हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत अर्थसंकल्प जाहीर झालेला असेल. मात्र आज सुचविलेला शेअर अर्थसंकल्प कसाही असला तरी  ‘पोर्टफोलियो’साठी फायद्याचा ठरेल असाच.

अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेडचा (एपीएल) वारसा १०० वर्षांहून अधिक काळाचा आहे. भारतीय उपखंडात फार्मास्युटिकल आणि ड्रग उद्योगाचा विकास आणि क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने १९०७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड आज भारतातील एक आघाडीची औषध कंपनी आहे. आपल्या दहा उपकंपन्यासह जगभरात विस्तारलेल्या या कंपनीचे भारतामध्ये नऊ अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प असून त्यापैकी सहा फॉर्म्युलेशन तर तीन एपीआय प्रकल्प आहेत.

नाविन्य आणि तंत्रज्ञानावर भर देऊन कंपनीने गुजरातमधील वडोदरा येथे एक अत्याधुनिक संशोधन सुविधा – अलेम्बिक रिसर्च सेंटर (एआरसी) – सह फॉर्म्युलेशन रिसर्च आणि १५० खाटांची बायोक्विव्हिलेन्स सुविधा स्थापित केली आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने अलीकडेच हैदराबाद येथील अल्ट्रा-मॉडर्न संशोधन व विकास (आर अँड डी) केंद्रात गुंतवणूक केली आहे. एकूण उलाढालीच्या ११ टक्के संशोधनावर खर्च करणारी एपीएल ही औषध क्षेत्रातील काही मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे.

रणनीती म्हणून आपल्या विस्तारासाठी कंपनीने आक्रमकपणे आंतरराष्ट्रीय जेनेरिक बाजारपेठेमध्ये यशस्वी एएनडीए आणि डीएमएफ सादर करून गुंतवणूक सुरू केली आहे. एपीएलच्या या बाजारपेठांमध्ये कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये देखील समाविष्ट आहेत. कंपनी ब्रँडेड फॉर्म्युलेशन विक्रीद्वारे उर्वरित जगातील बाजारपेठेची पूर्तता करते.

कंपनीचे त्वचाविज्ञान, ऑन्कोलॉजी आणि इंजेक्टेबल फॉर्म्युलेशन सारख्या उपचारात्मक क्षेत्रातील संधी शोधण्याचे उद्दिष्ट आहे. एपीएलने कॅन्सर, जळजळ, ऑटोम्यून्यून रोग आणि चयापचयाशी निगडित विकारांवर उपचार करण्यासाठी सिग्नल ट्रान्सडक्शन नेटवर्क आणि आयन चॅनेलला लक्ष्य करणाऱ्या नाविन्यपूर्ण, लहान रेणू औषधांच्या शोध आणि विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीला नुकतीच, एजीथ्रोमायसिन तसेच बोसेन्टन या नवीन ड्रग्जसाठी ‘यूएस एफडीए’ची मान्यता मिळाली आहे.

कंपनीचे डिसेंबर २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष जाहीर झाले असून कंपनीने १,०५२.३६ कोटी (गेल्या वर्षी १०१८ कोटी) रुपयांच्या उलाढालीवर २३१.२ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत तो ६३ टक्क्य़ांनी अधिक आहे. गेली दोन वर्ष औषधी कंपन्यांनी शेअर बाजारात तितकीशी आघाडी घेतली नव्हती. मात्र लवकरच औषधी कंपन्यांना बरे दिवस येतील अशी अपेक्षा आहे. अलेम्बिकसारखी अत्यल्प बिटा असलेली कंपनी म्हणूनच पोर्टफोलियोमध्ये असायला हवी.

अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लि.

(बीएसई कोड – ५३३५७३)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६१६.८५

लार्ज कॅप

प्रवर्तक : अलेम्बिक समूह

व्यवसाय : औषध निर्मिती

बाजार भांडवल : रु. ११,१२० कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  ६१२ / ४३५

भागभांडवल : रु. ३७.७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ७२.९७

परदेशी गुंतवणूकदार  ९.२३

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ६.७३

इतर/ जनता    ११.०७

पुस्तकी मूल्य : रु. ८६.३

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश :  २००%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. २०.३५

पी/ई गुणोत्तर : २५.५

समग्र पी/ई गुणोत्तर :    २९.५

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.०३

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १५५

रिटर्न ऑन कॅपिटल : ३१.२५

बीटा :    ०.४