29 October 2020

News Flash

बंदा रुपया : ‘अनंत’ ध्येयासक्ती!

कंपनीचे लोक येऊन मला दुरुस्तीसाठी  घेऊन जायचे. या कामातही मी रुळू शकलो नाही

विद्याधर कुलकर्णी

देशाच्या संरक्षणसिद्धतेसाठी झटणाऱ्या ‘अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि.’ या उद्योगाने  ‘अनंत अमुचि ध्येयासक्ती’ ही काव्यपंक्ती सार्थ ठरविली आहे. सेन्च्युरी एन्का कंपनीतील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्या चेतन धारिया यांची गेल्या तीन दशकांची वाटचाल लक्षणीय स्वरूपाची आहे. खडकी येथे ‘डिफेन्स-एक्सपो १९८८’ या संरक्षण प्रदर्शनास दिलेल्या भेटीतून संरक्षणविषयक सुटे भाग उत्पादित करण्याचा उद्योग सुरू करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. नारायण पेठेमध्ये अवघ्या तीनशे चौरस फुटांच्या जागेमध्ये सुरू झालेल्या व्यवसायाने मोठी झेप घेतली आहे. शिरवळ येथील खंडाळा एमआयडीसीमध्ये दोन एकर जागेवर उद्योगाचा विस्तार करताना आगामी पाच वर्षांत ५० कोटी रुपये उलाढालीचे उद्दिष्ट कंपनीने नजरेसमोर ठेवले आहे.

संरक्षण साधनांचे उत्पादन आणि या साधनांसाठीच्या सुटय़ा भागांची निर्मिती क्षेत्रामध्ये अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि. ही संस्था कार्यरत आहे. अनंत इंडस्ट्रीज या नावाने सुरू  झालेल्या या छोटेखानी व्यवसायाने अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि.पर्यंतचा विस्तारित  पल्ला गाठला आहे. लष्कराच्या पुण्यातील आस्थापनांसाठी स्प्रिंगचे उत्पादन करण्यापासून त्याची सुरुवात झाली. आता या उद्योगाने भारतीय लष्कराकरिता पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत  बनावटीच्या लष्करी वाहनांकरिता गुंतागुंतीच्या यंत्रणांच्या विकसनाची सेवा बजावली आहे.  उत्तम अभियांत्रिकी कौशल्य, तंत्रज्ञान आणि उच्चतम अनुभवसंपन्न मनुष्यबळ या त्रिसूत्रीच्या आधारावर कंपनीची वाटचाल सुरू आहे.

पुण्यामध्येच जन्म झालेल्या चेतन धारिया यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून  (सीओईपी) मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली. भोसरी ये थील सेन्च्युरी एन्का लिमिटेड या कंपनीमध्ये ‘कॅम्पस प्लेसमेंट’मधून मेंटेनन्स इंजिनीअर  म्हणून त्यांची निवड झाली होती. पण दोन महिन्यांतच नोकरीचा राजीनामा दिला. त्याच वेळी खडकी येथे ‘डिफेन्स-एक्सपो १९८८’ हे संरक्षण प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर संरक्षणविषयक सुटे भाग उत्पादित करण्याचा उद्योग सुरू करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. स्प्रिंग उत्पादनासाठी अनंत इंडस्ट्रीज या नावाने केवळ दोन कामगारांसह एक छोटेसे युनिट त्यांनी नारायण पेठेमध्ये तीनशे चौरस फूट एवढय़ा लहानशा जागेत स्थापन केले.

