म्युच्युअल फंड योजनांमध्ये साधम्र्य राखण्याच्या दृष्टीने ‘सेबी’ने ८ ऑक्टोबर २०१७ रोजी परिपत्रक काढून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीनुसार वर्गीकरण केले असून, गुंतवणूक, जोखीम आणि नांव (लेबल) यांच्यात समानता आणली आहे. त्यामुळे फंडाच्या गुंतवणूक प्रकारानुसार परताव्याची तुलना करणे गुंतवणूकदारांना सोयीचे झाले आहे.

या दरम्यान फंड घराण्यांना आपल्या विविध योजनांचे विलीनीकरण, गुंतवणूक धोरणात बदल आणि फंडांच्या नावातील बदल हा याच प्रक्रियेचा एक भाग होता. ‘सेबी’च्या परिपत्रकानुसार सर्व फंड योजनांचे वर्गीकरण खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे आहे. (तक्ता पाहावा)

इक्विटी फंडांचे लार्ज कॅप समभागांच्या भांडवली मूल्यांनुसार अनुक्रमे १ ते १०० पर्यंत समभागात गुंतवणूक करणारे फंड या प्रकारात मोडतात. जे फंड समभागांच्या भांडवली मुल्यांनुसार अनुक्रमे १०१ ते २५० पर्यंत समभागात गुंतवणूक करणारे मिड कॅप गटात तर अनुक्रमे २५१ ते ५०० पर्यंत गुंतवणूक करणारे स्मॉल कॅप प्रकारात मोडतात.

रोखे गुंतवणूक योजनांची विभागणी ही गुंतवणूक असलेल्या रोखे प्रकार (सरकारी खाजगी किंवा बँका), रोख्यांची उर्वरित मुदत (अल्प मुदतीचे मध्यम मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे), पत जोखीम (कॉर्पोरेट डेट फंड) या निकषांवर केली आहे. हायब्रीड योजनांचे दोन प्रकार असून गुंतवणुकीत असलेल्या समभागांच्या प्रमाणानुसार त्यांची विभागणी दोन गटात केली आहे. जास्त समभाग गुंतवणूक असलेल्या हायब्रीड फंडांना अ‍ॅग्रेसिव्ह हायब्रीड फंड असे संबोधले आहे.

सर्वाधिक फंड प्रकार रोखे गुंतवणुकीत असून १६ मुख्य पकार आणि ६ उपप्रकारात या योजना विभागल्या आहेत. रोखे योजनांच्या वर्गीकरणामुळे, गुंतवणूक इच्छुकांना रोखे प्रकारानुसार गुंतवणुकीतील जोखमीचा स्तर जाणून घेणे सुलभ झाले आहे. उदाहरणार्थ, मध्यम कालावधी मुदतीच्या आणि विविध प्रकारच्या रोख्यांत गुंतवणूक करणारे फंड डायनॅमिक बाँड फंड प्रकारात मोडतात, तर नियमित व्याजाची आणि मुदतीच्या मुद्दलाची परतफेड संबंधित जोखीम स्वीकारणारे फंड क्रेडिट रिस्क प्रकारात मोडतात. बँकांच्या आणि सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांच्या रोख्यांत गुंतवणूक करणारे फंड बँकिंग अँड पीएसयू डेट फंड प्रकारात मोडतात.

‘सेबी’ने फंडाच्या सूसूत्रीकरणात पुढाकार घेऊन गुंतवणूकदारांना फंड निवड करणे सोपे केले आहे. मल्टि कॅप फंड वगळता एका गटातील फंडांच्या गुंतवणुकीचा परीघ एकसारखाच असल्याने परताव्याच्या तुलनेत फंडाची निवड करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे एका फंड घराण्याच्या लार्ज कॅपची तुलना दुसऱ्या फंड घराण्याच्या लार्ज कॅपशी करणे शक्य असेल. मिड कॅप फंडांना गुंतवणुकीसाठी केवळ १५० समभाग उपलब्ध आहेत. निधी व्यवस्थापकाने आपले कौशल्य वापरून या १५० समभागांतून निवड करणे बंधनकारक झाले आहे. आपल्या जोखिमांकानुसार आणि गुंतवणूक करण्याचा कालावधीनुसार गुंतवणूक इच्छुक ३६ फंड प्रकार आणि ४० फंड घराणी यांतून आपल्या पसंतीचा फंड निवडू शकतील. कारण गुंतवणुकीच्या परिघाची व्याख्या सर्वच फंड प्रकाराबाबत स्पष्ट आहे. जोखीम आणि परतावा यांच्यात सरळ संबंध असल्याने आपापल्या वित्तीय ध्येयांसाठी फंड निवड सोपी झाली आहे. फंडाचे लेबलिंग आणि जोखीम (रिस्कोमिटर) यांची माहिती पुढील लेखात घेऊ.

भालचंद्र जोशी

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि  ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.