षणविषयक खर्च

३) स्वतचे सेवानिवृत्तीचे वय

४) जोडीदाराच्या उर्वरित आयुष्यासाठी लागणारी एकूण रक्कम

५) चलनवाढीचा दर

कारोनाकाळात आरोग्य आणीबाणीत आर्थिक आणीबाणीदेखील उद्भवते यांचे आपण जिवंतपणी अनुभव घेतले. आप्तेष्टांना आर्थिक मदत करतानाही आपल्या स्वतच्या आर्थिक मर्यादांची जाणीव या काळाने करवून दिली. न्यू नॉर्मल अर्थात करोनापश्चात सामान्य जीवनात ‘टर्म पॉलिसी’द्वारे उर्वरित आयुष्य सुरक्षित करून ‘समाज सुरक्षित’ करणे महत्त्वाचे आणि ते सहज शक्यही आहे हे भान दिले हे महत्त्वाचेच!

विम्याचे कवच किती हवे.. कसे ठरवाल?

ग्राहकांनी जीवन विमा योजनांची निवड करताना लक्षात घ्यावयाचे महत्त्वाचे घटक-

’ चालू गृह कर्जाची मुदत, सध्याचे उत्पन्न

’ मुलांचे शिक्षणविषयक खर्च

’ स्वतचे सेवानिवृत्तीचे वय

’ जोडीदाराच्या उर्वरित आयुष्यासाठी लागणारी एकूण रक्कम

’   चलनवाढीचा दर

लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार.