प्रवीण देशपांडे

विलंब शुल्क, व्याजाचा भुर्दंड आणि प्रसंगी कारावासारख्या शिक्षेपासून वाचायचे झाल्यास प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी निर्धारीत करण्यात आलेली ३१ डिसेंबर २०२० ची मुदत करदात्यांनी चुकवू नये हेच उपयुक्त..

आर्थिक वर्ष २०१९-२० साठी वैयक्तिक, हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) आणि इतर करदात्यांसाठी (ज्यांना लेखापरीक्षणाच्या तरतुदी लागू होत नाहीत) विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० आहे. अशांसाठी विवरणपत्र भरण्याची तारीख ३१ जुलै २०२० ही होती. परंतु टाळेबंदीमुळे ही मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. हे विवरणपत्र या मुदतीत दाखल न केल्यास काय परिणाम होतात याची माहिती या लेखाच्या माध्यमातून घेऊया.

* विलंब शुल्क :

विवरणपत्र वरील मुदतीत दाखल न केल्यास करदात्याला विवरणपत्र भरण्यापूर्वी विलंब शुल्क भरावे लागेल. करदात्याने १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या काळात विवरणपत्र भरल्यास त्याला १०,००० रुपये (उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास) आणि १,००० रुपये (उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास) इतके विलंब शुल्क भरावे लागेल.

ही तरतूद लागू झाल्यानंतर यापूर्वी असलेली दंडाची तरतूद रद्द करण्यात आली. हा दंड आकारण्यापूर्वी करदात्याला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जात होती. जर विलंबाचे कारण करदात्याच्या नियंत्रणात नसले (जसे, करदाता आजारी असेल, वगैरे) तर दंड आकारला जात नव्हता. परंतु मागील दोन वर्षांपासून विलंबाचे कारण कोणतेही असले तरी हे शुल्क भरावे लागणार आहे.

* कलम २३४ अनुसार व्याजाचा भुर्दंड :

ज्या करदात्यांचा देय कर १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना ३१ डिसेंबरपूर्वी विवरणपत्र दाखल न केल्यास देय करावर दरमहा एक टक्का इतके व्याज भरावे लागेल. ज्या करदात्यांचा देय कर एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना कर भरण्याची मुदत ३१ जुलै २०२० ही देण्यात आलेली होती. त्यामुळे त्यांनी कर या मुदतीनंतर भरल्यास ऑगस्ट २०२० पासून देय करावर दरमहा १ टक्का या दराने व्याज भरावे लागेल.

* तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्डकरता येणार नाही :

विवरणपत्र मुदतीत दाखल न केल्यास भांडवली तोटा आणि धंदा-व्यवसायातील तोटा पुढील आठ वर्षांसाठी आणि सट्टा-व्यापारातील तोटा पुढील चार वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येणार नाही. या वर्षांचे विवरणपत्र मुदतीत दाखल केले नसेल आणि मागील वर्षांचे विवरणपत्र मुदतीत दाखल केले असेल तर मागील वर्षांचा तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो. ‘घरभाडे उत्पन्न’ या स्रोतातील तोटा विवरणपत्र विलंबाने दाखल केले तरी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो. विवरणपत्र मुदतीनंतर दाखल केले तरी एका उत्पन्नाच्या स्रोतातील तोटा दुसऱ्या स्रोतातील उत्पन्नातून वजा करता येतो.

परतावा मिळण्यास विलंब आणि कमी व्याज :

विवरणपत्र उशिरा भरले तर कर परतावा (रिफंड) सुद्धा उशिरा मिळेल. करदात्याला परताव्यावर व्याज मिळते. करदात्याने विवरणपत्र मुदतीत दाखल केल्यास त्याला त्याच्या कर परताव्याच्या रकमेवर कर निर्धारण वर्षांच्या सुरुवातीपासून म्हणजे १ एप्रिलपासून ते परतावा मिळण्याच्या तारखेपर्यंत व्याज मिळते. विवरणपत्र मुदतीनंतर दाखल केल्यास विवरणपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून ते परतावा मिळण्याच्या तारखेपर्यंत व्याज मिळते.

कारावासाची तरतूद :

विवरणपत्र करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर दाखल केल्यास ‘२७६ सीसी’ या कलमानुसार कारावासाचीदेखील तरतूद प्राप्तिकर कायद्यात आहे.  करदाता या मुदतीत विवरणपत्र दाखल करू शकला नाही तर तो विलंब शुल्क भरून ३१ मार्च २०२१ पूर्वी विवरणपत्र दाखल करू शकतो. त्यानंतर मात्र त्याला विवरणपत्र भरता येत नाही. करदात्याला विवरणपत्र दाखल केल्यानंतर काही चुका आढळून आल्यास सुधारित विवरणपत्र दाखल करता येते. २०१९-२० या वर्षीचे सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ ला संपते. करदात्याने उशिरा विवरणपत्र दाखल केल्यामुळे सुधारित विवरणपत्र दाखल करण्यास कमी वेळ मिळतो.

करोनाचा न संपलेला धोका आणि विवरणपत्राच्या फॉर्ममध्ये झालेले बदल यामुळे कर सल्लागार, सनदी लेखापाल वगैरेंच्या संघटनांनी ही मुदत वाढविण्याची विनंती अर्थमंत्र्यांना केली आहे. ही मुदत वाढो अथवा न वाढो, या मुदतवाढीची वाट न बघता विवरणपत्र या मुदतीपूर्वी दाखल करणे योग्यच आहे.

आणखी मुदतवाढीची मागणी..

करोनाचा न संपलेला धोका आणि विवरणपत्राच्या फॉर्ममध्ये झालेले ताजे बदल हे क्लिष्टतेत भर घालणारे आहेत. यामुळे कर सल्लागार, सनदी लेखापाल वगैरेंच्या संघटनांनी ही मुदत वाढविण्याची विनंती अर्थमंत्र्यांना केली आहे. ही मुदत वाढो अथवा न वाढो, या मुदतवाढीची वाट न बघता विवरणपत्र या मुदतीपूर्वी दाखल करणे योग्यच आहे.

लेखक सनदी लेखाकार आणि करविषयक सल्लागार

pravin3966@rediffmail.com