02 July 2020

News Flash

बंदा रुपया : परिघापुढचे पाऊल..

लहानपणीच हात मातीनं माखले की त्या बोटांना मातीची लपलेली रूपं जणू खुणावू लागतात.

रतन टाटा यांच्यासमवेत विश्वंभर साळसकर, तर स्टुडिओत स्वामी समर्थाच्या मूर्तीचे काम पाहताना विघ्नहर्ता साळसकर (उजवीकडे) या तरुण कलावंतानीच घडविलेला उत्तर प्रदेशमधील पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा पंचधातूमधील पूर्णाकृती तसेच संपूर्णपणे देशांतर्गत बनावटीचा ६३ फूट असा सर्वाधिक उंचीचा पुतळा.

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

 

विश्वंभर साळसकर – (स्वामी आर्ट्स)

  •  व्यवसाय -शिल्पकला
  •  गुंतवणूकदार : नाही
  • कार्यान्वयन : सन २०१२
  •  मूळ गुंतवणूक  :  साधारण २५ हजार रु.
  •  सध्याची उलाढाल : सुमारे २ कोटी रु.
  •  कर्मचारी संख्या  : १५

लहानपणीच हात मातीनं माखले की त्या बोटांना मातीची लपलेली रूपं जणू खुणावू लागतात. मातीच्या गोळ्यास जिवंत आकार येऊ लागतात. कोकणात गावागावांत काही घरं ‘मूर्तिकारांची घरं’ म्हणून प्रसिद्ध असतात. या घरांमध्ये बारा महिने मूर्ती घडत असतात. पावसाळ्याची चाहूल सुरू झाली, की पडवीच्या कोपऱ्यात रचून ठेवलेल्या शाडू मातीच्या गोणी स्वच्छ सारवलेल्या जमिनीवर मोकळ्या होऊ लागतात. मग ती माती पाणी पोटात रिचविते, आणि आपल्या ‘उद्याच्या रूपा’च्या उत्सुकतेने उतावीळ होऊन त्या बोटांमध्ये खेळण्यासाठी आतुरते. ओल्या मातीचे गोळे आकार घेऊ लागतात. बघता बघता गोणीतल्या मातीतून गणपती साकारू लागतो. काळाबरोबर मूर्ती घडविण्याचे तंत्र बदलत गेले. मूर्तीचे साचे मिळू लागले, तरी आपल्या प्रतिभेचा आविष्कार उत्कटपणे उमटेल अशी, स्वयंप्रतिभेतून घडविलेली एखादी साजिरी मूर्ती त्या हारीतून अलगशी उठूनही दिसते. मग मूर्तिकार त्या मूर्तीमध्ये स्वत:चा जीव ओततो. तिला अशी सजवितो, की ते देखणं रूप न्याहाळताना नास्तिकाचेही भान हरपावे..

रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या देवरूखमधील खालच्या आळीत साळसकरांच्या घराला या प्रतिभेचं लेणं लाभलंय. माती ते मूर्ती या प्रवासातील टप्पे न्याहाळत स्वत:च्या प्रतिभेला आकार देणाऱ्या दुसऱ्या पिढीची बोटं या मातीशी हौसेने खेळू लागली आणि बघता बघता या बोटांना कलेचं वरदान मिळून गेलं. माती जणू त्यांच्या ‘हातचा मळ’ होऊन गेली आणि त्या बोटांनी दिलेल्या आकारांनी मोहरू लागली. वेगवेगळ्या मूर्ती बनविण्याचा तो छंद पुढे अक्षरश: आकाशाला गवसणी घालेल, हे त्या बोटांना तेव्हा उमगलेही नसेल, पण तसे घडले.. साळसकरांच्या घरातील दोघा लहान मुलांनी या कलेचा वारसा सोबत घेऊन वेगळ्या क्षेत्रात उडी घेतली आणि आपल्या कलेला जणू वैश्विक रूप बहाल केले. त्यांची ही कहाणी..