भारतीय लष्कराप्रति पूर्ण समर्पणासह, उद्योजकता कौशल्ये आणि नावीन्यपूर्ण प्रतिभा वा परून भारतीय सैन्य दलासाठी स्वदेशीकरणाच्या माध्यमातून अनंत इंडस्ट्रीजने साडेतीन  हजारांहून अधिक प्रकारचे यांत्रिकी भाग पुरवले आहेत. ज्यामध्ये ‘टी ९०’ आणि ‘टी ७२’  रणगाडे, ‘बीएमपी-१’ आणि ‘बीएमपी-२’ या पायदळाच्या लढाऊ वाहनांच्या निर्मितीसाठी  लागणाऱ्या इंजिनासह सुटय़ा भागांचा समावेश आहे. या आयात पर्यायीकरणातून गेल्या तीन  दशकांमध्ये देशाचे मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन वाचविले गेले आहे. अनंत इंडस्ट्रीजचे  एप्रिलमध्ये अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि.मध्ये रूपांतर झाले असून चेतन धारिया या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

‘मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्य़ूमध्ये भारतीय  नौदलासाठी माझी निवड झाली होती. त्याच्या प्रशिक्षणासाठी केरळला जावे लागणार होते.  मला पुणे सोडायचे नसल्याने मी ती संधी सोडली. शिक्षण घेत असताना मी अल्फा लाव्हलमध्ये (त्या वेळची व्हल्कन लाव्हल) काम केले होते. तेथे मला मेंटेनन्सचे म्हणजे  विक्रीपश्चात सेवा क्षेत्रात काम मिळाले. ज्यांना कॉम्प्रेसर विक्री केली आहे तेथे बिघाड  झाल्यानंतर दुरुस्ती करण्याचे काम होते. जे देशभरात कोठेही असायचे. मी फिरतीचे काम  नाकारून सेन्च्युरी एन्कामध्ये नोकरी स्वीकारली. कंपनीचे लोक येऊन मला दुरुस्तीसाठी  घेऊन जायचे. या कामातही मी रुळू शकलो नाही. एके दिवशी माझी चूक नसतानाही  यंत्रातील दुरुस्ती नीट न झाल्याबद्दल माझ्यावर राग काढला गेला. त्यामुळे दोन महिन्यांतच  ही नोकरीही सोडली,’ चेतन यांनी त्यांची हकिगत सांगितली.

खडकी येथे संरक्षण प्रदर्शन भरले होते. त्या आठवणीविषयी सांगताना चेतन म्हणाले,   ‘संरक्षण दलाविषयी मला लहानपणापासून आकर्षण होते. त्यामुळे बहिणीची दुचाकी-   लुनावरून खडकी येथे हे प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो. त्या काळी लष्कराच्या  वाहनांसाठी सुटय़ा भागांची निर्मिती करणारे छोटे उद्योग फारसे नव्हते. त्या प्रदर्शनात  वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्रिंग पाहण्यास मिळाल्या. ते पाहून आपण या व्यवसायामध्ये पदार्पण करावे अशी इच्छा निर्माण झाली.’

संरक्षण दलाच्या सेवेमध्ये दाखल होता आले नसले तरी आता उद्योगाच्या माध्यमातून  संरक्षण दलाशी नाळ जोडली गेली याचा आनंद होत आहे, अशा शब्दांत चेतन धारिया यांनी आपला प्रवास उलगडला.

पुढच्या वाटचालीबद्दल ते म्हणाले, ‘मेहेंदळे गॅरेजजवळ चांदककर यांची भालचंद्र  इंडस्ट्रीज ही कंपनी पाहण्यासाठी मी गेलो होतो. तासभर पाहणी केल्यानंतर आपणही स्प्रिंग  बनवू शकतो हा विश्वास आला. नारायण पेठेतील मुंजाबाचा बोळ येथील छोटय़ा जागेमध्ये  उद्योग सुरू करण्यासाठी आई आणि मोठय़ा भावाने प्रोत्साहन दिले. अनंत अपार्टमेंट या आमच्या सोसायटीतील पाण्याचा पंप बिघडला होता. तो पंप उघडला तर स्प्रिंग बिघडल्याने  पाणी जात नसल्याचे ध्यानात आले. नट, बोल्ट किंवा वॉशर बाजारात मिळतात. पण स्प्रिंग  मिळत नाही. ती बनवून घ्यावी लागते हा धडा मला एका प्लम्बरने दिला. त्याने शेलारमामा  यांच्याशी ओळख करून दिली. त्यांना भागीदार म्हणून घेत स्प्रिंग बनविण्याचा उद्योग सुरू  केला.’

