|| दिलीप राजपूत

इच्छापत्र हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपले इच्छापत्र करणे गरजेचे आहे. हे दस्तऐवज करण्याकरिता आपल्या व्यवसाय, नोकरी यातून निवृत्त होण्याची वाट पाहू नये. संमती प्राप्त करताच इच्छापत्र करावे. तुम्ही ते जितक्या लवकर कराल तेवढे चांगले, कारण असेही होऊ शकते की, तुम्हाला इच्छा असूनही इच्छापत्र करण्याची संधीच प्राप्त होणार नाही. असे झाल्यास तुमच्या संपत्तीचे वाटप वारसाहक्क कायद्याप्रमाणे होते.

इच्छापत्र या दस्तऐवजाची नोंदणी करणे आवश्यक नाही. ही बाब इच्छापत्र करणाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून असते. तसेच वैद्याचे प्रमाणपत्रदेखील आवश्यक नाही; पण ते घेतल्यास त्याचा फायदा नक्कीच होतो. (व्यापक माहिती आधीच्या लेखात नमूद केली आहे) नोंदणी आणि वैद्याचे प्रमाणपत्र ऐच्छिक असले तरी साक्षीदाराच्या सह्य़ा अनिवार्य आहेत. त्यांची स्वाक्षरे दस्तऐवजाला प्रमाणीकृत करतात. तुम्ही जर दस्तऐवज नोंदणी करणार असाल तर साक्षीदाराची उपस्थिती नोंदणी करतेवेळी अनिवार्य असते.

इच्छापत्र करणाऱ्याला त्याची सर्व प्रकारची जंगम व स्थायी मालमत्ता लाभार्थ्यांकरिता लिहून ठेवता येते. लाभार्थी एकाधिक भूमिका पार पाडू शकतो. त्याची नेमणूक निष्पादक म्हणून करता येते. निष्पादक हा मृत्युपत्राचा व्यवस्थापक असतो.

इच्छापत्र मालमत्तेचे हक्क प्रदान करते. म्हणूनच इच्छापत्र करणाऱ्याची जी मालमत्ता देऊ करायची असेल त्याचे मालकी हक्क असणे आवश्यक आहे, जेणेकरून लाभार्थ्यांला स्पष्ट मालमत्ता शीर्षक प्राप्त होऊ शकते. लाभार्थी मालमत्तेचा पूर्ण मालक होतो. जर लाभार्थी अज्ञान असेल तर त्याच्याकरिता पालक नेमू शकतो. मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे इच्छापत्राचे अनेक प्रकार होय. उदाहरणार्थ, होलोग्राफ, इनऑफिशियस, जॉइन्ट व म्युच्युअल इच्छापत्र. इच्छापत्र कोणत्या प्रकारचे करायचे हा निर्णय सर्वस्वी इच्छापत्र करणाऱ्याचा असतो. सर्व प्रकारच्या इच्छापत्राची अंमलबजावणी इच्छापत्र करणाऱ्याच्या पश्चात केली जाते; पण जॉइन्ट इच्छापत्राच्या बाबतीत, सर्व इच्छापत्र करणाऱ्यांच्या मृत्यूनंतरच त्याची अंमलबजावणी होते. इच्छापत्रात नमूद केल्याप्रमाणे मालमत्तेचे वाटप करण्याची पूर्ण जबाबदारी निष्पादकाचीच असते.

सर्वानाच नेहमीच वाटत असते की, आपण आपल्या मालमत्तेकरिता नामांकन केले आहे, मग इच्छापत्राची काय गरज? पण प्रत्येकाने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की नामांकित व्यक्ती ही केवळ त्या संपत्तीचे व्यवस्थापन पाहण्याकरिता असते. त्याला संपत्तीचा स्पष्ट मालमत्ता शीर्षक प्राप्त होऊ शकत नाही; पण नामांकन व लाभार्थी म्हणून नेमणूक जर एकाच व्यक्तीच्या नावे केली असेल तर मात्र त्याला शीर्षक प्राप्त होऊ शकते. म्हणजेच नामांकित व्यक्तीची नेमणूक संपत्तीचे संरक्षण व व्यवस्थापन करण्याकरिताच केली जाते. इच्छापत्र करणाऱ्याला नामांकित व्यक्तीला मालमत्तेचा उपभोग व मालमत्तेचे वितरण करण्याचे अधिकार द्यायचे असतील तर, मालमत्तेचे हस्तांतरण करणे आवश्यक आहे. हस्तांतर, गिफ्ट डीड, किंबहुना मालमत्तेची विक्री या प्रकारे होऊ शकते; पण हे दोन्ही हस्तांतरणांचे प्रकार जीवित असतानाच करता येतात. तुम्हाला जर हस्तांतर मृत्यूपश्चात करायचे असेल तर इच्छापत्र करणे आवश्यक आहे.

नामांकन हे तुमच्या मालमत्तेची इच्छापत्रानुसार अंमलबजावणी होईपर्यंतच्या काळात व्यवस्थापनाची जबाबदारी सुपूर्द करते. जर तुमच्या संपत्तीत एकत्रित मालकी हक्क असेल, तर उत्तरजीवी तुमच्या संपत्तीचे व्यवस्थापन पाहू शकतो. अशा वेळी नामांकनाची आवश्यकता नसते.

(या संदर्भातील आपले प्रश्न पाठविण्यासाठी ई-मेल : willassure@gmail.com)