वसंत माधव कुळकर्णी shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती  देणारे साप्ताहिक सदर

सध्याचे स्वस्त मूल्यांकन सापळ्यात अडकवणारे आमिष ठरण्याची शक्यता अधिक आहे. ही गुंतवणुकीची अखेरची संधी नक्कीच नव्हे. वर्षभरात पावसाळ्यात लिंबं सर्वात स्वस्त असतात. लिंबं स्वस्त झाली म्हणून घरातील गृहिणी लोणचे बनविण्यासाठी पावसाळ्यातील स्वस्त लिंबांचा नव्हे तर नोव्हेंबर ते जानेवारी या मोसमातील लिंबेच वापरते. तद्वत स्वस्त मूल्यांकन हे वाच्यार्थाने न घेता लक्षार्थाने घ्यायची गोष्ट आहे.

‘‘भांडवली बाजारातील तेजीचा जन्म निराशावादावर होतो, तर तेजीचा विस्तार संभ्रमात होतो तसेच आशावादावर तेजीचा अंत होतो. बाजारात सर्वाधिक निराशा असताना ती खरेदीची सर्वोत्तम वेळ असते. सर्वाधिक आशादायक वातावरण असतांनाची वेळ विक्रीसाठी सर्वात चांगली असते.’’सर जॉन टेम्पलटन

गुंतवणूकदारांचा ई-टपाल कप्पा म्युच्युअल फंडांकडून आलेल्या टपालांनी भरून गेला असेल. वरील सुभाषितवजा वाक्यांची पखरण आलेले ई-टपाल फंड घराण्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा वलयांकित मुख्य गुंतवणूक अधिकाऱ्यांकडून गुंतवणूकदारांकडे नक्कीच पोहोचले असेल. आपल्या गुंतवणूकदारांना दिलासा देताना नवीन गुंतवणुकीसाठी समभाग गुंतवणूक करणारे फंड किती आकर्षक मूल्यांकानावर उपलब्ध असून शतकात अतिशय कमी वेळा अशी संधी उपलब्ध होते आणि या संधीचा का लाभ घ्यायला हवा या सारख्या मजकूरांनी गुंतवणूकदारांना उच्च परतावा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भांडवली बाजारांनी १२ वर्षांनी ‘सब-प्राइम’नंतरची सर्वात मोठी आपटी मार्च महिन्यांत अनुभवल्याने सर्वच गुंतवणूकदारांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत २५ ते ३५ टक्के घट झाली आहे. हवालदिल गुंतवणूकदारांना दिलासा देणे गरजेचे असल्याने असे उपाय करणे हा व्यावसायिक गरजेचा भाग आहे इतकेच.

गुंतवणूकदारांनी अशा संबोधनपर टपालांना प्रतिसाद देण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. समभाग मूल्यांकन हे सरासरी निर्देशांकांच्या मूल्यांकनापेक्षा खूप कमी आहे हे सत्य असले तरी गुंतवणूक करण्यापूर्वी गृहपाठ चोख करणे गरजेचे आहे. टाळेबंदी संपल्यावर अर्थव्यवस्थेला लगेचच गती मिळेल असे नाही. टाळेबंदी काळात चाचणी सामग्री संचाच्या उत्पादनात वाढ, त्यांचे वितरण, चाचण्यांचा वेग वाढविणे, औषधे, व्हेंटिलेटरचा पुरवठा वाढविणे आणि वैद्य्कीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी यासारख्या गोष्टींवर सरकारचे लक्ष केंद्रित झाल्याने उत्पादनक्षम कामकाज होऊ शकलेले नाही. अकृषी मजुरांनी किमान ३० दिवसांचा रोजगार गमावला आहे. रोजगार गमावलेले हताश स्थलांतरित कामगार आपल्या खेडय़ाकडे जाण्यासाठी बसस्थानकात गर्दी करत होते. कित्येक शंभरेक किलोमीटर पायी त्यांच्या खेडय़ात जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त भविष्यात वाढून ठेवलेल्या संकटाची तीव्रता दर्शवितो, जे लोक काही कारणांनी आपली रोजगाराचे ठिकाण सोडू शकलेले नाहीत त्यांच्यात तीव्र अस्वस्थता आहे. कृषी उत्पादनासहित उद्योगांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकीची नव्याने आखणी करणे गरजेचे आहे. उदाहरण द्यायचे तर औषध निर्मिती अत्यावश्यक सेवा असली तरी काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्या त्यावर लावायची लेबले छापणारे छापखाने बंद आहेत. परिणामी पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

वर उल्लेख केलेली ई-टपाल आले तरी कितीही आकर्षक मूल्यांकनाचा बिगुल वाजवीत असली तरी हा हे मूल्यांकन सापळ्यात अडकवणारे आमिष ठरण्याची शक्यता अधिक आहे. गुंतवणूकदारांकडे पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीत गरज नसलेला पैसा समभाग गुंतवणुकीकडे वळविणे योग्य ठरेल. ही गुंतवणुकीची अखेरची संधी नक्कीच नव्हे. पुढील तीन वर्षे कालावधीत बाजारात गुंतवणुकीची संधी मिळणारच नाही असे नव्हे. सध्याची अस्थिरता जी दिवसेंदिवस वाढत्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे त्या अस्थिरतेवर मात करण्याचा प्रयत्न योग्य मालमत्ता विभाजनातून करता येईल. अल्ट्रा शॉर्ट किंवा मनी मार्केट फडांसारख्या रोकडसुलभ गुंतवणूक साधनांत गुंतवणूक करणारे फंडात किमान ५० टक्के गुंतवणूक असायला हवी. वर्षभरात पावसाळ्यात लिंबं सर्वात स्वस्त असतात. लिंबं स्वस्त झाली म्हणून घरातील गृहिणी साठवणीचे लोणचे किंवा लिंबाचे तत्सम पदार्थ पावसाळ्यातील स्वस्त लिंबांपासून बनवत नाही. लिंबाचे लोणचे वर्षभर टिकवायचे असेल तर नोव्हेंबर ते जानेवारी या मोसमातील लिंबे वापरतात. स्वस्त मूल्यांकन हे वाच्यार्थाने न घेता लक्षार्थाने घ्यायचे आहे. वाचकांनी त्यांच्या उपलब्ध रक्कमेचे कालावधीनुसार विभाजन करून फंडांची निवड करावी. गुंतवणूकदारांच्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठी कालबद्ध आदर्श गुंतवणूक सोबतच्या कोष्टकात दिली आहे. वाचक या आदर्श पोर्टफोलिओचा गुंतवणुकीसाठी वापर करू शकतात.

जगभरात ‘डू इट युअरसेल्फ’ (डीआयवाय) संप्रदाय उदयास आला आहे. या संप्रदायाचे अनुयायी अर्धा कच्चा माल, अर्धे कौशल्य वापरत एकाद्या वस्तुची पुनर्बाधणी करतात. गुंतवणुकीच्या क्षेत्रातसुद्धा या संप्रदायाचे विपुल अनुयायी आढळतात. वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापनात ‘डीआयवाय’ संज्ञा प्रचलित झाली आहे. समभाग किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतांना एखाद्या व्यावसायिक सल्लागाराची मदत न घेता ‘रोबो अ‍ॅडव्हायझरी’ किंवा मायाजालावर उपलब्ध माहितीचा आधार घेत आपला पोर्टफोलिओ तयार करतात. आजचा लेख हा ‘डीआयवाय’ सांप्रदायिकांना नक्कीच मदत करेल.