गावाकडे जरुरीपुरतं शिक्षण पूर्ण झालं, की पोटापाण्यासाठी मुंबईची वाट पकडायची, हा शिरस्ता कोकणास अजूनही चुकलेला नाही. विलास साळसकरच्या मुलाचंही तसंच झालं. पंधरा वर्षांपूर्वी, २००५ मध्ये त्यांच्या मोठय़ा मुलाला- विश्वंभरला- मुंबईत बँकेत नोकरी मिळाली, आणि मुलगा ‘लायनीला लागला’ म्हणून बाप सुखावला. पाठोपाठ काही दिवसांनी विश्वंभरने धाकटय़ा भावाला- विघ्नहर्ताला- मुंबईत आणले. त्याच्या बोटातील कलेला इथे न्याय मिळेल हे त्याला ठाऊक होते. विघ्नहर्ताने रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. फाइन आर्टच्या परीक्षेत त्याने गुणवत्ता सिद्ध केली. नंतर जे. जे. स्कूललाही प्रवेश घेतला आणि विघ्नहर्ता साळसकर नावाच्या कलावंताचा मूर्तिकार ते शिल्पकार असा प्रवास सुरू झाला. त्याच्या बोटातली जादू ओळखून पुढे विश्वंभरच्या मनात वेगळेच विचार आकार घेऊ लागले. नोकरी सोडून दोघांनी मिळून स्वत:चा स्टुडियो सुरू करायचा विचार त्याने वडिलांकडे बोलून दाखविला. कोकणातल्या कोणाही बापासारखं विलास साळसकरांचं ‘बापाचं मन’ही धास्तावलं. सुरक्षित नोकरी सोडून अनिश्चित धंद्यात उडी मारणं खरं नाही, असं त्यांनी वारंवार मुलाला समजावलं. पण विश्वंभर आणि विघ्नहर्ता दोघांचंही ठाम ठरलं होतं. काळाचौकीला स्टुडियो उभारला आणि शिल्पकार साळसकर बंधूंच्या स्टुडियोत मूर्ती आकार घेऊ लागल्या. लहानपणापासून मातीत रमणारी बोटे, धातूच्या रसात नवनवे जिवंत आकार शोधू लागली. स्वामी समर्थाची पहिली मूर्ती घडवून स्टुडियोचा शुभारंभ झाला. साळसकर बंधूंनी या व्यवसायाला नाव दिलं – ‘स्वामी आर्ट्स’! २०१२ मध्ये कंपनीची रीतसर स्थापना झाली, आणि सुमारे १५ कुटुंबांना रोजगारही मिळाला..

मग दोघा भावंडांनी मागे वळून पाहिलंच नाही. विघ्नहर्ताच्या बोटात मूर्तीकलेबरोबरच चित्रकलाही रुजली होती. स्वत:चा स्टुडियो झाल्यामुळे, कलाक्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या मुलांनाही संधी मिळावी आणि रोजगारही मिळावा या हेतूने त्यांनी चित्रकला व शिल्पकलेचं शिक्षण घेणाऱ्या काही तरुण कलावंतांना हाताशी घेतलं. पहिलं मोठं काम पूर्ण केलं. मुंबई मेट्रोच्या सर्व स्थानकांवर मुंबईची विविध रूपे, मुंबईची जीवनशैली चित्ररूपाने प्रवाशांना भुरळ घालतात. ही कलाकारी विघ्नहर्ता, विश्वंभर आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या नव-कलावंतांचीच. मुंबईच्या मेट्रोसोबत आपल्या कलेचा प्रवास सुरू झाल्याने आत्मविश्वास वाढला आणि शिल्पकलेच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायचं या भावांनी ठरवलं. जेमतेम पंचवीस-तिशीच्या उंबरठय़ावरूनच मोठी झेप घेण्यासाठी दोघांनी पंख पसरले.

