01 June 2020

News Flash

आता शाश्वत केवळ सोनेच

करोना साथीचा प्रादुर्भाव जगभर वाढत असून त्याची लोकांना आता भीती वाटू लागली आहे.

अमित मोडक

गेल्या आठवडय़ात जागतिक पातळीवर सोने प्रति औंसाला १,७५० डॉलर पातळीवर जाऊ न पुन्हा १,७४० डॉलर पातळीवर आले. तसेच डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे विनिमय मूल्य गेल्या तीन दिवसात ६० पैशांनी घसरले असून रुपया ७५.२० वरून ७५.८० पातळीवर गेला.

या दोन्हींचा परिणाम म्हणून एमसीएक्सवर सोने प्रति १० ग्रॅममागे ४७,३०० ते ४७,४०० रुपयांवर गेले. या पातळीवर सोने हे घेण्यासारखे आहे का नाही, असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकतो.

सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास भारतीयांसाठी प्रत्येक भाव पातळीवर सोने घेण्यासारखेच आहे. करोना साथीमुळे जागतिक पातळीवरील आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी वाईट होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सोने भावात तेजी येणार आहे.

अनिश्चतता कायम

नुकताच जाहीर झालेला अमेरिकेतील बेरोजगारीचा दर, युरोप व युरोपियन युनियनमधील देशांचा औद्योगिक उत्पादन वाढीचा दर (आयआयपी), ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, तैवान व जपान येथील औद्योगिक उत्पादन निर्देशांक तसेच निर्यातदर निराशाजनक आहे.

जगभर टाळेबंदी असल्याने ही आकडेवारी सुधारण्याची शक्यता नाही. तसेच अशी स्थिती किती दिवस राहणार याबाबत कोणीच निश्चितपणे सांगू शकत नाही.

परिस्थिती विपरीत

करोना साथीचा प्रादुर्भाव जगभर वाढत असून त्याची लोकांना आता भीती वाटू लागली आहे. हा प्रादुर्भाव कमी न झाल्यास औद्योगिक उत्पादन अजून काही महिने बंद राहील. ते पुन्हा सुरू झाल्यावर त्याला मागणी येण्यास काही वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. लोकांच्या मनात अर्थविषयक बाबींबाबत साशंकता निर्माण होऊ  लागली आहे.

परिणामी लोकांचा आर्थिक जगतावरील, अर्थ व्यवस्थेवरील विश्वास उडायला लागल्यावर सोने हा एकमेव शाश्वत गुंतवणूक पर्याय वाटायला लागतो आणि तो असतोही. सोन्याएवढी गुंतवणूक शाश्वतता कशातच नाही हे वारंवार सिद्ध होतंय. शेअर बाजार २० ते २५ टक्के घटले असताना उलट सोने मात्र त्याच प्रमाणात वाढले आहे.

पुन्हा कल तेजीचा

शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी रोकड गरज भागवण्यासाठी काही दिवसांपूर्वी सोने विक्रीवर काहीसा दबाव आला होता. त्यामुळे सोन्याच्या भावात काही काळासाठी घट झाली होती. मात्र शेअर बाजारासाठी लागणारी रोकड उपलब्धता पूर्ण करण्यासाठी उपयुक्त पडले ते सोनेच. रोकड किंवा तरलतेसाठी सोन्यावर विक्रीचा असणारा दबाव संपल्यावर सोन्यात पुन्हा तेजी दिसून आली. गेल्या २० ते २५ दिवसात सोन्याचे दर वाढत आहेत.

सोनेच उपयोगी

एकूण परिस्थिती बघता सोन्याबाबत विचार करायचा झाल्यास सोने खूप शाश्वत गुंतवणूक प्रकार आहे. वर्षभराचा विचार केल्यास जागतिक पातळीवर डॉलरमध्ये सोन्याने ३० टक्के व भारतात रुपयांमध्ये ५० टक्के परतावा दिला आहे.

भारतात सोने प्रति १० ग्रॅम ३२ हजार रुपयांपासून ४७ हजार रुपयांपर्यंत वाढले आहे. अन्य गुंतवणूक पर्यायांचे परतावे पाहिल्यास सोनेच शाश्वत गुंतवणूक पर्याय वाटते.

(लेखक पु. ना. गाडगीळ आणि सन्स संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी असून वायदा बाजार तज्ज्ञ आहेत.)

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2020 5:44 am

Web Title: article about investment in gold zws 70
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : उच्चतम मानके, बहुविध प्रस्तुती
2 बंदा रुपया : शेतकऱ्यांचा सोबती..
3 नावात काय ? : ओपन मार्केट ऑपरेशन्स (ओएमओ)
Just Now!
X