अजय वाळिंबे

तीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८९ मध्ये भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना केली गेली. कंपनीने वापी (गुजरात) येथे ५४० टीपीए क्षमता असलेल्या विनाइल सल्फोन प्लांटची स्थापना करून आपले काम सुरू केले. आता ते ३,६०० टीपीएपर्यंत विस्तारले आहे. त्यानंतर कंपनीने इतर डाइज आणि डायस्टफ्समध्ये आणखी विस्तार केला. भारतातील मुख्य उत्पादकांपैकी भगेरिया इंडस्ट्रीज एक प्रमुख उत्पादक मानली जाते. भारत सरकारने ‘टू स्टार एक्सपोर्ट हाऊस’ म्हणून मान्यता दिली आहे.

कंपनी सौर ऊर्जा आणि ईपीसी कराराच्या निर्मितीमध्येदेखील कार्यरत आहे. कंपनीने अहमदनगर येथे सौर प्रकल्प सुरू केला आहे आणि एसईसीआयबरोबर पीपीएवर स्वाक्षरी केली आहे. कंपनीने ठरावीक दराने काही कंपन्यांसाठी रूफटॉप सोलर प्लांट्सची स्थापना केली आहे. भगेरियाने सुरुवातीपासूनच प्रगत संशोधनाद्वारे डाय इंटरमीडिएट्स आणि इतर संबंधित उत्पादनांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. कंपनीची ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादने जगभरात निर्यात केली जातात. कंपनीची उत्पादने कोरिया, जपान, तवान, चीन, जर्मनी, इंडोनेशिया, थायलंड, यू.एस.ए. आणि इतर युरोपियन आणि आफ्रिकन देशात निर्यात केली जातात. आज भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड इंटरमीडिएट्स आणि रंगांचे सर्वात मोठे निर्माता आणि निर्यातदार आहे. कंपनीचे गुजरात आणि महाराष्ट्रात दोन उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीने टेक्सटाईल, लेदर, पेपर आणि इतर बरीच स्पेशालिटी केमिकल्ससाठी उत्पादने विकसित केली आहेत.

गेल्या वर्षी उत्तम आर्थिक कामगिरी करून गुंतवणूकदारांना भरपूर फायदा करून देणाऱ्या या कंपनीचे डिसेंबर २०१९ साठी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत. कंपनीने १०४.८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १७.७४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत तो १७ टक्क्यांनी जास्त आहे. मात्र नऊमाहीचा नफा ६१.०९ कोटी रुपयांवरून ५१.६७ कोटी रुपयांवर घसरला आहे. मात्र सध्या चीनमधील परिस्थिती तसेच २२ टक्क्यांवर आणलेली कर कपात याचा फायदा कंपनीला होईल. भगेरियासारख्या स्मॉल कॅपमधील मध्यमकालीन गुंतवणूक फायद्याची ठरू शकेल.

भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड

(बीएसई कोड – ५३०८०३)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १४६/-

मायक्रो कॅप

व्यवसाय : रंग, रसायने

बाजार भांडवल : रु. ६४० कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  १४९ / ८८

भागभांडवल : रु. २१.८२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ७०.४८

परदेशी गुंतवणूकदार  —

बँक म्यु. फंड/ सरकार ०.११

इतर/ जनता    २९.४

पुस्तकी मूल्य : रु. ७८.५

दर्शनी मूल्य :   रु. ५/-

लाभांश :  १२०%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. १४.१९

पी/ई गुणोत्तर : १०.३

समग्र पी/ई गुणोत्तर :    १३.१३

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.०९

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ५५.८०

रिटर्न ऑन कॅपिटल : २८.८८

बीटा : १