29 October 2020

News Flash

कापूस भाव खाऊ लागला

मागील काही आठवडय़ांत तेलबिया, तेले आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या असतानाच कापसाच्या किमतीदेखील चांगल्याच वधारल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मागील काही आठवडय़ांत तेलबिया, तेले आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या असतानाच कापसाच्या किमतीदेखील चांगल्याच वधारल्या आहेत. कापूस वायदा अडीच महिन्यांत १९,३५० रुपये प्रति गाठ म्हणजे सुमारे ३० टक्के वाढला आहे, परंतु अजूनही यावर्षीच्या वाढीव हमीभावाच्या २-४ टक्के खालीच आहे. जगाच्या विविध कोपऱ्यात विविध घटना या तेजीला कारणीभूत आहेत. याची कारणमीमांसा करता असे दिसते की, जगभर टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ सुरू झाल्यावर कापड गिरण्या आणि व्यापार चालू झाल्यामुळे टाळेबंदीच्या काळातील तुंबलेली मागणी अचानक वर आली. भारतात अनेक आर्थिकदृष्टय़ा कमकुवत छोटे उद्योग करोनाकाळात बंद पडले. त्यातील बरेचसे कायमचे बंद होतील. तर जागतिक बाजारात सुताला अचानक मागणी वाढली ती पूर्ण करण्यासाठी उरलेल्या उद्योगांवर जबाबदारी आली. त्यामुळे त्यांचे उद्योग आज ९५ टक्के ते १०० टक्केक्षमतेने चालू झाले आहेत. त्यांच्याकडून कापसाला मागणी वाढल्यामुळे भावात सुधारणा झाली.

दुसरीकडे कापूस महामंडळानेदेखील १२.५ दशलक्ष गाठींची हमीभाव खरेदी करण्याची घोषणा केली म्हणून व्यापाऱ्यांनी आपल्याला माल मिळण्यासाठी थोडे घाई केल्यामुळे  मागणीत भर पडली आहे. तर भारतातील कापसाची किंमतच जागतिक मार्गदर्शक भावापेक्षा ६-७ टक्के कमी असल्यामुळे निर्यातीसाठीदेखील मागणी वाढली आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून तेजी आली आहे. पुढील काळात पावसामुळे भारतातच नव्हे तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमधील पुरवठादेखील लांबला आहे म्हणून तेजी अजूनही टिकून आहे असे म्हटले जात आहे.

शिवाय एकंदर कृषीमालाच्या साठवणुकीचा जागतिक कल व तेलबियांमधील तेजी आणि सरकीचा थेट संबंध असल्यामुळेदेखील कापूस भाव खात आहे. मात्र यापुढे उत्पादकांनी सावध राहिले पाहिजे. शक्य असल्यास आपल्याकडील निदान २५ टक्के माल सध्याच्या किमतींमध्ये डिसेंबर वायद्यात विकून जोखीम व्यवस्थापन करण्याची गरज आहे. तर पुढील काळात टप्प्याटप्प्याने विक्रीचे तंत्र अवगत करावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 1:06 am

Web Title: article on cotton prices have risen sharply abn 97
Next Stories
1 बंदा रुपया : ‘चहा’ची अशीही यशकथा
2 नावात काय : फ्री रायडर
3 आरोग्यम् धनसंपदा!
Just Now!
X