संरक्षण प्रदर्शनामध्ये स्पॉट रजिस्ट्रेशन करण्यासाठी कंपनी हवी होती. कंपनी तर अस्तित्वातच नव्हती. रायगडमधील नाते या गावी अनंत महाराज यांची समाधी आहे. अनंत महाराज यांची धारिया घराण्यावर कृपा आहे. त्यामुळे कंपनीचे नाव अनंत इंडस्ट्रीज ठेवले. कंपनी नंतर स्थापन झाली असली तरी व्हिजिटिंग कार्ड्स आधी छापून घेतली. भांडुप येथून १५ हजार रुपयांची दोन मशीन आणि ४० हजार रुपयांचे सेकंड हँड टेस्टिंग मशीन घेऊन आलो. स्प्रिंग व्यवसाय असा उभा राहिला.

दर पाच वर्षांनी व्यवसायामध्ये बदल करत गेलो. मग अनंत इंडस्ट्रीज नावाने व्यवसाय कोथरूड येथे स्थलांतरित झाला. मशीन कम्पोनंट, कास्टिंग, फोर्जिग बनविण्यास सुरुवात  केली. चेतन सांगतात, ‘या नव्या क्षेत्रात आम्ही उडी घेतली. अर्थात कास्टिंग आणि  फोर्जिग स्वत:ची कंपनी नाही. त्यामुळे ही सेवा बाहेरून घेतो आणि त्याच्यावर मशिनिंग  आणि फिनिशिंग करून संरक्षण दलाला पुरवितो. पाच वर्षांनंतर आम्ही मेकॅनिकल  असेम्ब्लिंग करायला लागलो. हवेच्या दाबावर चालणारे न्यूमॅटिक व्हॉल्व्ह, वंगणावर  चालणारी हायड्रॉलिक उत्पादने करायला लागलो. अर्धा भाग मेकॅनिकल आणि अर्धा भाग इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिकल अशी दुहेरी तंत्रज्ञानावर आधारित व्हॉल्व्ह उत्पादने  करण्यास सुरुवात केली.’

कंपनीचे आता कोथरूड येथे संगम प्रेसजवळ कार्यालय आहे. शिरवळ येथील दोन एकर  जागेवर कंपनीचा विस्तार करण्यात येत आहे. तेथील बांधकाम पूर्ण झाले असून  जानेवारीमध्ये तेथे स्थलांतर करण्याचा मानस आहे.

चेतन यांचा मुलगा रोहन या व्यवसायामध्ये आला असून तो उत्पादनांच्या निर्यात विभागाचे काम पाहतो. रशियन तंत्रज्ञानाने बनविलेले रणगाडे जगातील ४० देश वापरतात. त्यामुळे त्याच्या सुटय़ा भागांची जगभरात मागणी असते. सध्या सात-आठ देशांना कंपनीकडून निर्यात केली जात आहे. आता व्यवसायाची उलाढाल २२.५ कोटी रुपयांची असून आगामी कालखंडात ५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

चेतन धारिया

अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि.

’ व्यवसाय : संरक्षण दलाच्या वाहनांसाठी सुटे भाग निर्मिती

’ कार्यान्वयन : १९८८ साली

’ सध्याची वार्षिक उलाढाल : २२.५ कोटी रु.

’ नियोजित विस्तार : शिरवळ येथील दोन एकर  जागेवर बांधकाम पूर्णत्वाकडे

’ रोजगार निर्मिती : ३५ अभियंत्यांसह एकूण ७० कामगार

ल्ल लेखक ‘लोकसत्ता’चे नाशिक जिल्हा प्रतिनिधी

vkulkarni470@gmail.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 1:31 am

Web Title: article about entrepreneur marathi entrepreneurs zws 70
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : ‘बाधा’मुक्त वृद्धीप्रवण गुंतवणूक
2 बाजाराचा तंत्र कल : बाजारालाही ‘आयपीएल’ची रंजकता!
3 सप्ताह भागविक्रींचा
Just Now!
X