News Flash

नावात काय : कॅपिटल फ्लाइट

भांडवली बाजारामार्फत शेअर्समध्ये पैसे गुंतलेले असतील तर गुंतवणूक काढून घेणे तुलनात्मकदृष्टय़ा सोपे ठरते.

संग्रहित छायाचित्र

कौस्तुभ जोशी

लेखाचे शीर्षक वाचून विमानात बसून कुठे तरी निघाल्याचा ‘फील’ येईल कदाचित, पण ते तसंच आहे! बाहेरच्या देशातील गुंतवणूकदारांनी आपल्या देशात पैसे गुंतवले, नवे उद्योग सुरू केले तर प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) किंवा संस्थात्मक गुंतवणूक (एफआयआय) असे त्याला आपण म्हणतो. आता अशी कल्पना करा, आपल्या देशातून गुंतवणूकदारांनी सटासट पैसे त्यांच्या देशात परत न्यायला सुरुवात केली,  बाजाराला अंदाज यायच्या आत परदेशातील बडय़ा गुंतवणूकदारांनी त्यांचे गुंतवणुकीचे प्लॅन गुंडाळून ते आपल्या बाजारातून बाहेर पडायला लागले तर? तर त्यासाठी ‘कॅपिटल फ्लाइट’ असा शब्द वापरला जातो.

सर्वसाधारणपणे एखाद्या देशात गुंतवणूक का होते? यामागे काही कारणं असतात. त्या देशातील राजकीय, सामाजिक वातावरण कारणीभूत असते. ज्या देशात उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, भांडवली बाजारात पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकस्नेही वातावरण निर्माण केले जाते तेथे गुंतवणुकीचा ओघ वाढता असतो. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफ डीआय) ही दीर्घकाळासाठी केलेली असल्यामुळे एकदा व्यवसाय सुरू केला की सहजासहजी गाशा गुंडाळणे शक्य नसते. मात्र भांडवली बाजारामार्फत शेअर्समध्ये पैसे गुंतलेले असतील तर ही गुंतवणूक काढून घेणे तुलनात्मकदृष्टय़ा सोपे ठरते.

परदेशी गुंतवणूकदारांना देशांतर्गत वातावरणाविषयी नकारात्मक संकेत मिळू लागले किंवा आपल्या गुंतवलेल्या पैशाविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, तर तडकाफडकी गुंतवणूक काढून घेण्यात येते, यालाच कॅपिटल फ्लाइट असे म्हणतात.

देशाच्या परकीय चलनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ढासळली की त्या गुंतवणुकीवरील परतावे आकर्षक राहात नाहीत, त्या वेळी गुंतवणूकदार पैसे काढून घेतात.

आपल्या देशातील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा अन्य एखाद्या ठिकाणी आकर्षक परतावा मिळत असेल तर गुंतवणूकदार पैसे घाऊक प्रमाणावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरवतात. यामध्ये अशी शंका असते की, आपल्या देशातील वातावरणापेक्षा दुसऱ्या देशातील वातावरण गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक आहे. त्यामुळे देशाभिमानापेक्षा गुंतवणुकीवरील फायदा हे सूत्र महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्यावे. जर सरकारने गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जादा कर लावायला सुरुवात केली,  तर आपल्या देशातून पैसे काढून जेथे अशा प्रकारचे कर कमी आहेत तेथे पैसे गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढेल.

काही वेळा परदेशी गुंतवणूकदारांच्या बाबतीत सरकारी पातळीवर उत्साह कमी होतो आणि देशातल्या उद्योगांनाच प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले जाते. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या मनात संशयास्पद वातावरण निर्माण झाले तर त्यांचा पैसा ते दुसऱ्या देशात गुंतवण्यासाठी काढून घेतात.

* लेखक वित्तीय नियोजनकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

joshikd28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:57 am

Web Title: article on capital flight abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : बस एक बार मेरा कहा मान लीजिये!
2 अर्थ वल्लभ : अस्थिर काळातील भरवशाचा सोबती
3 क.. कमॉडिटीचा : विक्रमी खरीप पेरण्या धोकादायक वळणावर
Just Now!
X