22 March 2019

News Flash

महसुली सुधारणेचे आवर्तन

यातील ४० टक्के उत्पादने उत्तर अमेरिका, युरोप तसेच आखाती देशात निर्यात करते.

(संग्रहित छायाचित्र)

नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड ही पद्मनाभ मफतलाल समूहाची ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेली कंपनी. सुरुवातीला केवळ रेफ्रिजरन्टचे उत्पादन करणारी ही कंपनी आज जवळपास ६० प्रकारच्या रसायनांचे उत्पादन करते. यातील ४० टक्के उत्पादने उत्तर अमेरिका, युरोप तसेच आखाती देशात निर्यात करते. कंपनीच्या ग्राहकांमध्ये अनेक देशी तसेच परदेशी कंपन्यांचा समावेश असून यात पेट्रोकेमिकल्स, लाइफ सायन्स तसेच क्रॉप प्रोटेक्शन कंपन्यांचा समावेश आहे. एअर कंडिशन तसेच रेफ्रिजरेशनसाठी लागणारी प्रमुख केमिकल उत्पादने कंपनी ‘मॅफ्रोन’ या ब्रॅण्डने विक्री करते. आज रेफ्रिजरेशन उद्योगासाठी ‘मॅफ्रोन’ हा सुप्रसिद्ध आणि महत्त्वाचा ब्रॅण्ड मानला जातो.

नविन फ्लोरिनचे सूरत, दहेज आणि देवास येथे प्रकल्प असून कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने रेफ्रिजरेशन गॅस, इनऑरगॅनिक फ्लोराइड्स, स्पेशालिटी फ्लोराइड्स आणि क्रॅम्स (काँट्रॅक्ट रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग सर्विसेस) अशा चार भागात विभागला आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या नवीन फ्लोरिनचे पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून या कालावधीत कंपनीने २४३.११ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३९.५९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत नक्त नफा १९ टक्क्य़ांनी कमी आहे. मात्र कंपनीने डिसेंबर २०१७ मध्ये ‘क्रॅम्स’साठी ११२ कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला होता त्याचे फळ यंदाच्या आर्थिक वर्षांपासून दिसू लागेल. किंबहुना ‘क्रॅम्स’ विभागामुळे कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीने गेल्या पाच वर्षांत आपली कामगिरीत सातत्य राखून नक्त नफ्यात सरासरी ३१.२३ टक्के वाढ दाखविली आहे, आगामी कालावधीत कंपनी आपल्या प्रगतीचा वेग वाढवेल किंवा किमान असाच कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. सध्या ६७५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर खरेदीसाठी आकर्षक असून मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी जरूर राखून ठेवावा असा आहे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on August 6, 2018 12:56 am

Web Title: article about recovery of revenue