29 October 2020

News Flash

अर्थ वल्लभ : उदयोन्मुख मल्टिकॅप

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

वसंत माधव कुळकर्णी

एप्रिल ते जून या कालावधीतील कामगिरीनुसार ‘लोकसत्ता-कर्ते म्युच्युअल फंडा’ची शिफारस मल्टिकॅप गटात पीजीआयएम इंडिया इक्विटी डायव्हर्सिफाइड या फंडाचा पहिल्यांदा समावेश झाला. फंडाची शिफारस तीन महिन्यांतील कामगिरीवर असली तरी, ३३ टक्के गुण एक वर्षांच्या कामगिरीला, ४२ टक्के गुण तीन वर्षांच्या आणि २५ टक्के गुण पाच वर्षांच्या कामगिरीला दिले जातात.

‘लोकसत्ता-कर्ते म्युच्युअल फंड’ यादीत समावेशापूर्वी फंडाच्या कामगिरीवर बारकाईने नजर ठेवण्याचा प्रघात आहे. सहा तिमाहींच्या कामगिरीच्या निरीक्षणानंतर एप्रिल ते जून तिमाहीतील कामगिरीनुसार या फंडाचा पहिल्यांदा कर्ते म्युच्युअल फंडात समावेश झाला. पीजीआयएम इंडिया इक्विटी डायव्हर्सिफाइड फंडाने जुलै ते सप्टेंबर तिमाहीत टॉप क्वार्टाईलमध्ये स्थान मिळविले आहे. हा फंड आधीच्या एप्रिल ते जून या तिमाहीत अपर मिडल क्वार्टाईलमध्ये स्थान राखून होता. त्या आधीच्या तिमाहीत मिडल क्वार्टाईलमध्ये आणि मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत फंड लोअर मिडल क्वार्टाईलमध्ये होता. मागील वर्षभरात फंडाने लोअर मिडल क्वार्टाईल ते टॉप क्वार्टाईल अशी प्रगती केली आहे.

अनिरुद्ध नाहा पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक आहेत. पीजीआयएम इंडिया डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड आणि पीजीआयएम इंडिया मिडकॅप फंडाचे ते निधी व्यवस्थापक आहेत. त्यांना समभाग आणि निशिचत उत्पन्न बाजारपेठांचा १८ वर्षांचा अनुभव आहे. पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडात दाखल होण्यापूर्वी ते आयडीएफसी म्युच्युअल फंड, डीएसपी ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स तसेच अन्य फंडांचा निधी व्यवस्थापित करण्याचा त्यांना अनुभव आहे.

या योजनेत मुख्यत्वे ‘एसआयपी’मार्फत गुंतवणूक करण्याची शिफारस आहे. आपल्याकडे एकरकमी गुंतवणूक उपलब्ध असेल तर ही रक्कम लिक्विड फंडात गुंतवूनवर्षभरात ‘एसटीपी’च्या द्वारे पीजीआयएम इंडिया इक्विटी डायव्हर्सिफाइड फंडात गुंतवणूक करणे योग्य असेल. मागील पाच वर्षांच्या कालावधीत फंडाने बरा परतावा दिला आहे. मल्टिकॅप फंड गटातील जोखीम पाहता, हा उदयोन्मुख मल्टिकॅप फंड दीर्घ मुदतीच्या ‘एसआयपी’साठी गुंतवणूकदारांना चांगला पर्याय ठरेल. ‘रिसेन्सी बायस’ ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. एखाद्या व्यक्तीस काही काळापूर्वी घडलेल्या गोष्टीपासून धडा न घेता अलीकडच्या काळातील घडलेल्या घटनांच्या आधारे वर्तमानातील निर्णय घेतले जाण्याचा कल असतो. ‘रिसेन्सी बायस’ निर्णय क्षमतेतील त्रुटीचा एक प्रकार आहे, ज्यामुळे बरेच गुंतवणूकदारांचे निर्णय चुकतात. अलीकडे एखाद्या फंडाची कामगिरी चांगली असेल तर कामगिरीच्या आधारे फंडात गुंतवणुकीचा निर्णय घेणे टाळतो. म्युच्युअल फंडाच्या बाबतीत अलीकडचा कल विचारात घेऊन त्यांच्या दीर्घकालीन कामगिरीचा विचार न करता त्यांच्या अलीकडील कामगिरीच्या आधारे म्युच्युअल फंडामध्ये मोठय़ा प्रमाणात पैसे गुंतविताना दिसतात. गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की, अलीकडील चांगली कामगिरी ही भविष्यातही अशाच कामगिरीचे संकेत देत आहे. जेव्हा गुंतवणूकदार गुंतवणुकीचा निर्णय घेतात तेव्हा पूर्वग्रहापेक्षा अलीकडची कामगिरी भुरळ पाडते. अनेकदा परतावा न देणाऱ्या जुन्या फंडाची कास सोडायला गुंतवणूकदार तयार नसतात. कारण या फंडांनी भूतकाळात केव्हा तरी त्यांना चांगला परतावा दिलेला असतो. पीजीआयएम इंडिया फंड घराण्याच्या तिसऱ्या फंडाची ही शिफारस असून आधी शिफारस केलेल्या दोन्ही फंडांची कामगिरी सकारात्मक आहे.

‘सेबी’च्या नवीन नियमामुळे मल्टिकॅप फंडांना नेहमीच स्मॉलकॅप आणि मिडकॅपमधील गुंतवणूक प्रत्येकी २५ टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाहीत. यामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील एकत्रित गुंतवणूक ५० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवावी लागल्यामुळे मल्टिकॅप फंड सध्याच्या मध्यम जोखमीच्या वर्गातून उच्च-जोखीम वर्गात मोडतील. नवीन मानदंडांतर्गत, हा फंड गट लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप प्रकारापेक्षा अधिक जोखमीचा ठरेल. या फंड गटासाठी ‘एस अ‍ॅण्ड पी बीएसई २०० टीआरआय निर्देशांक’ विचारात घेऊन ‘रिस्क रिवॉर्ड स्कॅटरप्लॉट’ सोबत दिला आहे. या निर्देशांकात स्मॉलकॅप समभागांचा वाटा ५.७ टक्के तर मिडकॅपचा वाटा १६.२ टक्के आहे.

आतापर्यंत शिफारसप्राप्त फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टिकॅप फंडाची भूमिका परताव्यापेक्षा स्थैर्य राखण्याची होती. पराग पारीख, यूटीआय इक्विटी आणि कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सिफाइड हे फंड कर्त्यांच्या यादीत अग्रभागी होते. या फंडाच्या जोडीला पीजीआयएम इंडिया इक्विटी डायव्हर्सिफाइड या नवीन फंडाची भर पडली आहे.

अनिरुद्ध नाहा

वरिष्ठ निधी व्यवस्थापक, पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 12:04 am

Web Title: article about mutual fund investment information in marathi zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : अचूक वाटचाल
2 क.. कमॉडिटीचा : कृषी सुधारणा यशस्वी होण्यासाठी गोदाम नियंत्रण गरजेचे!
3 बंदा रुपया : मालेगावला साखरेचा गोडवा!
Just Now!
X