आता दोघांनीही आकाशाला गवसणी घातली आहे. मुंबई मेट्रोच्या स्थानकांवरील चित्रांपाठोपाठ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे लहान आकाराचे सुबक पुतळे – त्याला विघ्नहर्ता भक्तिभावाने मूर्ती असेच म्हणतो- बनविण्याचे काम एका नामांकित औषध कंपनीकडून मिळाले. स्टुडियोतील कलावंत बोटे या मूर्ती साकारू लागली. सुमारे पन्नास हजारांहून अधिक मूर्ती विघ्नहर्ताने या कंपनीस कमीत कमी कालावधीत तयार करून दिल्या आणि ‘सुपरफास्ट आर्टिस्ट’ म्हणून त्याचे कलाक्षेत्रात नाव झाले. वसईतील एका चर्चवर सुमारे १५ फुटांचा सेंट पॉलचा पुतळा पुढे घडविला गेला. आता आपली कला उंच उभारी घेऊ  शकते, याचा विश्वासही आला. शिर्डीला जाताना वाटेत पालखी निवारा नावाचा थांबा आहे. बाबांच्या पालख्या घेऊन जाणारे साईभक्त इथे विसावतात. तेथील चित्रकला आणि मूर्तीदेखील विघ्नहर्ताच्याच हातांनी घडल्या. नंतर एकामागून एक सुबक मूर्ती आणि पुतळ्यांची मालिकाच सुरू झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सरदार पटेल यांचे विविध आकारांचे, उंचीचे पुतळे घडू लागले. रतन टाटा यांच्यापर्यंत या तरुण कलावंतांची कीर्ती पोहोचली आणि टाटा कंपनाने जेआरडी टाटांच्या काही हजार मूर्ती बनविण्याची ऑर्डरच देऊन टाकली. येत्या महिनाभरात स्वामी समर्थाच्या सुमारे साडेतीन फूट उंचीच्या काही मूर्ती तयार करण्याचे काम स्वामी आर्टसच्या स्टुडियोत सुरू आहे. शिवाय, इंडियामार्ट डॉट कॉमवर ऑनलाइन विक्रीची सुविधाही कंपनीने मिळविली. त्यामुळे साळसकर बंधूंच्या स्टुडियोत तयार झालेले लहानमोठे पुतळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. पुतळ्यांची अशी मालिका सुरू असतानाच, जनसंघाचे संस्थापक पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा पंचधातूमधील पूर्णाकृती पुतळा बनविण्याचे आव्हान विघ्नहर्ता आणि विश्वंभर यांनी स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमध्ये उभारावयाचा संपूर्ण देशांतर्गत बनावटीचा व सर्वाधिक उंचीचा, म्हणजे तब्बल ६३ फूट उंचीचा हा पुतळा बनविण्यासाठी मुंबईच्या स्टुडियोत पुरेशी जागा आणि साधनसामग्री मिळणार नाही, हे ओळखून राजस्थानातील जयपूर येथील एका ठेकेदाराने घेतलेले हे कंत्राट पूर्ण करण्याची जबाबदारी विघ्नहर्ताने उचलली. जयपूरच्या स्टुडियोमध्येच काम सुरू झाले. पुतळ्याची आखणी करण्याआधी संपूर्ण मातीचा पुतळा बनविण्यात आला. दीनदयाळ उपाध्याय यांच्या देहयष्टीचा बारकाईने अभ्यास करून सुमारे साडेतीनशे सुटे भाग तयार करण्यात आले. वाराणसीमध्ये ते जोडून पुतळा उभा राहिला. अलीकडेच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे शानदार अनावरण करण्यात आले. आपल्या कलेला खरी उंची मिळाल्याच्या समाधानाने साळसकर बंधू सुखावून गेले. गणेशाच्या लहानमोठय़ा मूर्ती आणि स्वामी समर्थाच्या मूर्ती तयार करताना त्यांच्याच कृपेने आपल्या हातून संपूर्ण देशी बनावटीचा पंचधातूंचा तब्बल ६३ फूट उंचीचा पुतळा बनविण्याचे काम पूर्ण झाले, अशी भावना दोघे बंधू भक्तिभावाने व्यक्त करतात.

दिनेश गुणे

dinesh.gune@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 12:03 am

Web Title: article arthvruttant parighache paul akp 94
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : करोना उद्रेक  संकट  की  संधी?
2 नावात काय : चलनवाढ
3 माझा पोर्टफोलियो : नगण्य कर्जभार, वजनदार नाममुद्रा
Just Now!
X